गोविंदांना आर्थिक मदत देणे समजते, पण त्यांना क्रीडा कोट्यातील सरकारी नोकऱ्या देण्याचे निकष काय? ते पुढे म्हणाले की, शैक्षणिक पात्रतेचे निकष काय असतील, त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डचे काय होईल. हा निर्णय घेण्यापूर्वी क्रीडा विभागाचाही सल्ला घेण्यात आला नसल्याचे सागंत, सरकार व्यक्तीच्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकत नाही असे स्पष्ट मत व्यक्त करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी शिंदे सरकारवर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांनी “गोविंदा” ना शासकीय नोकरीत ५% आरक्षणाची घोषणा केली आहे. दहीहंडीला अगोदर साचेबद्ध पद्धतीने क्रीडाप्रकारात आणणे, त्यानंतर गोविंदा खेळाडूचे प्रमाण ठरवणे, खेळाला आणि खेळाडूला कागदोपत्री दर्जा प्राप्त करून देणे यासारख्या अनेक गरजेच्या बाबी यात आहेत , असे असताना अविचारीपणाने अश्या घोषणा करणे म्हणजे वर्षानुवर्ष या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांवर अन्यायकारक असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करत, उठसूठ आरक्षणे वाटणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज रोड येथे “जाहीर निषेध आंदोलन” करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अगोदरच पदोन्नतीचं, ओबीसीच, मराठा , मुस्लिम वर्गाचं आरक्षण हे विषय प्रलंबितच आहेत.त्यात केवळ दिखाऊपणा म्हणून अश्या घोषणा करत विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी गोट्या, भावरा, ल्युडो असे खेळत आरक्षणाची मागणी केली तर मंगळागौर खेळणाऱ्या स्त्रियांनी व डोंबाऱ्याचा खेळ खेळणाऱ्या कुटुंबाने देखील नोकरीत आरक्षण मिळावे अशी मागणी केली . या आंदोलन प्रसंगी युवती सेलच्या अध्यक्षा सुष्मा सातपुते, माजी नगरसेविका सौ.सायली वांजळे, प्रवक्ते प्रदीप देशमुख,महिला शहराध्यक्षा सौ.मृणालिनी वाणी,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर,विद्यार्थी शहराध्यक्ष विक्रम जाधव,महेश हांडे,अब्दुल हापिज, मंगेश मोरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे शहर विभागाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले की, राज्य सरकार राजकीय घोषणा करत असताना, ज्या सरकारी नोकऱ्यांसाठी मूलभूत पात्रता आवश्यक आहे, अशा विशिष्ट पदासाठी दहीहंडी सहभागींची पात्रता कशी ठरवणार, हे सरकारने आधी स्पष्ट करावे. ते पुढे म्हणाले की, मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये दहीहंडीचे आयोजन केले जाते, त्यामुळे ही राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांची फसवणूक आहे.
0 टिप्पण्या