Top Post Ad

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य...अभिमान आहे राष्ट्रध्वजाचा


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ मोहीम केंद्र सरकारने सुरू केली आहे. 2 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री  मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीमध्ये तिरंगा टाकला आणि तमाम देशवासियांना तसे करण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यदिनी 20 कोटी लोकांच्या घरावर तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. देशात आरएसएस प्रणित भाजपचे सरकार आहे. या सरकारने ही मोहीम सुरु केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. कारण  एकेकाळी महाराष्ट्रातील बाबा मेंढे, रमेश काळबे आणि दिलीप चटवानी यांनी नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवण्याचे लक्ष्य ठेवले होते. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या प्रसंगी आरएसएसच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला जात नाही, यावर हा त्रिसदस्यीय पक्ष नाराज होता. यासंदर्भातील वृत्त जनसत्ता या वृत्तपत्राने दिले आहे.

26 जानेवारी 2001 रोजी बाबा मेंढे यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय संघाने आपले ध्येय पूर्ण केले. यानंतर डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराच्या तक्रारीवरून तिरंगा फडकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होण्याच्या वर्षभर आधीपर्यंत हे प्रकरण नागपुरातील कनिष्ठ न्यायालयात सुरू होते. ऑगस्ट 2013 मध्ये न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 नंतर 26 जानेवारी 2001 रोजी आरएसएसच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात आला होता. दरम्यान, 52 वर्षांत आरएसएसने एकदाही मुख्यालयावर ध्वज फडकावला नाही. आरएसएस ही भाजपची मूळ संघटना मानली जाते. सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेही संघाचे प्रचारक राहिले आहेत.

प्रोफेसर शमसुल इस्लाम, ज्यांनी आरएसएसवर एक पुस्तक लिहिले आहे, त्यात असा दावा केला आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी संघाचे इंग्रजी मुखपत्र, ऑर्गनायझर यांनी तिरंग्याचा निषेध करताना लिहिले होते, …हिंदू तिरंग्याचा कधीही आदर करणार नाहीत. तसेच त्याचा अवलंब केला जाणार नाही. तीन आकृती स्वतःच अशुभ आहे. ज्या ध्वजात तीन रंग आहेत, त्याचा खूप वाईट मानसिक परिणाम होतो आणि तो देशासाठी हानिकारक असतो. 

आरएसएसचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांना नरेंद्र मोदी  आपले गुरू मानतात. त्यांच्या बंच ऑफ थॉट या पुस्तकात गोळवलकरांनी तिरंग्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि लिहिले आहे की, आमच्या नेत्यांनी देशासाठी नवीन ध्वज निवडला आहे. त्यांनी ते का केले? ही फक्त फसवणूक आणि कॉपी करण्याचा विषय आहे… भारत हे एक गौरवशाली भूतकाळ असलेले प्राचीन आणि महान राष्ट्र आहे. मग आमचा स्वतःचा झेंडा नव्हता का? या हजारो वर्षात आपल्याकडे राष्ट्रचिन्ह नव्हते का? अर्थात आमच्याकडे होते. मग हा वेडेपणा का? असा सवाल गोलवकरांनी उपस्थित केला होता.

याचा बारकाईने विचार केला असता सध्या हिन्दुत्वाचा नारा बुलंद करण्यात येत आहे. या हिन्दुत्वातच राष्ट्रीयत्वही विलिन करण्याचा डाव सध्या आरएसएस खेळत आहे. केंद्रातील आरएसएस प्रणित भाजपच्या नितीला विरोध करणाऱ्यांना सरळ राष्ट्रद्रोही ठरवले की कोणी त्याबद्दल काही बोलत नाही. कारण हिन्दूद्रोही म्हटले तर कदाचित विरोध होण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी हा राष्ट्रभक्तीचा नारा सध्या बुलंद करण्यात येत आहे. एकदा का माणसं देशभक्तीच्या नशेत झिगायला लागली किं तें त्यांच्या मूलभूत अधिकारांना, स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुत्वता विसरून जातात. आणि मग हक्कासाठीची लढाई सोडून तें धर्माच्या लढाईत गुंतून जातात. हें इथल्या सत्ताधाऱ्यांनी पुरते ओळखले आहे. आणि त्यातूनच लोकांना मूळ मुद्द्यापासून दूर नेत उत्सवात अडकवून ठेवणे हें फार सोपे जाते. 

पण आमची देशभक्ती आंधळी नाही. माझं माझ्या तिरंग्यावर, देशावर आणि देशाच्या संविधानावर प्रेम आहे. आणि तें अखेरच्या श्वासापर्यंत राहील. आणि म्हणूनच या डोळस देशभक्तीतून मी माझ्या देशाला आर्थिक दृष्ट्या हतबल होताना, धर्म आणि जातीच्या विळख्यात अडकत असताना, जागतिक स्तरावर कमजोर होताना पाहत बसणार नाही. तर त्याला अशा पद्धतीने अंधाराच्या खाईत लोटणाऱ्या विरुद्ध आवाज उठवतचं राहील. हिच माझी देशभक्ती ! असा विचार आता प्रत्येक भारतीय नागरिकाने करण्याची गरज आहे. आमच्या मनात खोलवर तिरंगा रुजला आहे. तो स्वातंत्र्या नंतर ७५ वर्षांनी आम्ही रुजवलेला नाही. त्यामुळे तिरंगा कधी आणि कुठे फडकवायचा हे आम्हाला सांगायची गरज नाही. जी व्यक्ती जनतेच्या प्रश्नांची उत्तरं ना संसदेत देते आणि ना पत्रकार परिषदेत; अशा व्यक्तीने आम्हाल तिरंगा फडकवा हे सांगायची गरज नाही. ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रत्येक गोष्टीत चिंधड्या उडवायचा विडा उचलला आहे, अशा व्यक्तीने आम्हाला तिरंगा फडकवा हे सांगायची गरज नाही. 

गरिबांना हक्क म्हणून दिली जाणारी मदत रेवडी म्हणून जी व्यक्ती संबोधते आणि उद्योगपती मित्रांवर जनतेचा पैसा खैराती सारखा उधळते त्या व्यक्तीने तिरंगा फडकवा हे सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांना जी व्यक्ती आंदोलनजीवी म्हणून हिणवते त्या व्यक्तीने आम्ही तिरंगा कुठे आणि कधी फडकवायचा हे सांगण्याची गरज नाही. आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा चूल पेटणे गरजेचे आहे. मुलांना रोजगार मिळणं गरजेचं आहे. उत्तम आणि माफक दरात आरोग्यसेवा मिळणं गरजेचं आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना माफक दरात शिक्षण मिळणं गरजेचं आहे. याकडे दुर्लक्ष करून केवळ एक इव्हेन्ट सुरु करण्यावरच सध्याचं सरकार भर देतं. सध्या जे काही समाजात, देशात सुरू आहे ते बघता येत्या काही वर्षांत ह्या घरांमध्ये राहणारी माणसं तरी टिकतील का हा मोठा प्रश्न आहे. मुळात आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा ती घर टिकणे महत्वाचं आहे. ह्या देशाचा तिरंगा हा आमच्या मनात आहे, आमच्या श्वासात आहे, आमच्या कृतीत आहे; त्याच्यावरील प्रेमाचा असा बाजार मांडायची आम्हांला गरज नाही. आणि तो कोणाच्या तरी सांगण्यावरून तर अजिबातच नाही




तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

स्वातंत्र्य आंदोलनात वंदे मातरम, म्हणत सत्याग्रही  लाठ्याकाठ्या झेलत होते
'इन्कलाब जिंदाबाद!' म्हणत क्रांतीकारक फाशी चढत होते. तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

परदेशी मालाच्या दुकांनासमोर सत्याग्रही निदर्शने करीत होते
परदेशी मालाच्या मोटारीपुढे निजून बाबू गेनू हुतात्मा झाले होते तेव्हा 'तुम्ही' काय करीत होते?

छोडो भारत आंदोलनात शिरीश कुमार आणि त्याचे शाळकरी सवंगडी 
तिरंगा घेऊन हाती वंदेमातरम् म्हणत छातीवर गोळ्या झेलत होते तेव्हा 'तुम्ही' काय करीत होते?

सुभाष बाबू नि आझाद हिंद सेना देशाच्या ईशान्य सीमेवर धडका देत होते
त्याच्या खांद्याला खांदा लावून जपानी सैन्यही आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावून लढत होते
तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

लाल किल्ल्यात  आझाद हिंद सेनेच्या अधिका-यांवर  खटला सुरु होता
त्याविरोधात देशभर जोरदार निदर्शने सुरु होती 
कलकत्याच्या रस्त्यावर  लाखो तरुण रात्रंदिन ठिय्या मांडून बसले होते तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

समाजवादी नेते भूमिगत होऊन  रेडिओ केंद्र चालवत होते प्रचारप्रसार करत
बेचाळीसच्या चळवळीत  प्राण फुंकत होते तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

जवळच साता-यात  क्रांतीसिंह नाना पाटील  'पत्री सरकार' चालवत होते
शिवरायांचा कित्ता गिरवत होते तेव्हा 'तुम्ही' काय करीत होते?

फाळणीच्यावेळी दंगली शमवण्यासाठी गांधी स्वतःचा जीव धोक्यात घालून
वणवण हिंडत होते तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

दंग्यात बळी पडलेल्यांची दिल्लीच्या रस्त्यावरची  बेवारस प्रेतं लेडी माउंट बॅटन उचलित होती
पंजाबात बेवारस प्रेतांच्या सामुदायिक अंत्यविधीसाठी सोल्जर घरोघरी जाऊन 
अश्वत्थाम्यासारखे रॉकेल मागत होते तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

स्वातंत्र्यदिनी सरकार  शाळाशाळात देशभर  मिठाई वाटत होते
लोक आनंदोत्सव साजरा करत होते तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

गांधी हत्येनंतर अवघा देश  शोकसागरात बुडाला होता कानाकोपऱ्यातून जगाच्या शोकसंदेश येत होते
दु:खद प्रसंगी परकेही दु:खात सहभागी झाले होते तुम्ही तर घरातलेच होते तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

प्रत्येक ठिकाणी जरी नाही कुठेना कुठे तरी तुमची हजेरी कशी दिसली नाही.
या धगधगत्या पर्वाची साधी धगही तुम्हाला  कशी जाणवली नाही 
पूलाखालून एवढे पाणी वाहून गेले तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

सत्तेवर आल्यापासून येताजाता सैन्य सीमेवर लढते आहे
हे एकच तुणतुणं तुम्ही वाजवताहेत गेली साठ वर्षे सैन्य  सीमेवर काय झोपा काढत होते?

देश स्वतंत्र झाला तेव्हापासून सैन्य सीमेवर लढत आहे चीनी पाकिस्तानी आक्रमण, 
आणि बांगला देश युद्धातही सैन्य सीमेवर लढत होते मर्दुमकी गाजवत होते 
त्यांच्या मदतीसाठी माताभगिनी  अंगावरचे दागिने काढून देत होत्या
सैन्याला पुरेसा तांदुळ मिळावा म्हणून लोक भात खाणे वर्ज्य करत होते तेव्हा तुम्ही काय करत होते?

अपघाताने सत्ता मिळताच देशभक्तीचं उसनं अवसान तुम्हाला आलं कुठून?
स्वतःच्या खात्यावर देशभक्तीचं शून्य क्रेडीट असताना 
लोकांच्या देशभक्तीची उठाठेव करायचं धाडस आलं कोठून?
तुम्हाला इतिहासाचं विस्मरण झालं तरी ज्यांच्या पूर्वजांनी देशासाठी लाठ्याकाठ्या झेलल्या रक्त सांडलं
ते इतिहास कसा विसरतील ते तुम्हाला जाब विचारणारच आमचे बापदादे जेव्हा इतिहास घडवत होते
तेव्हा 'तुम्ही' काय करत होते?

काय करत होते? ...  काय करत होते?? ... काय करत होते???

सुभाषचंद्र सोनार,राजगुरुनगर.
दि. २९.११.२०१६        ( रिपोस्ट दि.०९.०८.२०२२ )






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com