कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन....लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद.... त्यामुळे असंघटीत संघटीत कामगारांचे जीवन उध्वस्थ झाले होते. संघटीत कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या ट्रेड युनियन जाती व्यवस्थेच्या समर्थनात गप्प झाल्या आहेत.१० जून २०२० ला कामगारांचे अस्तित्व नाकारणारे कायदे मंजूर होऊन अंमलबजावणी देशभरात सुरु झाली आहे. १० जून १८९० चा रविवार सुट्टीचा १३२ वा कामगार दिन आणि रविवार सुट्टीचा संघर्षमय इतिहास आजचा कामगार विसरला आहे.
रविवार सुट्टीचा लाभ घेणारे आज खूप कामगार, कर्मचारी अधिकारी सुरक्षित ठिकाणी नोकरी करणारे संघटित व असंघटित कंत्राटी कामगार,नाका कामगार लाखोंच्या संख्येने आहेत.पण त्यांना हे माहिती नाही की ही रविवार सुट्टी कोणाच्या नेतृत्वाखाली संघर्ष झाल्यामुळे मिळाली. तो दिवस म्हणजे 10 जुन 1890 होय.तोच खरा भारतीय कामगार चळवळीचा म्हणजे कामगार कर्मचारी अधिकारी यांचा हक्काची सुट्टी रविवार कामगार दिन आहे. त्यानंतर अनेक नेते आले आणि गेले त्यांनी कामगार चळवळीत कालानुरूप थोडा बदल घडवून आणला पण ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीला कोणतीही मोठा धक्का बसेल असा निर्णय घेतला नाही.आर एस एस प्रणित भाजपाच्या मोदी सरकार विरोधात कोणती राष्ट्रीय ट्रेड युनियन कामगारांच्यासाठी रस्त्यावर आणि न्यायलयात दंड ठोकून उभी राहिली नाही.
जेट एअरलाईनचे कामगार कर्मचारी अधिकारी एक दिवसात बेरोजगार झाले मालकाने कंपनी बंद केली. त्यानंतर काही दिवसांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी मुंबई विमानतळा वरून एकही विमान उडू व उतरू देणार नाही अशी जाहीर धमकी दिली होती.पुढे काय झाले?. गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक लढ्यात एका हिंदू हृदय सम्राटांनी भाग घेतांना जाहीरपणे सांगितले होते.मुंबईतील गिरण्या बंद होऊ देणार नाही आणि गिरण्याची एक इंच जागा विकू देणार नाही. पुढे काय झाले?. हा कामगार चळवळीचा इतिहास वर्तमानात लिहला गेला पाहिजे. त्यातुनच प्रेरणा घेतली जाते व चळवळ बांधली जाते.आता देशात कामगार दिन कधी साजरा केला जातो?. रविवार सुट्टी कशी मिळाली यांची माहिती राष्ट्रीय ट्रेड युनियनचे कोणतेही कामगार नेते देत नाही.
मुंबई सारख्या महानगरामध्ये ज्यांनी कामगारांसाठी मोठी चळवळ उभी करून त्यांच्या हक्कांसाठी पूर्ण जीवन खर्ची केले असे रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे या थोर व्यक्तीची त्यांच्या मुंबई या कर्मभूमीत नाव निशाणी किंवा लक्षवेधी स्मारक सुद्धा नसावे हे कामगार चळवळीला भूषणव्य नाही. आज देशभरातील कामगार,कर्मचारी आणि अधिकारी रविवार सुट्टीचा लाभ घेतात.आणि रविवार म्हणजे आपल्या हक्काच्या सुट्टीचा दिवस आहे हे अधिकाराने सांगतात. हा रविवार नेमका कसा आपल्या पदरी पडला?. त्यासाठी कोणी किती संघर्ष केला?..यांची नोंद मात्र घेत नाही. आपल्या सारख्या कामगार लोकांसाठी एक दिवस सुट्टी मिळावी म्हणून आपले संपूर्ण जीवन कोणी खर्ची केले हे आपणास माहीत असायलाच पाहिजे.
भारतीय कामगार चळवळीचे जनक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि कामगार संघटनेचे भारतातील पाहिले कामगार नेते ज्यांनी साप्ताहिक सुट्टी ही शासकीय सहमतीने अंमलात आणली असा क्रांतिकारी कामगार नेत्यांची माहिती बहुसंख्य कामगारांना कर्मचाऱ्यांना नाही. म्हणूनच भारतात जागतिक कामगार दिन साजरा होतो. पण भारतात ज्यांनी कामगारांना रविवारची सुटी व आठ तासाची दिवटी,एक तास जेवणाची सुट्टी मिळवण्यासाठी १८८४ ते १८९० म्हणजे सात वर्षे सनदशीर मार्गाने गिरणी मालक,भांडवलदार व ब्रिटिश सरकारशी संघर्ष केला.त्या नेत्यांचा जय जयकार होत नाही.
नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म १८४८ मध्ये झाला.मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण ठाण्यात झाले आणि पुढे उदरनिर्वाहासाठी मुंबई येथे भायखळा भागात आले व तिथेच ते राहिले. पण दुर्दैव असे की अशा थोर सत्यशोधकाची माहिती ना त्यांनी स्वतः लिहून ठेवली ना अन्य कोणी लिहिली.पण एक शोध पत्रकारिता करणारे झुंझार पत्रकार मनोहर कदम यांनी भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे हे पुस्तक लिहून आताच्या कामगार नेत्यांचे तोडपाणी चे धंदे उघड पाडले. स्वतःच्या चांगल्या नोकरीला लाथ मारून आपले सर्व कुटुंब उपासमारीने होरपळणार आहे हे स्पष्ट दिसत असताना, देशातील लक्षावधी स्त्री-पुरुष कामगारांचे संसार फुलवण्याचे व्रत हयातभर नारायण लोखंडे यांनी स्वीकारले. आणि एकच वेळी गिरणी मालकांच्या दृष्टीने स्वामीद्रोह आणि ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने राजद्रोह स्वीकारला. त्यामुळे केव्हाही काहीही घडण्याची शक्यता असताना नारायण मेंघाजी लोखंडे यांनी सत्यशोधक समाजाच्या कावड झेंड्याखाली कामगारांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला.आणि महात्मा जोतिबा फुले यांची प्रेरणा घेऊन त्यांनी मुंबई मध्ये “बॉम्बे मिलहॅन्डस असोसिएशन” ही भारतातील पहिली कामगारांची संघटना स्थापन केली.
१० जून १८९० साली देशात प्रथमच कामगारांना गिरणी मालका कडून साप्ताहिक सुट्टी मंजूर करून घेतली. हा दिवस म्हणजे भारतातील कामगार चळवळीच्या इतिहासातील सुवर्ण दिवस होय. असंघटित कामगारांची “मुकी बिचारी कुणी हाका” अशी त्या कामगारांची स्थिती त्यावेळी होती. रात्रंदिवस काम करून घ्यायचा आणि त्याबदल्यात अतिशय किरकोळ मजुरी द्यायची आणि एक दिवसाची सुद्धा विश्रांती नाही, ना कोणत्या आरोग्य विषयक सोयी नाही. मरे पर्यंत फक्त काम आणि मिळेल तेवढा मोबदला घेऊन मुकाट्याने जगावं लागत असे.अशा कामगारात जनजागृती करण्याचे आवाहन नारायण लोखंडे यांनी स्वीकारले होते.
आज ही नाका कामगार,घरकामगार, कचरा वेचक कामगार यांच्या बाबत मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पक्ष, संघटना संस्थेचे कार्यकर्ते नेते चांगले बोलत नाही. हे सुधारणार नाहीत हे बेवडे,दारुडे आहेत.त्यांची संघटना बांधणे मूर्खपणा आहे.असे म्हणणारे लोक आहेत.मग नारायण लोखंडे यांनी कोणत्या परिस्थितीत काम केले असेल यांची कल्पना करा.१८७५ मध्ये भारतातील काही महत्वपूर्ण शहरांमध्ये एकूण ५४ गिरण्या चालू होत्या. मुंबईमध्ये हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला होता आणि त्याच बरोबर कामगारवर्ग सुद्धा वाढत चालला होता. ‘दिनबंधूं’ च्या १८९५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंकात नारायण लोखंडे यांनी गिरण्यात काम करणाऱ्या स्त्रिया आणि बालकामगार यांची संख्या देऊन त्यांच्या कडुन किती काम करून घेतले जाते याची तपशीलवार माहिती प्रसिद्ध केली होती.
गिरण्यात काम करणाऱ्या बायकांचा आकडा २५,६८८ इतका होता आणि त्यांच्या कडून सुमारे ९ ते १० तास काम करून घेतले जाई. सुमारे ६,४२४ बालकामगार होते (मुले आणि मुली) ज्यांच्याकडून ७ तास काम करून घेतले जाई. काही गिरण्या सकाळी ५ वाजता सुरू होत आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होत. एखादा कामगार पाच-दहा मिनिटे उशिरा आला की त्याला दंड होत असे. आजारी असल्यामुळे आला नाही तर त्याचा पगार कापला जाई. दीर्घ आजार असला की पैसा नाही म्हणून वाणी धान्य व किराणा देत नसे आणि दिले तर पुढच्यावेळी व्याजासकट तो वसूल करी असा परिस्थितीत कामगार जगत असतांना त्यांची संघटना बांधणी करण्याचे ऐतिहासिक काम नारायण मेंघाजी लोखंडे करीत होते.
१८८४ मध्ये नारायण मेंघाजी लोखंडे यांनी २३ आणि २६ सप्टेंबरमध्ये दोन सभा घेतल्या आणि पाच प्रमुख मागण्या सरकार पुढे ठेवल्या,१) कामाचे तास कमी करावेत २) सर्व कामगारांना आठवड्यातून एक सुट्टी मिळावी.३) जेवणासाठी किमान अर्ध्या तासाची सुट्टी मिळावी.४) कामगारांना पगार वेळेवर व्हावा. किमान मागील महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत व्हावा.५) अपघातात सापडलेल्या कामगाराला नुकसान भरपाई व रजेचा पगार मिळावा. मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन देण्यात यावे असा कामगारांच्या वतीने त्यांच्या मागण्या सादर करणारा जाहीरनामा फॅक्टरी कमिशनला सादर केला. १८९० मध्ये त्यांनी “बॉम्बे मिल हॅन्डस असोसिएशन” ही संघटना स्थापना केली. ज्यामध्ये अनेक नामवंत मंडळी होती. यामध्ये रघु भिकाजी, गणू बाबाजी, नारायण सुर्कोजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे व नारायणराव पवार इत्यादी मंडळी होती.यांनी मुंबईतील कामगारात प्रचंड मेहनत घेऊन जनजागृती केली.आणि २४ एप्रिल १८९० साली महालक्ष्मी रेसकोर्सवर लोखंडे यांनी मोठी सभा घेतली. यामध्ये कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी अशी जोरदार मागणी करण्यात आली.
शेवटी १० जून १८९० रोजी रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. हा कामगारांच्या एकजुटीचा व नारायण मेंघाजी लोखंडे यांचा कुशल नेतृत्वाचा मोठा विजय होता.म्हणूनच भारतातील कामगारांचा पहिला कामगार दिन हा १० जुन १८९० हाच खरा कामगार दिन आहे.
१८९५ साली नारायण मेंघाजी लोखंडे यांना ब्रिटिश सरकारने “रावबहादूर” ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. भारतीय कामगार चळवळीचे जनक असलेले नारायण मेंघाजी लोखंडे यांचे ९ फेब्रुवारी १८९७ रोजी प्लेगच्या साथीत आकस्मितपणे वयाच्या ४९व्या वर्षी दुःखद निधन झाले. अशा या महान सत्यशोधक व्यक्तिमत्वाची संपूर्ण भारतीय कामगार, कर्मचारी अधिकारी यांनी रविवार सुट्टीचा कामाच्या तासाचा आणि वरटाईम लाभ घेतांना आठवण जपली पाहिजे आणि त्यांचा इतिहास आज कामगार कर्मचारी अधिकारी यांना सांगितला पाहिजे.
महात्मा फुलेंच्या विचारांवर “रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे” यांनी १८९० साली भारतामध्ये “बॉम्बे मिल हॅन्डस असोसिएशन " नावाची पहिली संघटना स्थापन केली.त्यांच्यामुळे भारतीय कामगारांना रविवार सुट्टी इतर सोयी सुविधा मिळाल्या त्यामुळेच १० जून हाच भारतीय कामगारांचा कामगार दिन आहे तो कामगार कर्मचारी अधिकारी यांनी दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा करावा. स्वतंत्र मजदूर युनियन वतीने दरवर्षी १० जून हा भारतीय कामगार दिन साजरा केला जातो. सर्व संघटित असंघटित कामगारांनी त्यांच्या संघटना युनियननी १० जून हा भारतीय कामगार दिन म्हणून साजरा केला पाहिजे. कामगार चळवळीचा इतिहास येणाऱ्या पिढीला सांगितला पाहिजे.१० जून १८९० चा रविवार सुट्टीचा १३२ वा कामगार दिन आणि रविवार सुट्टीचा संघर्षाला त्रिवार वंदन आणि रविवारच्या सुट्टीचा लाभ घेणाऱ्या कामगारांना हार्दिक शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे,
९९२०४०३८५९,भांडुप मुंबई,
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.
0 टिप्पण्या