कोविड काळात सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे करण्याचा विक्रम कळवा प्रभाग समितीने केला. काही काळानंतर या बांधकामांवर ठाणे महानगर पालिकेने हातोडा चालवला. पण महानगर पालिकेचे दुर्लक्ष होताच ही बांधकामे नियमित उभी राहिली. इतकेच नाही तर सर्वत्र सद्यस्थितीत अनधिकृत बांधकामे खुलेआम सुरु आहेत. याला संबंधित कळवा प्रभाग समितीचे उपायुक्तांचा अर्थपूर्ण पाठिंबा असून ते बांधकामाला खुलेआम परवानगी देत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत असून वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येत आहेत. मात्र या कारवाई तकलादू स्वरुपाच्या असल्याचे निदर्शनास आले आहे. कळव्यात पावलोपावली अगदी प्रभाग समितीच्या आजूबाजुला देखील प्रचंड बांधकामे सुरु आहेत. मात्र उपायुक्त म्हणतात चौकशी करतो. चौकशी करेपर्यंत ही बांधकामे पुर्ण झालेली असतात.
ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्याचे आदेश देऊनही कळवा-खारीगाव परिसरातील काही मोजक्या बांधकामांवर कारवाईचा तकलादू हातोडा उगारण्यात आला. अनेक बांधकामे कारवाई झाल्यानंतर पुन्हा उभी राहिली. अद्यापही अनेक बांधकामे सुरु आहेत. मात्र फेरीवाल्यांवर आणि अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात ठाणे महानगर पालिका धन्यता मानत आहे. बड्या धेंड्यांची बांधकामे बिनदिक्कतपणे उभी रहात आहेत. ठाण्यातील विशेष करून कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत ही बांधकामे जोरात सुरु आहेत.अगदी सरकारी जागाही या भूमाफियांनी हस्तगत केल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत कोणतीही चौकशी नाही किंवा तक्रार नाही. तक्रारदारास अधिकारीवर्गच मॅनेज करीत असल्याची चर्चा आता होत आहे. भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यासोबत अधिकारी वर्गाचे अर्थपूर्ण साटेलोटे झाले असून यापुढे बांधकामाची तक्रार देणाऱयाकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखवणे, ऐकला नाही तर चिरीमिरी देऊन गप्प करणे हे आता अधिकारी वर्गाचे काम झाले आहे. त्यामुळे हे भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिक तक्रारदाराला उद्धट भाषेत, जा तुला काय करायचे तर कर असे सुनावत आहेत.
आम्ही महापालिकेचा भरणा (हप्ता) अधिकाऱ्यांना दिला आहे. आता आमच्या इमारती कोणी तोडू शकणार नाही. असे स्पष्टपणे भूमाफिया सांगत आहेत.त्यामुळे ठाण्यात सध्या अनधिकृत बांधकामांचा हैदोस सुरु आहे. इमारत परिसराकरिता असणाऱ्या सोयीसुविधांचा प्रचंड अभाव, अपघात झाल्यास वाहन पोहोचण्यास देखील जागा नाही अशा परिस्थितीत या इमारती उभ्या रहात आहेत. मात्र पालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे तर लोकप्रतिनिधी खुलेआम या अनधिकृत बांधकामांना समर्थन देत असल्याने आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना पडला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून सर्व प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश आहेत. मात्र आयुक्तांना वेळ नसल्याने ते या भागांचा दौरा करतच नाहीत. केवळ फेरीवाल्यांवर कारवाई झाली की नाही यातच आयुक्त धन्यता मानत असल्याची चर्चा ठाणेकरांमध्ये रंगली आहे. अनधिकृत बांधकाम होत असताना पालिकेचे अधिकारी आपला खिसा भरून गप्प बसतात. मात्र त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचा खिसा भरला नाही तर पुन्हा त्या बांधकामांवर कारवाई इतकेच नव्हे तर स्थानिक नगरसेवकांनाही यामधून मलिदा मिळत असतो. तो मिळाला नाही तर नगरसेवकच अधिकाऱ्यांना सांगून कारवाई करण्याचे निर्देश देतात. अशा तऱ्हेने सर्व मिलीभगत होऊन अनधिकृत बांधकाम उभे रहात आहे.
मुंबईप्रमाणे ठाण्यातही भाजपच्या वतीने पोलखोल सभा
ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कोविड आपत्तीसह पाच वर्षांच्या काळात विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. नागरी सुविधांच्या कामांसह बॉलिवूड पार्क, थीम पार्क, बीएसयूपीसह तब्बल 50 प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पुरावे देत काळी पुस्तिका प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर व्हीडीओ क्लिप आणि छायाचित्रे तयार करून प्रदर्शन भरविले जाईल. शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन भाजपाकडून शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करू अशी माहिती आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाण्यामध्ये खोपट येथील भाजप कार्यालय येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या पाच वर्षाचा घोटाळा भाजपने ठाणे ते प्रसिद्ध करणार आहेत मुंबई मध्ये जसे पोलखोल सभा घेतल्या जातात तसेच ठाण्यामध्ये घेण्यात येणार आहे. एक काळी पुस्तिका त्यामध्ये पन्नास प्रकारचे घोटाळे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत नाल्याचा घोटाळा रस्ते बांधकामाचा घोटाळा घोटाळा असे अनेक घोटाळे या काळी पुस्तके मध्ये नोंद घेतली जाईल याचे एक प्रदर्शन फोटो व व्हिडिओ सहित घेणार असल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना महापालिकेत पुन्हा कामावर घेतले आहे पोलखोल करण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असे डावखरे यांनी सांगितले. तर ठाणे महापालिकेत आढळलेल्या भ्रष्टाचाराचे अनुभव नागरिकांनी भाजपा कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन किरीट सोमय्या यांनी केले.
0 टिप्पण्या