शीख हा स्वतंत्र धर्म नाही. तो हिंदूंचाच एक पंथ आहे. मुस्लिम आक्रमणापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी तो निर्माण करण्यात आला. अशा प्रकारचा प्रचार म्हणजे इतिहासाचा गैरवापर धर्मवादासाठी करण्याच्या आरएसएस परिवाराच्या धोरणाचे आणखी एक उदाहरण आहे. शीख धर्म कसा अस्तित्वात आला ते आपण पाहू या.
एका बाजूला ब्राह्मणी वर्चस्व आणि दुसऱ्या बाजूला भक्ती आणि सूफी संप्रदायातील संतांची शिकवण या पार्श्वभूमीवर गुरु नानक यांनी १७ व्या शतकात आपल्या उपदेशास सुरुवात केली. ब्राह्मणी मूल्ये आणि जातीचे प्राबल्य नाकारून गुरु नानकाने सूफी आणि भक्ती संप्रदायाची शिकवण वेगळ्या स्वरूपात पुढे केली. मात्र त्यातला आशय कायम ठेवला. मुस्लिम सूफिंच्या (प्रामुख्याने शेख फरिद) आणि संत कबीरापासून गुरु नानक यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी एकेश्वरवादी आणि पूर्ण श्रद्धेची शिकवण दिली. त्याची भजने वेगवेगळ्या स्त्रोतातून आली आहेत. हिंदू आणि मुस्लिम समाजांकडून वेगळा इतिहास असणारा एक चिरस्थायी समाज गुरु नानकाच्या शिकवणुकीतून निर्माण झाला. तो हिंदू आणि मुसलमानांपासून वेगळा होता. त्यात हिंदू आणि मुसलमांनाना समान असलेली तत्वे होती. नानकांनी हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजातल्या सनातन्यांवर टीका केली. त्यांच्या उपदेशात हिंदूंच्या कर्म सिद्धांताला नवा आशय दिला तर मुसलमानांचे देवाचे एकत्व आणि सामूहिक प्रार्थना यांचा स्वीकार केला.
नानकानंतर शिखांचे ९ गुरु झाले. ५ वा गुरु अर्जनच्या काळात शीख समाज स्वतंत्र धार्मिक समाज म्हणून मान्यता पावला. त्याने त्याच्या गुरुंचे, त्याचे स्वतःचे हिंदू आणि मुस्लिम संतांचे लिखाण आदि ग्रंथात एकत्र केले. तो शीखांचा प्रमुख मार्गदर्शक ग्रंथ समजला जातो. मधल्या काळात गुरुंच्या प्रयत्नाने अमृतसर धार्मिक आणि व्यापारी केंद्र बनले. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सूफी संत मिया मिर याला सुवर्ण मंदिराची कोनशिला बसविण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी शीख धर्माची संघटना राजकीय चळवळ बनत होती. त्यांचे मोगल सम्राटाशी असलेले संबंध अत्यंत गुंतागुंतीचे बनत चालले होते. गुरु अर्जन हा महत्वाचा राजकीय आणि धार्मिक नेता बनला होता, तो सामाजिकदृष्ट्या मिया मिरच्या जवळ होता. आणि त्यावेळी त्याचा मुख्य विरोधक, जो लाहोरच्या गव्हर्नरचा हिंदू अर्थमंत्री होता. सतराव्या शतकात शीख समाजाचे लष्करीकरण झाले. गुरु मोगल राजकारणात शिरले. ते तिथे ज्या गटात राहिले त्या गटास वारसा मिळवण्यात अपयश मिळाले. सुरुवातीला १६०६ मध्ये गुरु अर्जनने शहजादा खुसरोची जवळीक केली. खुसरोने त्याचा बाप जहांगीरविरुद्ध बंड केले. गुरु अर्जन सिंगाला खुसरोला पाठिंबा दिल्याच्या संशयाने अटक करण्यात आली.
अन्य एक गुरु हरी राय यांनी शहाजहानचा मुलगा दारा शुको याच्याशी संबंध स्थापित केले. दारा शुकोचा औरंगजेबाने पराभव केला. मोगल घराण्याच्या सत्ता समीकरणात गुरु हरी राय पराभूत बाजूने पुन्हा एकदा जोडले गेले. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाला माफीची बोलणी करण्यासाठी दिल्लीला पाठवावे लागले. मोगल राजघराण्याशी वितुष्टाचे हे चक्र चालून राहिले. १० वे गुरु गोविंद सिंग यांच्या काळात हे वितुष्ट टोकाला पोहोचले. गुरु गोविंद सिंगाना स्वतःचे राज्य स्थापन करावयाचे होते. तर औरंगजेब मोगल साम्राज्याविरुद्धचे कोणतेही बंड पाशवीपणे मोडून काढत होता. गुरु गोविंदसिंगांची पहिली चकमक विलासपूरच्या राजाशी झाली. कारण त्याना तो कोणताही मान देण्यास तयार नव्हता. त्यात झालेल्या युद्धात विलासपूरचा राजा पराभूत झाला. त्यामुळे पहाडी प्रदेशातल्या अनेक राजांचे गुरु गोविंदसिंगांशी वितुष्ट आले. पठारावरील अनेकांशी गुरु गोविंदसिंगांचा सलोखा होता. त्यात प्रामुख्याने साधुऱ्याच्या पीराचा समावेश होता. औरंगजेबाने पठारावरील हिंदू राजांच्या मदतीने संयुक्तपणे हल्ला करून गुरु गोविंद सिंगाना आनंदपूरहून पिटाळून लावले. लढाईत त्यांची मुले पकडली गेली आणि त्यांचा छळ केला गेला. काही काळाने औरंगजेबाने गुरु गोविंद सिंगाना दक्षिणेत भेटायला बोलावले. त्या सुमारास औरंगजेबाचा मृत्यू झाला. परंतु मोगल सुलतानाबरोबर सलोख्याची बोलणी चालून राहिली. आणि कालांतराने गुरु गोविंदसिंगानी औरंगजेबाचा मुलगा बहादुरशाह जफरबरोबर युती केली.
मोगलांबरोबर कधी हार कधी जीत होणाऱ्या लढायाही चालूच राहिल्या. त्याचबरोबर केलेले समेटही नेहमीच तुटत राहिले. मोगल राजे हिंदू राजांबरोबर युती करीत तर गुरु गोविंदसिंग मुस्लिम राजे आणि पीरांबरोबर युती करीत. ती राजकीय लढाई होती. त्यात धार्मिक तत्त्वे मिसळून गेली. ज्या गुरु गोविंदसिंगाचे औरंगजेबाबरोबर वितुष्ट आले, त्याच गुरु गोविंदसिंगानी औरंगजेबाचा मुलगा बहादूरशहा जफरबरोबर युती केली.
आरएसएसचे ध्येय हिंदू राष्ट्र आहे. या ध्येय पूर्ततेसाठी हिंदुत्वाचे तादात्म्य पुढे केले तरच हिंदूंची एकजूट होईल असे ते ठासून सांगतात. त्यातूनच उपखंडातले सर्व धर्म हिंदू पंथ ठरविले जातात. पूर्ण स्वतंत्र धर्म नव्हे. कारण ते हिंदू राष्ट्रनिर्मितीला अडचणीचे होईल. बौद्ध असोत, जैन असोत की शीख, संघ ते हिंदूचेच पंथ आहेत असे तत्परतेने सांगतो. हे तिन्ही धर्म मुख्यत्वे ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध करण्याच्या हेतूने स्थापले गेले आहेत. आरएसएसचा हिंदू धर्म म्हणजे केवळ ब्राह्मण्यवाद आहे. जे आरएसएसला विरोध करतात, जे आरएसएसच्या विरुद्ध आहेत त्यांना आरएसएसच्या या ब्राह्मणी वर्चस्वाच्या योजनेची पूर्ण कल्पना आहे. या योजनेचा प्रचार करण्यासाठी आरएसएस आणि सध्याचे भाजपचे युती सरकार आपली शक्ती आणि साधने वापरीत आहे. भारत एक राष्ट्र म्हणून केवळ हिंदू म्हणूनच संघटित होऊ शकतो असा यांचा दावा आहे. या उलट भारतीय राष्ट्रवादाच्या कमानीखाली भारतीय नागरीक एक झाले आहेत. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ठरविण्याचा आरएसएसचा प्रयत्न केवळ अल्पसंख्यांक आणि दलित यानांच धोक्याचा नसून शीख आणि बौद्ध यांनाही धोक्याचा आहे. त्यामुळेच आरएसएसशी संबंधित असलेल्या सिंघल याने शीख धर्म हा हिंदू धर्माचाच एक पंथ आहे असे म्हणताच त्याला फार तीव्र विरोध झाला.
गुरु गोविंदसिंगांचा मोगलांबरोबर संघर्ष ठळकपणे सांगणे आणि त्याचे मुस्लिम राजांशी असलेले युतीचे संबंध लपविणे, हा सोयीस्कर इतिहास मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण करण्याच्या कार्यक्रमाचा भाग आहे. त्याचसाठी ते गुरु गोविंदसिंगांच्या हिंदू राजांबरोबर झालेल्या लढायांकडे म्हणजे त्या इतिहासाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. हिंदू राष्ट्रवादाच्या पूर्ततेसाठी इतिहासाचा विपर्यास करण्याचे हे अनेक उदाहरणांपैकी हे एक आहे.
-राम पुनियानी
0 टिप्पण्या