Top Post Ad

मृत्यूनंतर पिंडदान, केस कापणे मूर्खपणा- -डॉ. श्रीमंत कोकाटे


सजीवांची निर्मिती नैसर्गिक प्रक्रियेतून झालेली आहे, त्याला ईश्वराने निर्माण केलेले नाही, असे मानवशास्त्रज्ञ (Anthropologist) सांगतात. मृत्यूनंतर देखील तो स्वर्गात, नरकात किंवा वैकुंठात जात नाही, तर त्याचे पृथ्वीवरच विघटन होते. महान दार्शनिक चार्वाक, महावीर, बुद्ध, संत तुकाराम महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांनी स्वर्ग-नरक, वैकुंठ, आत्मा, पूर्वजन्म-पुनर्जन्म इत्यादी बाबी नाकारलेल्या आहेत. चार्वाक, महावीर आणि बुद्ध हे महामानव अनित्यतावादी, अनात्मवादी आणि निरीश्वरवादी होते. गरिबांना स्वर्गाचे आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वार्थी लोकांनी स्वर्ग-नरक, आत्मा या खोटारड्या बाबी निर्माण केल्या. संत तुकाराम महाराज म्हणतात

*येथे मिळतो दहीभात l वैकुंठी नाही त्याची मात*
काबाडकष्ट केले तर पृथ्वीवर दहीभात, चटणी भाकरी मिळेल. आपल्याला जे स्वर्गातील कामधेनू, कल्पवृक्ष, चिंतामणी सांगितले जातात, ते पूर्णतः काल्पनिक आहे. हे सांगण्यामागे खोटारडेपणा आहे. संत तुकाराम महाराज सांगतात "प्रयत्न करा, कष्ट करा. कामधेनू, कल्पवृक्ष, चिंतामणी या काल्पनिक गोष्टींच्या मागे धावू नका". पुढे ते सांगतात
*भय नाही जन्म घेता l मोक्षपदा हाणो लाथा ll*
*तुका म्हणे आता l मज न लगे सायुज्यता ll*
संत तुकाराम महाराज म्हणतात, "या जन्माची मला भीती नाही. किती जरी संकटे आली तरी मी त्याच्यावरती मात करीन. गरिबी आली तरी मी मागे हटणार नाही. संकटाने मी नाउमेद होणार नाही. या जन्माची मला भीती नाही. मला मोक्ष नको. मोक्षाला लाथा घाला. मोक्षातील अतिउच्च पद सायुज्यता हे पद देखील मला नको." समिपता, सलोखता, सलिलता आणि सायुज्यता हे मोक्षाचे चार प्रकार सांगितले जातात. त्यातील सायुज्यता हा मोक्षाचा अत्युच्च प्रकार आहे. त्या मोक्षाला लाथा घाला, तो मोक्ष मला नको. मला पृथ्वीवरील संघर्षमय असेल, अनुकूल किंवा प्रतिकूल जीवन असेल, तेच मला आवडते, असे संत तुकाराम महाराज निक्षून सांगतात. वरील अभंगावरून स्पष्ट होते की संत तुकाराम महाराज हे स्वर्ग-नरक नाकारणारे होते.
संत तुकाराम महाराज म्हणतात "मृत्यूनंतर पिंडदान, तेरवी, पितृपंधरवडा करण्यापेक्षा जिवंतपणे आई-वडिलांना सांभाळा, त्यांचा आदर-सन्मान करा."
*भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान l हे तो चाळवाचाळवी केले आपणच जेवी ll*
आपल्या वाडवडिलांचे निधन झाल्यानंतर आपण तेरवी करतो, पिंडदान करतो, केस कापतो, नैवेद्य दाखवतो आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची वाट पाहतो. आपले आई-वडील कावळे होते काय? कावळ्याची पर्सनॅलिटी आणि आपल्या आई-वडिलांची पर्सनॅलिटी कुठेतरी साम्य आहे का? कोणी केला आपल्या आई-वडिलांचा कावळा? याबद्दल चीड यायला हवी. ती चीड संत तुकाराम महाराजांना आली. एका कावळ्याने घास शिवला तर आपण समजू शकतो. चार-पाच कावळ्यांनी घास शिवला तर याचा अर्थ काय घ्यायचा? ही आपल्या माता-माऊल्यांची बदनामी नाही काय? म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात
*तुका म्हणे मायबापे l अवघी देवाचीच रूपे ll*
*आई-वडील तुझ्यापाशी l कशाला करतो काशी ll*
आई-वडील हे सर्वात मोठे दैवत आहे. त्यांची सेवा करणे, आदर-सन्मान करणे, त्यांना जिवंतपणी उत्तम प्रकारे सांभाळणे, हीच खरी भक्ती आहे. आई वडील हे काशीपेक्षाही सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. काशी हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, त्याबद्दल जरूर श्रद्धा बाळगावी; परंतु काशीला गेल्यानंतर तेथे स्नान केल्यानंतर पापक्षालन होते आणि पुण्यप्राप्ती होते, असे समजणे अज्ञानपणाचे आहे. आई वडिलांची सेवा हेच खरे पुण्य आहे. घरी आई-वडील सोडून तीर्थयात्रा करणे, पुण्यप्राप्तीसाठी काशीला जाणे, मृत्यूनंतर पिंडदान करणे, कावळ्याला वाडवडील समजून नैवेद्य दाखवणे, केस कापणे मूर्खपणा आहे. दिवंगत पितरांबद्दल जरूर आदर बाळगावा, त्यांच्या प्रतिमांचे पूजन करावे; परंतु ते स्वर्गातून खाली येणार आहेत, असे समजणे अज्ञानपणाचे आहे. पितृदोष असल्याचे सांगून नारायण नागबळी - विधी करून पैसा उकळणे हा धर्माच्या नावाखाली टाकलेला धार्मिक दरोडा आहे.
*-डॉ. श्रीमंत कोकाटे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com