राष्ट्रीय जन्मतारीख दिन अर्थात 1 जून या दिवशी बहुतांश लोकांचा वाढदिवस असतो. अनेक मान्यवर मंडळीचा याच दिवशी कसा जन्म झाला हे एक कोडेच होते. पण कालांतराने कळले की, त्यावेळेस जन्म दाखला मिळण्याची सोय नव्हती. त्यामुळे शाळेत प्रवेश घेतांना गुरुजी सरसकट 1 जून ही तारीख टाकत असत. अगदी मा.रामदास आठवले यांची जन्मतारीखही 1 जून असल्याचा दाखला त्यांच्या शाळेत मिळतो. अशाच एका व्यक्तीचा ज्याचा माझ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात फार मोठा मोलाचा वाटा आहे. माझ्या पत्रकारितेच्या प्रवासातील माझे गुरू जगनाथ आत्माराम मोरे त्यांना मी निर्भीडमामा म्हणूनच संबोधतो. कारण त्यांचा आणि माझा परिचय त्यांच्या निर्भिड या पाक्षिकामुळेच आला. त्यांचाही 1 जून हाच जन्मदिन.
6 डिसेंबर 1988 पाक्षिक-आम्ही निर्भीड सुरु केले त्यावेळेस पत्रकारितेचा मला गंधही नव्हता. डि.टी.पी.चा व्यवसाय करीत असताना अनेक अनियतकालिकाचे संपादक आपल्या अंकांचे डि.टी.पी. करण्यासाठी संपर्कात आले. त्यावेळी मराठी टायपिस्ट मिळणे कठीण होते. मात्र माझे मराठी बऱयापैकी असल्याने अनेक संपादक मंडळीं यामुळे संपर्कात आली. ज्यांच्या अनियतकालिकाचे संपूर्ण सेटींग करून देण्याचे काम मी करत होतो. यामुळे निर्भिडमामांचाही परिचय झाला. त्यांच्या अंकांचे डि.टी.पी.करण्याचा कार्यभार माझ्याकडे आला. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील बरीच माहिती मला मिळू शकली.
मामा संपूर्ण अंकाचे लिखाण स्वत:च करायचे. चार पानांचे लिखाण स्वत:च्या हातांनी करून मग ते टायपींगसाठी द्यायचे. इतकेच नव्हे तर त्यानंतर ते व्यवस्थित तपासून देखील घ्यायचे. त्यासाठी संपूर्ण पानं वाचून काढायचे. कुठेही काहीही चूक राहाता कामा नये हा त्यांचे नेहमीच कटाक्ष असे. कामाची ही पद्धत मी त्यांच्याकडूनच शिकलो. चळवळीचा बऱयापैकी इतिहास मामांच्या लेखणीतून यायचा तो टायपिंग करताना सहजच वाचल्या जायचा. आणि माझ्या माहितीमध्ये अधिक भर पडायची. हे सर्व नियमित सुरू असलं तरी चळवळीची पत्रकारीता असल्याने आर्थिक लाभ काही होत नव्हता. त्यामुळे मामांची नेहमीच आर्थिक चणचण असायची. त्याचा परिणाम माझ्यावरही व्हायचा. असे असले तरीही जिद्दीने काही ना काही करून ते अंक काढायचे? आर्थिक फायदा तर काहीच होत नव्हता. तरीही मामांची धडपड वाखाणण्याजोगी होती. घरची काही इतकी श्रीमंती नव्हती तरीही केवळ चळवळीचं आपण काही तरी देणं लागतो आणि तेच योगदान आपण देत आहोत असे ते मला नेहमी म्हणत असत.
मामांसोबत निर्भिडचं काम सुरु असतानाच मी म्हटलं, मामा या डि.टी.पी. व्यवसायात काही आर्थिक गणितं सुटत नाहीत. मला कुठे तरी काम बघा. तुमची तर खूप ओळख आहे. मामांनीही मनावर घेतलं आणि मला थेट बोरीवलीच्या सांज दिनांकच्या कार्यालयात नेलं. मराठी टायपिंग ब्रयापैकी येत असल्याने तिथे माझी वर्णी लागली. आणि मामांनी आर्थिक प्रश्न सोडवण्यास काहीसा हातभार लावला. मात्र या क्षेत्रात पगार वेळेवर भेटत नाही हा अनुभव तिथे मिळाला. आर्थिक चणचण कायम असली तरी सांज दिनांकमुळे मला दिवाकर शेजवळ यांच्यासारख्या जेष्ठ पत्रकारांसोबत काम करण्याचा अनुभव मिळाला. लिखाणाचं अंग कळू लागलं. याबाबत मी निर्भिडमामांचा नेहमीच ऋणी राहीन. मी जरी कामाला जात असलो तरी मामांच्या अंकाचं काम सुरूच होतं. जसा वेळ आणि पैसा मिळेल तसा मामा अंकाचं प्रकाशन करीत असत.
काही काळाने सांज दिनांक बंद पडलं. दरम्यान माझ्यावर कुटुंबाचीही जबाबदारी आली. पुन्हा मामांना साद घातली. मामा म्हणाले आपलं नालंदा संस्थेचं कार्यालय आहे. या ठिकाणी मी बसतो. तुही तुझा कॉम्प्युटर घेऊन ये आणि बस. तिथे बाहेरची कामंही कर आणि माझ्या पेपरचंही काम कर. मांमांच्या म्हणण्यानुसार मी मुलुंडच्या नालंदा संस्थेच्या कार्यालयात आपलं डि.टी.पी.सेन्टर सुरू केलं. मी ही ठाण्याला रहायला आलो असल्याने जवळच होतो. पण संस्थेचं कार्यालय असल्याने बाहेरची मंडळी त्या ठिकाणी येत नसत. त्यामुळे दिवसभर बसून राहण्यापलिकडे काहीही हाती आलं नाही. दोन महिन्याच्या काळात काही कमाई नाही. मग तिथून मी माझ्या कॉम्प्युटरसह थेट घर गाठलं. मात्र यामुळे मामांना माझा काहीसा राग आला खरा. पण माझा नाईलाज होता. कुटुंबाच्या जबाबदारीने मला अस्वस्थ केलं होतं. त्यांनंतर बराच काळ मामांनी माझ्याशी संपर्क केला नाही. नंतर पुन्हा मामांना कळलं की मी घरातूनच डि.टी.पी.करतो. मामा तडक ठाण्याच्या घरी आले आणि दिवाळी अंकाचं काम सोपवलं. मलाही खूप आनंद झाला. कारण या व्यक्तीची सोबत असणे म्हणजे नियमितपणे काहीतरी शिकणे असं होतं.
निर्भिड मामा ही एक जिवंत आंबेडकरी चळवळच आहे. गेल्या तीसहून अधिक वर्षाचा काळ पाहिला तर मामा कधी शांत बसलेत असं कधीच दिसलं नाही. नेहमी काही ना काही उपक्रम सुरूच असतो. सोलापूरमधील मंगळवेढा तालुक्यात भोसे गावात जन्मलेली केवळ मराठी 7 पास असलेल्या या व्यक्तीकडे पाहून कुणीही म्हणणार नाही हा माणूस इतका कमी शिकलेला आहे. चर्चा मग ती कोणत्याही विषयावर असो, समोरच्याला समर्पक उत्तर मिळणारच. याचे कारण म्हणजे मामाचं वाचन दांडगं आहे. निर्भिडचं नियमित काम सुरु असताना काही वेळा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. तेव्हा ते चार पाच पुस्तकं जवळ घेऊन त्यातले संदर्भ शोधत लिखाण करीत असायचे. म्हणूनच आजही ते समर्थपणे आपलं साप्ताहिक एकला चलो रे चालवत आहेत.
आपल्या कार्यबाहुल्यांच्या जोरावरच त्यानी आजवर अनेक संस्था, संघटना निर्माणही केल्या आणि अनेकांची विविध पदेही भूषवली. ज्यामध्ये प्रामुख्याने दलित पँथर संघटनेचे मुलुंड (पश्चिम) संरक्षण प्रमुख, कामगार क्षेत्रात ठाण्यातील फॅक्टरी कमिटीचे अध्यक्षपद. मुलुंडच्या बौध्द ऐक्य संघटनेचे संस्थापक सदस्य. पंचशिल सेवा संघ (भोसे) मुंबई" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, नूतन विकास मंडळ "कन्झ्युमर्स ग्राहक सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी." मुलुंडच्या मुनिंद्र युवक क्रिडा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य नंतर जनरल सेक्रेटरीपद. पंचशिल प्रबोधन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक सदस्य. इतकेच नव्हे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वागळे इस्टेट विभाग प्रमुखपदही त्यांनी भूषवले त्यानंतर मुलुंड वॉर्ड 220चे उपाध्यक्ष व तालुका चिटणीसपदीही होते, नालंदा सांस्कृतिक संघ (रजि.) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून मुलुंडच्या विश्वसहकार हौसिंग सोसायटी (एसआरए)चे ते कार्यकारिणी सदस्य तसेच सध्या सेक्रेटरी आहेत. अशा अनेक संस्था-संघटना आहेत की ज्यामध्ये मामांचा सहभाग आजही कायम आहे.
या संस्था-संघटनांची कामे करत असताना त्यांनी आपली पत्रकारिता कधीच सोडली नाही. भले व्यावसायिक पत्रकारिता त्यांनी केली नसेल मात्र आंबेडकरी चळवळीतील अनेक अनियतकालिकांमधून त्यांनी आपले योगदान दिले. पाक्षिक आम्रपाली, पाक्षिक-प्रबुध्द मानव" दैनिक कोकण सकाळ" सहसंपादक, कै. खासदार पी. डी. जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाच्या "साप्ताहिक समाज उन्नती कार्यकारी संपादक. अशा विविध अनियतकांमधून ते कार्यरत राहिले.
त्यांच्या या कार्यामुळे अनेक संस्था संघटनांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. 2001 डिसेंबर अ. भा. दलित साहित्य अकादमी (दिल्ली) डॉ. बाबासाहेब आंबेडकर "फेलोशिप पुरस्कार". 2002 साप्ताहिक आपली नागरिक सत्ता "ज्येष्ठ पत्रकार गौरव पुरस्कार" मा. प्रतिभाताई पाटील (राज्यपाल राजस्थान) यांच्या हस्ते पुणे येथे स्मृतिचिन्ह देवून सन्मान. 2 मे 2007. ठाणे पुरस्कार (नानजी खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते). संत भरतगिरी महाराज मानवसेवा संस्था, वसई, पुरस्कार 2009. 23 ऑगस्ट/2014 रोजी गांवपांढर पुस्तक मा रामदास आठवले यांचे हस्ते प्रकाशित. 2014 ला गुलबर्गा येथे "सम्राट अशोक मित्र सामाजिक पुरस्कार. 25. विक्रमादित्य एज्युकेशन ट्रस्ट कांदिवली पुरस्कार 2015 आमदार सरदार तारासिंह तर्फे मुलुंड कार्यसम्राट पुरस्कार 2016. मुलुंड सेवा संघ तर्फे गौरव चिन्ह पुरस्कार 1 मे 2017. युवा संघर्ष प्रतिष्ठान पुरस्कार 2017. मुलुंड प्रेरणा सन्मान 2018. या सर्व कार्यबाहुल्यातून ही मामांनी आपली निर्भिड पत्रकारिता सुरूच ठेवली आहे.
1991 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दीमध्ये शताब्दी प्रकाशन संस्था स्थापन करून पाक्षिक निर्भीडचे प्रकाशन केले होते. मात्र तांत्रिक कारणाने (दिल्ली कार्यालय) 18. मार्च 2004 पासून साप्ताहिक आम्ही निर्भीड हे नाव बदलून साप्ताहिक निर्भीड झुंज असे मिळाले. खऱं् तर ते नाव सार्थकच आहे. कारण जगन्नाथ मोरे आजही या व्यवस्थेशी निर्भिडपणे झुंज देत आहेत. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवण्याचेही काम करीत आहेत.
निर्भिडमामा तुम्हाला वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा....
सुबोध शिवराम शाक्यरत्न.... ठाणे
-------------------------------------
0 टिप्पण्या