एक वर्षाआधी १+१ अनधिकृत बांधकाम त्याच बांधकामावर एक वर्षानंतर अधिक मजल्याचे बांधकाम सुरु
ठाणे जवाहरबाग जवळील मच्छीमार्केटच्या बाजुला भोईर देशी बारच्या लगत लोखंडी (आय बिंम)च्या सहाय्याने तळ मजला अधिक एक मजल्याचे अनधिकृत बांधकाम मागील वर्षी जुलै महिन्यात ऐन पावसाळ्यात पुर्ण केले. संपूर्ण अनधिकृतपणे सुरु असलेल्या या बांधकामाबाबत नौपाडा प्रभाग समितीच्या अनधिकृत बांधकाम संबंधित विभागाला वारंवार कळवून देखील सहा.आयुक्तनी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले. आज पुन्हा वर्षभरानंतर याच बांधकामावर अधिकचा एक मजला वाढवण्याचे काम बिनदिक्कतपणे सुरु झाले आहे. हे बांधकाम शुक्रवारी संध्याकाळी सुरु झाले आणि शनिवार-रविवारची सुट्टीत बीमच्या सहाय्याने बांधकाम पुर्णही झाले. एकीकडे ठाणे महानगर पालिका अनधिकृत बांधकामांवर तकलादू कारवाई करत असल्याचे ठाणेकरांना दाखवत आहे. मात्र भर बाजारपेठेत सुरु असलेले हे गुप्ताचे आधिच अनधिकृत असताना त्यावर वर्षभरातच पुन्हा मजले उभे करण्यासाठी सहा.आयुक्तांना किती मलिदा मिळाला असा प्रश्न आता परिसरातील नागरिकांना पडला आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमच्या भींतीलगत असणाऱ्या खाली व्यावसायिक गाळे आणि वरती रहाण्यासाठी उभे रहात असलेले हे बांधकाम संपूर्ण लोडबेअरींगवर बांधल्या गेले आहे. या बाबत प्रजासत्ताक जनताच्या २३ जुन २०२१च्या अंकामधून ठाणे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र नेहमीप्रमाणे ठाणे महानगर पालिकेचे नौपाडा प्रभाग समितीचे सहा.आयुक्तांनी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून हे बांधकाम होऊ दिले. त्यावेळेस हे बांधकाम करणारा गुप्ता म्हणाला होता. मैने सब पालिका अधिकारीको सेट किया है. मेरे काम पर कोईभी कारवाई नही होगी. याच जोरावर आज पुन्हा याच बांधकामावर अधिकचे मजले वाढवण्याचे धाडस या गुप्ता बरफवाल्याला आले आहे.
मागील वर्षी जुन महिन्यात ठाणे महानगर पालिकेकडे अनधिकृत बांधकाम संबधित तक्रार क्रमांकावर नोंद करून देखील कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र या परप्रांतिय भूमाफिया गुप्ताने सहजपणे 15 दिवसात आपले बांधकाम करून घेतले. या 15 दिवसात एकही अधिकारी या बांधकामाबाबत चौकशी करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी आला नाही. स्वतचे झोपडे असताना त्याला पोटमाळा करण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक असते. तसे न केल्यास तात्काळ पालिकेचे अधिकारी त्यावर कारवाई करतात. मात्र केवळ एक छोटेसे बर्फाचे दुकान असणारा व्यापारी आजूबाजूची संपूर्ण जागा ताब्यात घेऊन भला मोठा व्यावसायिक गाळा बांधतो. तोही प्रमुख बाजारपेठेत. तरीही पालिकेचे अधिकारी याकडे कानाडोळा करतात. म्हणूनच भूमाफिया गुप्ता म्हणतो मैने सबको सेट कर दिया है. तुम कुछ भी करो.
तोच परप्रांतिय गुप्ता आज खुलेआम मजल्यावर मजले चढवण्याचे काम करीत आहे. तेही भर बाजारपेठेत. केवळ बीमच्या सहाय्याने उभे करत असलेले हे बांधकाम किती दिवस टिकणार. भविष्यात आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना आणि या बाजारपेठेत येणाऱ्या जाणाऱ्यांना धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी घेणार का? सहा.आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशिर्वाद असल्यानेच गुप्ता हे काम बिनदिक्कतपणे करत असल्याची चर्चा परिसरातील इतर व्यापारी करित आहेत. मराठी मराठी म्हणून दवंडी पिटणारे केवळ मतांसाठी परप्रांतियांना पाठीशी घालत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
0 टिप्पण्या