मुंबई : कोविड-१९ साथीच्या आजारामुळे आणि महागाईमुळे आलेल्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, २०२२ मध्ये तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील २२ हजारांहून अधिक कामगारांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत, तसेच भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील १२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, असे वृत्त क्रंचबेसने दिले आहे. नेटफ्लिक्स, रॉबिनहूड आणि इतर अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्म सारख्या कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत. तसेच, Coinbase, Gemini,
crypto.com, Vauld, Bybit, Bitpanda आणि इतरांसह क्रिप्टोशी संबंधित कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांची संख्या कमी करण्याची घोषणा केली.
अलीकडे, अगदी टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनीही त्यांच्या पगारदार कर्मचार्यांपैकी १० टक्के कपात केली आहे. भारताच्या बाबतीत विचार करता, स्टार्टअप्स क्षेत्रात एडटेक आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये ६० हजारांपेक्षा जास्त नोकऱ्या गेल्या असतील, असे अहवालात म्हटले आहे. इतर स्टार्टअप्सनी आजपर्यंत जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांना काढले आहे. तज्ज्ञांच्या मते ५० हजार नोकऱ्या धोक्यात आहेत आणि २०२२च्या अखेरीस 'पुनर्रचना आणि खर्च व्यवस्थापन' या नावाने स्टार्टअप्सद्वारे कपात केली जाऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात १६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्टअप इंडिया योजनेचे उद् घाटन झाले. चाकोरीच्या पलिकडे जात नवनव्या संकल्पनांची मांडणी करत आणि हव्या त्या क्षेत्रात काही तरी वेगळे करू पाहणाऱ्या देशातील प्रतिभावान तरुणांसाठी ही संकल्पना एकप्रकारे नवचेतना देणारी ठरली.
देशात सहज उपलब्ध झालेले इंटरनेट, सरकारच्या पूरक धोरणांसोबतच नामांकित उद्योजकांकडून मिळालेल्या गुंतवणुकीमुळे स्टार्टअप संकल्पनेला चांगलेच प्रोत्साहन मिळाले. आयआयटी, आयआयएममधून बाहेर पडलेल्या अनेकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यास प्राधान्य दिले. भविष्यातील संधी लक्षात घेता रतन टाटा, अझीम प्रेमजी यांच्यासारख्या उद्योगपतींनीही अनेक स्टार्टअप कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. भारतातील स्टार्टअप क्षेत्राला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळाले, ते कोरोनाकाळात. २०२० मध्ये कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा-दुकाने बंद झाली. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मग धावून आल्या त्या नव्या स्टार्टअप कंपन्या.
कोरोनामुळे संपूर्ण बाजारपेठच बंद असल्याने ग्राहकांकडून स्टार्टअप कंपन्यांच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. वाढता प्रतिसाद लक्षात घेता आणि ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्यात आली. एकीकडे कोरोनामुळे अनेकांवर नोकरी जाण्याची, वेतनकपात होण्याचे संकट असताना स्टार्टअप क्षेत्राला मात्र सुगीचे दिवस होते. ही संधी साधत स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात वाढली. भविष्याचा अंदाज घेता न आल्याने कोरोनाचे सावट ओसरताच स्टार्टअप कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरू झाली. अनेक कंपन्यांचं बाजारमूल्य अधिक झाल्यामुळे मार्केट करेक्शनसाठी त्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यानुसार या कंपन्यांनी खर्चकपात, आर्थिक पुनर्रचनेनुसार कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे.
0 टिप्पण्या