ठाणे दादोजी कोंडदेव स्टेडियमचा प्रशासकीय कारभार गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एकाच अधिकाऱ्याकडे आहे. वास्तविक पाहता स्टेडियमची दुरावस्था, गैरकारभार याविषयी अनेक वेळा प्रसिद्धी माध्यमातून बातम्या छापून आल्यावर देखील संबधित अधिकाऱ्याचे वर्चस्व कुणीही कमी करू शकलेले नाही, यावरून त्यांच्यामागे किती मोठा राजकीय वरदहस्त आहे याची कल्पना येते. फक्त एका खेळात पारंगत असल्याचे प्रमाणपत्र जोडून क्रिडा अधिक्षक म्हणून रुजू होऊन, भांडारपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळात आज थेट उपायुक्त पद मिळवण्यामागे कोणत्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे. उपायुक्तपदी वर्णी लागावी यासाठी किती मोठी रक्कम खर्ची करावी लागली असेल याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.
मुळात ही नियुक्तीच नियमात बसत नाही. पालिकेतील अनेक जबाबदार अधिकारी पदोउन्नतीच्या प्रतीक्षेत असताना फक्त काही मोजक्याच अधिकाऱ्यांना सुसाट पदोन्नती देणे शासकीय नियमात बसत नाही. राज्याच्या नगरविकास खात्याने देखील पालिका प्रशासनास अशी नियमबाह्य नियुक्ती करण्यात येऊ नये असे आदेश दिलेले आहेत. मात्र, पालिका प्रशासकीय कारभार इतका मनमानी झालाय की येथे अशा कित्येक आदेशांना केराची टोपली दाखवली जाते. क्रिडा अधिक्षक हे पद नियमानुसार कारकून दर्जाचे आहे. असे असतांना देखील त्यांना थेट उपायुक्त पद बहाल करणे पूर्णतः नियमबाह्य आहे.क्रिडा अधिक्षक म्हणून स्टेडियमचा पदभार स्विकारल्यानंतर या स्टेडियमच्या दुरुस्तीवर झालेल्या खर्चाचा सविस्तर तपशील ठामपाने जाहिर करावा अशी मागणी या आधीही करण्यात आली होती. मात्र या मागणीच्या पत्राला आयुक्त कार्यालयाने केराची टोपली दाखवली. तसेच उप. आयुक्त संदीप माळवी यांना विचारणा केली असता त्यांनी चौकशी करतो आणि सांगतो अशी उत्तरे दिली. क्रिडा क्षेत्रातील एक पदक असलेल्या क्रिडा अधिक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर भांडारपाल म्हणून अधिक जबाबदारी देण्यात आली. अधिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी दादोजी कोंडदेव स्टेडीयमची रुपरेखाच बदलली आहे. आल्यापासून प्रत्येक काम दोन वेळा करण्याचा विक्रम यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. मात्र याबाबत मागणी करूनही कोणतीही चौकशी नाही. किंवा काही कारवाई नाही. उलट या पदोन्नती मिळाली. ती कोणाच्या आशिर्वादाने हे लवकरच जाहीर करू.
दादोजी कोंडदेव स्टेडियम हा पांढरा हत्ती असल्याचे नेहमीच पालिका प्रशासन बोलत आले आहे. या स्टेडियमला दरवर्षी लाखो-करोडोचा खर्च करूनही त्यामधून कोणतेही भरीव उत्पन्न अद्यापही महापालिकेला मिळात नसल्याचे सांगण्यात येते. तरीही याच्या दुरुस्तीकरिता मागील दहा वर्षात कित्येक कोटी खर्च झाल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. सर्वसामान्यांनी कर नाही भरला तर जप्ती आणणाऱ्या ठाणे महानगर पालिकेने या सर्व कारभाराची लेखा परिक्षण विभागामार्फत चौकशी करून आजपर्यंत झालेला सर्व खर्च वर्तमानपत्रातून जाहीर करावा. ज्या ज्या ठेकेदारांना या कामांचे कंत्राट देण्यात आले आहे त्यांची नावे जाहीर करावी. त्यांना देण्यात आलेली बीले देखील जाहीर करावी .
ज्या तऱ्हेने ठाणे महानगर पालिकेने कर थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून आणि ठिकठिकाणी बोर्ड लावून प्रसिद्ध केली होती. त्याचप्रकारे या सर्व खर्चाची तपशीलवार माहिती प्रसिद्धी करावी. अशी मागणी याद्वारे आयुक्तांकडे करीत आहोत. ठाणे महानगर पालिका ही माहिती देण्यास असमर्थ असेल तर हा भ्रष्टाचाराचा पाढा लवकर जाहीर करण्यात येईल. स्टेडियमचा कारभार कोणत्या नेत्यांच्या आदेशाने चालतो. पालांडे मॅडमना उपायुक्तपदापर्यंत नेण्यात कोणत्या नेत्याचा हातभार, कंत्राटदार कोणाचे मांडलिक आहेत. या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी किती संपत्ती जमवली. कुठे कुठे फ्लॅट खरेदी केलेत हा सर्व प्रकार लवकरच प्रकाशित करण्यात येईल
0 टिप्पण्या