Top Post Ad

महाराष्ट्राचे मारेकरी ओळखा


 इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी आवश्यक असणारी सेमीकंडक्टर म्हणजेच चीपनिर्मितीत जगात तैवान आघाडीवर आहे. भारतात चीप निर्मितीचा एकही प्रकल्प नाही. म्हणूनच यासाठी भारतात काम सुरू होते. या प्रकल्पासाठी वेदांत आणि फोक्सकॉन लिमिटेडकडून हालचाली सुरू असताना महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये हा प्रकल्प आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प अहमदाबादजवळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा प्रकल्प राज्यात सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता निर्माण करणार होता. त्यामुळे लाखो मुलांना रोजगार मिळाला असता. त्याला अनुसरुन अनेक छोटे-मोठे उद्योग उभा राहिले असते.

मात्र मागील काही वर्षात महाराष्ट्राला चकवा देत इतर राज्याकडे गुंतवणूकीचा  कल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत गुजरातकडे महाराष्ट्रातील अनेक उद्योग, गुंतवणूक जात असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात. अगोदरच्या काळात देवेंद्र फडणवीस तर आता शिंदे-फडणवीस सरकार गुजरातला  हातभार लावत असल्याचा आरोपही केला जातोय.  ‘वेदांता’ ग्रुप  व तैवान येथील ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळली आहे. यारूनच विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवरला धारेवर धरले आहे. कारण, महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा प्रकल्प राज्यात लाखो रोजगारक्षमता निर्माण करणार होता. 

मविआ सरकारच्या काळात उद्धवजी ठाकरे, सुभाष देसाई आदित्य ठाकरे व इतर संबंधित लोकांनी २०२०-२१ कालावधीत वेदांता-फॉक्सकॉन कंपनीसोबत बोलणी केली. अनेक बैठका झाल्या. वेदांता-फॉक्सकॉन ने महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक क्लस्टर झोनमध्ये तब्बल १.६ लाख कोटींचा सेमीकंडक्टर निर्मिती आणि जोडणी प्रकल्प स्थापित करायचं ठरवलं होतं. सर्व कार्यवाही फायनल करण्यात आली होती.  या प्रकल्पातून सर्व संबंधित घटकांद्वारे साधारण दीड लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात ठोस रोजगार उपलब्ध होणार होता. पुणे व आजूबाजूच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार होतं. क्षेत्रातील ट्रक-टेम्पो व इतर वाहतूक व्यावसायिकांना रोजगार मिळणार होता. महाराष्ट्र राज्याला महसूल मिळणार होता.  

परंतु, शिवसेनेतून गद्दारी करुन बाहेर पडलेल्या आमदारांमुळे महाराष्ट्रात सत्ता बदल झाला. भाजपने शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. (सदर सत्ता स्थापनेच्या कायदेशीर वैधतेचं प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे.) आणि महाराष्ट्र होऊ घातलेला इतका मोठा प्रकल्प अतिशय गुप्तता पाळत गुजरातला वळवण्यात आला. वेदांता-फॉक्सकॉनने आपण हा प्रकल्प गुजरातमध्ये करत आहोत हे घोषित करेपर्यंत शिंदे-भाजप तर्फे कोणत्याही प्रकारची माहिती कोणासही दिली गेली नाही. ही सर्व प्रक्रिया एका रात्रीत घडलेली नाहीय. कोणीतरी संपूर्ण महाराष्ट्राच्या मुळावर उठलंय. महाराष्ट्राची, महाराष्ट्रातील युवकांची रोजगाराची संधी कटकारस्थान करून हिरावून घेण्यात आलीय. महाराष्ट्र राज्याचा महसूल हक्क जाणिवपूर्वक डावलण्यात आलाय. आणि हे सर्व उघड्या डोळ्यांनी हताशपणे पाहण्याशिवाय महाराष्ट्रातील बेरोजगार सुशिक्षित तरुण काहीही करु शकत नाही.  'या या या आमच्या बोकांडी बसा ' या अविर्भावात कोणाला डोक्यावर बसवलंय, हे समजलं तरी आता उशीर होत चाललाय. 

महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प आता गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातील गुंतवणूक ही सुमारे दीड लाख कोटींच्या घरात असल्याचे कळते. आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील या मविआमधील महत्त्वाच्या , जबाबदार नेत्यांनी यासंदर्भात सविस्तर लिहून मविआ सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न केले होते पण हे नवीन सरकार आल्यावर प्रकल्प गुजरातला दिला गेला असा आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे महत्त्वाचे प्रकल्प असे गुजरातला देणे हा प्रकार संतापजनक आहे. याबाबतीत शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. पक्षाच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राचे हित जपणे हे राज्य सरकारमधील मंत्र्यांचे कर्तव्य असते. गेल्या सरकारने महाराष्ट्रात आणलेला इतका महत्त्वाचा प्रकल्प या सरकारच्या कृपेने गुजरातेत गेला असेल तर हे स्पष्टपणे महाराष्ट्रद्रोही वर्तन आहे.

सध्याचे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही विकासाची आरोळी हाकत फिरत असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, मविआ सरकारमध्ये विकासकामे होतच नव्हती, कारण तेव्हाचे मुख्यमंत्री वेळ देत नसत, घरी बसत असत, वगैरे! मग आता अठरा तास कामे करणारे, सतत फिरतीवर असणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाभलेले असताना इतका महत्त्वाचा प्रकल्प गुजरातेत कसा गेला बरं? की गुजरातमध्ये असलेली निवडणूक बघून फडणवीसांनी पक्षाचे हित हे महाराष्ट्राच्या हितापेक्षा महत्त्वाचे मानले आहे? असे असेल तर मुख्यमंत्र्यांना तरी महाराष्ट्राच्या हितासाठी यात लक्ष घालायची बुद्धी झालीच नाही की कसे?

सध्या देशात रोजगार आधीच कमी झाले आहेत. सुशिक्षित तरुणांना रोजगार संधी न मिळणे हा अत्यंत चिंतेचा मुद्दा बनला आहे. असे असताना महाराष्ट्रात होऊ घातलेल्या इतक्या मोठ्या गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरातला आंदण देऊन टाकणारे लोक महाराष्ट्रातील तरुणांना फक्त डीजेवर मिरवणुकीत नाचायला लायक समजतात काय? असे राज्याचे हित साधू न शकणारे आणि सण-उत्सवांना हजेरी लावत भटकत फिरणारे मंत्री महाराष्ट्राच्या नक्की काय कामाचे? खोके फिरवून, माणसे फोडून सरकारे बनवता येतात, महाशक्तीची साथ आणि सुस्त कोर्टांचा आशीर्वाद असल्यावर ती तशीच चालवताही येतील! पण आपल्या पक्षाचे निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातवर माया दाखवायचे महाराष्ट्रद्रोही वर्तन करणाऱ्यांची नोंद हा महाराष्ट्र त्याच्या रोजनिशीत ठेवणार आहे हे लक्षात ठेवा!! -  मकरंद देसाई



वेदांतचा हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी आम्ही मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो. यासाठी अनेक बैठका घेतल्या. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे जवळपास ९५ टक्के निश्चित झाले होते. वेदांत कंपनीने पुण्याजवळील तळेगाव येथे प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्चित केली होती. सर्वकाही सकारात्मक घडत असताना, एवढा मोठा प्रकल्प गुजरातला कसा काय गेला? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत १०७ इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून ७० हजार ते १ लाख रोजगार निर्माण होणार होते. सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. हे वातावरण महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगलं नाही. आगामी काळात क्युबिक, एअर बस किमान हे प्रकल्प तरी महाराष्ट्रात यावेत, अशी आमची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वेळीही मुंबईतील अनेक उद्योग अहमदाबादला गेले. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके, असं हे सरकार आहे. - आदित्य ठाकरे.

आमचे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल आणि फॉक्सकॉनसोबत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थित होती. यामध्ये सरकारकडून ज्या सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील, असे मी त्यांना म्हटले. पुण्यातील तळेगावजवळील ११०० एकर जमीन यासोबतच ३० ते ३५ हजार कोटींच्या सवलतीसह अनुदान व अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर केल्या होत्या. त्यामुळे सरकार म्हणून आम्ही कुठेही कमी पडलो नाही. मात्र गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता तो कमी पडला असावा.”, - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करून खजिना महाराष्ट्रात आणला होता आणि आताचे राज्यातील शासक इथे होवू घातलेला एवढा मोठा प्रोजेक्ट आणि महसूल गुजरातला देवून आले. फरक स्पष्ट व्हावा एवढाच शुद्ध हेतू.”, असे ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

फॉक्सकॉन-वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला.ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल करत हा प्रकार गंभीर आहे.म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं.अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं.- राज ठाकरे.

वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे. महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गुजरातच्या निवडणूका तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. तसेच महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?  - जयंत पाटील 

-“प्रस्थापित मविआ सरकार पाडून, सुरत-गुवाहाटी फिरून, हिंदुत्वाचा बनावटी चेहरा घेऊन ईडी सरकार सत्तेत आले. आणि आमच्या सरकारच्या काळात मंजूर झालेला फॉक्सकॉन-वेदांता हा इतका मोठा महाराष्ट्रातील प्रकल्प आता गुजरातला हलवण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या सुमारे 1 लाख नोकऱ्या गुजरातच्या घशात गेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांना मोदी- शहा यांचा हस्तक होणे मंजूर आहे, ते याचसाठी का?”, नाना पटोले यांचे ट्वीट



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com