मेरी क्युरी पूर्ण नाव मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी यांचा जन्म नोव्हेंबर ७, इ.स. १८६७ वॉर्सा, पोलंड येथे झाला.४ जुलै १९३४ या दिवशी रेडिएशनमुळे झालेल्या ल्युकेमियाने मृत्यू झाला.एक कणखर महिला शास्त्रज्ञ म्हणून मेरी क्युरी यांचं नाव आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून जगाला स्वतःची ओळख करून दिली आहे. त्यांचा आज स्मृतिदिन यानिमित्ताने केलेला लेखन प्रपंच. आपल्या संशोधनकार्यात मेरी क्युरी यांनी स्वतःला एवढे झोकून दिले होते की, त्यांना इतर कोणत्याही गोष्टीत रस नव्हता. संशोधन कार्यात त्यांना कशाचीही फिकीर नव्हती. तसेच कोणत्याही भौतिक सुखाने त्यांना मोहित केले नाही, हे विशेष.
मेरी क्युरी जगातील महान महिला शास्त्रज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयातील शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा गौरव जगाने केलेला आहे. जगातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून नोबेल पुरस्कार ओळखला जातो. भौतिक शास्त्रात आणि रसायनशास्त्र दोन्ही नोबेल पुरस्कार मेरी क्युरी यांना मिळाला. जगातील दोन नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिली शास्त्रज्ञ मेरी क्युरी ठरली आहे. त्यांनी किरणोत्सर्ग व युरेनियम या विषयातील शोध जगाच्या विकासासाठी अतिशय मोलाचा ठरला आहे. मेरी क्युरी आणि त्यांचे पती प्येरी क्युरी यांच्यातील प्रेमाचे नाते अतूट होते. मेरी क्युरी यांच्या बरोबरीने प्येरी क्युरी असायचे. महिलांना अनेक विषयात शिक्षण घेण्यासाठी मेरी क्युरी यांच्या काळात सुद्धा जगभरात कसरत करावी लागत असे,
कारण अजूनही महिला शिक्षणाबाबत समाज उदासीन दिसून येतो हीच परिस्थिती किंवा यापेक्षाही त्याकाळी वेगळी परिस्थिती नव्हती. परंतु मेरी क्युरी यांनी सर्व बंधने बाजूला ठेवून जगभरात शास्त्रज्ञ म्हणून नाव कमावले आहे. साधी राहणी असलेली मेरी क्युरी अनेकांना आपलीशी वाटत असे. मेरी क्युरी विज्ञानवादी असल्याने, देवावर त्यांचा विश्वास नव्हता. त्या पूर्णतः नास्तिक होत्या. आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा अनेक शास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ असूनही दैववादावर आणि देवावर निरतिशय श्रद्धा ठेवतात.भारतातील शास्त्रज्ञ तर आपण देवामुळेच शास्त्रज्ञ झालो असे मानतात. शोध लावणारे शास्त्रज्ञ असे समजत असतील तर यापेक्षा मोठा दुर्दैव कोणतच नाही.यांच्यासाठी मेरी क्युरी या आदर्श आहेत.वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली.त्यांचे वडील हे शिक्षक होते. लहान वयातच त्यांना वडिलांकडून विज्ञानाचे धडे मिळाले होते. त्यांनी आपले शिक्षण भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांत पूर्ण केले. तसेच त्यांनी भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून देखील काम केले होते.
मेरी क्युरी यांनी रेडीयम आणि पोलोनियम या किरणोत्सारी पदार्थांचा शोध लावला. त्यांनी पहिल्या महायुद्धातील जखमींच्या उपचारासाठी क्ष-किरण गाडी आणि उपकरणे तयार केली. या किरणांमुळे रुग्णांची मोडलेली हाडे आणि त्यांना कुठे गोळ्या लागल्या आहेत हे बाहेरूनच बघू शकतो. आज क्ष- किरणांचा वापर वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो त्याचे सर्व श्रेय मेरी क्युरी यांना जाते.मेरी क्युरी यांनी शोधलेल्या रेडियम चा उपयोग कर्करोगाचा उपचार करण्यासाठी करण्यात येतो. पोलोनिम या पदार्थाचा उपयोग अंतराळातील उपग्रहांमध्ये उष्णता स्त्रोत म्हणून देखील वापर होतो. तसेच याचा वापर स्थिर उर्जा नाहीशी करण्यासाठी, फोटोग्राफिक फिल्म वरील धूळकण साफ करण्यासाठी होतो.मेरी क्युरी यांची मुलगी आयरिन क्युरी ह्या देखील मेरी क्युरी प्रमाणे शास्त्रज्ञ होत्या. आपल्या आई वडिलांचा वारसा त्यांनी योग्यरीतीने पुढे चालवला. आयरिन यांना १९३५ रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.मेरी क्युरी प्येरी क्युरी आणि आयरीन क्युरी या आईवडील व मुलगी यांना नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.
- पदमाकर उखळीकर ,
मो.९९७५१८८९१२ .
0 टिप्पण्या