- ॲड. प्रकाश आंबेडकर; शाहूराजे भोसले यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शतकमहोत्सवी समारंभाचा समारोप
कोल्हापूर
सुमारे १०२ वर्षांपूर्वी दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची माणगाव या गावी झालेली परिषद म्हणजे डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात होती.आज मुजोर प्रस्तापित व्यवस्थेसमोर टिकायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन राष्ट्रीय आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. माणगाव (ता. हातकणंगले) येथे ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शतकमहोत्सवी समारंभ समारोपप्रसंगी ते बोलत होते.
माणगाव परिषदेमुळे या देशातील सामाजिक राजकीय संदर्भच बदलून गेले. एवढेच नव्हेतर राजर्षी शाहूंराजांच्या दूरदृष्टीने बाबासाहेबांच्या संबंधाने ते "संपूर्ण हिंदुस्थानचे पुढारी होतील" असे केलेले विधान तंतोतंत खरे ठरले. ते देशाचे तर पुढारी झालेच याच बरोबर विश्वातील मानवमुक्ती लढ्याचे मार्गदर्शक ठरले. माणगाव परिषदेमुळे भारताचा इतिहास बदललेला आहे , परिषदेमुळे सर्व समाजाचा चेहरामोहरा बदलल्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आवश्यक असून सध्याच्या काळात समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची गरज आहे. त्यांना सेवा संस्था या माध्यमातून मदत केली पाहिजे असे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन समाजाच्या उद्धारासाठी डॉ. आंबेडकर यांचे कार्य मोठे असून त्याचा वारसा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहून दिसून येतो, असे मत श्रीमंत शाहू महाराज यांनी यावेळी व्यक्त केले. अंजलीताई आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजन समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य बापूसाहेब माने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा दिली. यावेळी तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळाही पार पडला. त्यात माणगाव परिषद शतकोत्तर चिंतन, प्रा. संभाजी बिरांजे लिखित आप्पासाहेब पाटील व्यर्थ न होवो बलिदान, डॉ. प्रा. अमर अभिमान पांडे लिखित क्रांतीचे साक्षीदार या पुस्तकाचे प्रकाशन अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीत माने यांनी केले. पी. एन. कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पी. एन. कांबळे, आर. बी. कोसंबी, जी. बी. आंबपकर, बाळासो कांबळे, ए. पी. कांबळे, एम. एम. कांबळे , मधुकर माणगावकर , भीमराव माणगावकर , अनिल कांबळे आदींनी परिश्रम घेतले होते .
परिषदेत विविध ठराव ठरावामध्ये प्रमुख ठराव,
कोल्हापूर शहरात गौतम बुद्धांचे राष्ट्रीय स्मारक, रेल्वे स्टेशनसमोरील रेस्ट हाऊसमध्ये आंबेडकरांचे स्मारक, माणगाव येथे छत्रपती शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांचे पुतळे, माणगाव प्राथमिक शाळेचा पुनर्विकास करून स्मारक, माणगाव ऐतिहासिक पर्यटनस्थळ जाहीर करावे, शिवाजी विद्यापीठात पाली भाषा विकास स्वतंत्रपणे सुरू करावा, माणगाव परिषदेसाठी जाहीर केलेला ५०० कोटी निधी द्यावा
अचानक आलेल्या पावसाने जाग्या केल्या जुन्या आठवणी
विचारमंचावर अॅड. प्रकाश आंबेडकर जेव्हा भाषण करण्यासाठी उभे टाकले तेव्हा विजांच्या कडकडाटासह पाऊसाने आगमन केले. १९२० मध्ये भरलेल्या पहिल्या माणगाव परिषदेलाही अशीच पावसाने हजेरी लावली होती. त्याच पद्धतीने आज सुमारे १०२ वर्षांनंतर झालेल्या माणगाव परिषद शताब्दी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमालाही पावसाने हजेरी लावली. निसर्गानेही माणगाव परिषदेला उपस्थिती दर्शवल्याचे निवेदकांनी सांगताच जनसमुदायाने टाळ्यांच्या गजरात पावसाचे स्वागत केले.
- माणगांव येथे ऐतिहासिक माणगांव परिषदेचा शताब्दी समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. अमर पांडे यांनी संपादित केलेल्या ‘क्रांतीचे साक्षीदार’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तकामध्ये सन १९२० मध्ये माणगांव परिषद आयोजित करण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, ते आप्पासाहेब पाटील यांच्यावर व त्यांच्या समाजकार्यावर आधारित लेख आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षि शाहू महाराज यांची परिषदेतील भाषणे व ठरावांचा उहापोह यामध्ये करण्यात आला आहे. आप्पासाहेब पाटील हे सत्यशोधकी विचाराचे तसेच दानशूर व्यक्तीमत्व होते. हत्ती सहज फिरु शकतील एवढा मोठ्ठा त्यांचा वाडा होता. त्यांचे अस्पृशोद्धाराचे कार्य व परिषदेतील सहभाग गावकऱ्यांना सहन झाला नाही, गावाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. स्वतःच्या घरातही त्यांना कुणी घेईना. शेवटी त्यातच आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. शाहूराजे व बाबासाहेब असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. सन १९२२ ला शाहू महाराजांचे निधन झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन मध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले होते.पुस्तकाच्या मुखपृष्ठावर 300 वर्षपूर्वीचे पिंपळाचे झाड असून, त्या झाडा शेजारीच ही परिषद संपन्न झाली होती. आप्पासाहेब पाटील हे या प्रसंगी उपस्थित होते. त्यामुळे वृक्ष, तसेच आप्पासाहेब पाटील हे माणगांव परिषदेच्या क्रांतीचे साक्षीदार ठरतात, असे संपादकाचे मत आहे. हे पुस्तक प्रा. डॉ. नितीन गायकवाड यांनी प्रकाशित केले असून, पुस्तकासाठी माजी महापौर सुरेश पाटील, प्रा रवी ढाले, प्रा आप्पासाहेब केंगार, डॉ. भगवान मींचेकर यांचे सहकार्य लाभले आहे
0 टिप्पण्या