Top Post Ad

वाद सत्तांतराचा की.... संपवण्याचा....?


 सत्तांतराचा फार्स सुरु असताना आणि सत्तांतर झाल्यानंतरही शिवसेना आणि शिंदेगट एकमेकांवर केवळ टिकाच करीत होते. याला कारणही तसेच होते. दस्तुरखूद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पूर्वीप्रमाणे कोणीही काही करू नका, त्यांना जे करायचे ते करू द्या, असे सांगत मला रक्तपात नको हे सुरुवातीलाच जाहिर केले होते. नाहीतर सत्तांतर नाट्याच्यावेळी कदाचित शिवसेना स्टाईल भारी पडली असती. म्हणूनच की काय केंद्रातील फौज महाराष्ट्रात येऊन थडकली होती. असो त्यावेळेस शिवसेनेने दाखवलेला संयम सर्वसामान्य जनतेला आपलंसं करून गेला. आधीच कोरोनाच्या महामारीने त्रस्त असलेली जनता आता पुन्हा महाराष्ट्रात काही अघटीत होतय की काय यात विचारानेच भयभीत झाली होती. पण तो काळ संयमाने पुढे सरकला  मात्र आता बुलढाण्यात शिवसेना आणि शिंदेगट आपआपसात भिडला आणि संघर्षाची ठिणगी पडली आहे.  विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच हा राडा झाल्याने पोलिसांना अखेर लाठीचार्ज करत जमावाला पांगवावे लागले. 

त्याचे पडसाद मुंबईत उमटतात की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. ते म्हणजे शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा. सध्या मुंबई महानगर पालिकेत प्रशासकीय सत्ता आहे. प्रशासकीय सत्ता अर्थातच ज्यांच्या हातात राज्याची सत्ता त्यांचीच ते रि ओढणार हे आपण केंद्राची सत्ता आपल्या सर्व यंत्रणाचा कसा वापर करते हे पहातच आहोत. चारही बाजूने शिवसेनेची कोंडी होत असताना आता दसरा मेळावा देखील हायजॅक होतोय की काय असे वातावरण तयार झाले आहे. सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिकांचे मात्र मुंबईतील शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा कोण आयोजित करणार याकडे लक्ष लागले आहे. 

हा वाद सुरु असतानाच कल्याणमधील एका गणपती उत्सव मंडळाने शिवसेनेच्या निष्ठेवर उभारलेल्या देखाव्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणमधील शिवसैनिक आणि कल्याण डोंबिवली शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अनिल काकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बंडखोरीच्या विषयावर थेट खुले पत्र लिहिले आहे.  

या पत्रात ते म्हणतात,  माझे काय चुकले? असा प्रश्न आपण विचारत असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तुमचे एवढेच चुकले कि तुम्ही पक्षाचे धोरण आणि आदेश कसाही असला तरी निष्ठावंत म्हणून पाळायला पाहिजे होता. यासाठी फडणवीस साहेबांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून राहण्याचा पक्षाचा आदेश आला. त्यांनी तो पाळला. आपणांस पक्षाचे धोरण मान्य नसेल तर नैतिकता म्हणून आमदारकीचा राजीनामा देवून पक्ष सोडायला पाहिजे होता. तुमचे तसे न करणे हिच तुमची चूक आहे. त्यामुळेच गद्दार हा शिक्का तुमच्या कपाळावर कायमचा बसला आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुमचा उल्लेख गद्दार असाच होईल. तुम्ही म्हणता कि आम्हाला गद्दार म्हणू नका. पण जेव्हा संपूर्ण ठाणे जिल्हा तुमच्या ताब्यात होता आणि ग्रामपंचायत ते महानगर पालिकेच्या निवडणूकीत तुम्ही तिकिट वाटप करत होता. तेव्हा तुमच्याकडूनही अनेकांवर अन्याय झाला. पण त्यांना न्याय देण्याची भाषा करण्याऐवजी त्याने केलेल्या बंडखोरीनंतर किंवा त्याने उमेदवाराच्या विरोधात काम केल्यानंतर आपण स्वत त्याला गद्दार असे संबोधून धर्मवीरांची गद्दारांना क्षमा नाही अशीच भाषा वापरत होता हे आपण कसे विसरता ?  आपली स्वतची राजकीय सुरुवात सामान्य शिवसैनिक म्हणून झाली असल्याने नेत्यांनी किमान आपले ऐकून तरी घ्यावे अशी अपेक्षा असते हे आपणास ठाऊक आहे. अन्याय झाल्यावर त्याच्या मनाची घालमेल आपणांस ठाऊक आहे. पण आपण सामान्य शिवसैनिकांचे फोनही उचलत नसत. याबाबत वृत्तपत्रांनी बातम्याही प्रसिद्ध केल्या. परंतु तरीही आपल्या कार्य पद्धतीत बदल झाला नाही. सामान्य निष्ठावंत शिवसैनिकाचा फोन म्हणजे तुम्हाला अवघड जागेवरचे दुखणे तर ठेकेदार, बिल्डर, उच्च अधिकारी, बडे राजकीय नेते यांचे फोन म्हणजे स्वर्ग सुख वाटत असावे.  

आपण जसे माझे काय चुकले ? असा प्रश्न विचारता तसेच सामान्य शिवसैनिक आणि राजकारणाशी संबंध नसलेली जनता आपणास विचारते कि उद्धव साहेबांचे काय चुकले ?  शिवसेनेने एक रिक्षा चालक असतांना आपणास शाखाप्रमुख, नगरसेवक, सभागृह नेते, आमदार, विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्रीपद तसेच संघटनेत दुस्रया क्रमांकाचे शिवसेना नेतेपद बहाल केले. एवढेच नाही तर अधिकारही दिले आपण किती बाय कितीच्या खोलीत राहत होता हे आठवा आणि आताचा आपला आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या बघा. एवढे सगळे कुणाच्या जीवावर ? शिवसेनेच्याच ना ? शिवसेनेत मानाचे स्थान, अधिकार कुणी दिले ? उद्धवसाहेबांनीच ना ? पण आपण त्याबदल्यात निष्ठा देण्याऐवजी पाठित खंजीर खुपसला. खंजीर खुपसण्याऐवजी राजीनामा देवून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहिला असता तरी लोकांमध्ये तुमची प्रतिमा आणखी उचावली असती.   

निष्ठा म्हणजे काय यासाठी माझेच उदाहरण बघा शिक्षण मंडळात भरीव कार्य केल्यानंतर उद्धव साहेबानी 2005 साली माझ्यावर दुसरी जबाबदारी टाकण्याचे आदेश दिले होते पण आपण तो आदेश पाळलाच नाही. पण तरीही मी निष्ठा सोडली नाही. 2005 ते 2022 अशी 17 वर्ष झाली मी फक्त शिवसैनिक म्हणून निष्ठेने काम करतो आहे. पद दिले नाही तर लोक 3 महिन्यात पक्ष सोडतात. खरं म्हणजे माझ्यातल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तरीही शिवसैनिक म्हणून आजपर्यंत काम करतो आहे. याला कारण आहे निष्ठा मीही दुस्रया पक्षात जावू शकलो असतो पण ती गद्दारी ठरली असती आणि गद्दारी माझ्या रक्तात नाही.  

आज तुमच्याकडे लोक स्वार्थापोटी हाजी हाजी करतील पण जेव्हा तुम्ही खुर्चीवर नसाल तेव्हा हेच लोक तुम्हाला काडीचाही सन्मान देणार नाही. कारण इतिहास साक्षी आहे ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना भारतीय जनतेने कधीच आदराचे स्थान दिले नाही. मग तो राजा जयचंद असो, मीर जफर असो किंवा खंडोजी खोपडे असो अगदी रामायण काळातही गेलात तरी विभिषणाने जरी रामचंद्राला साथ दिली असली तरी विभिषणाबद्दल कुणाच्याही मनात आदर तर नाहीच पण विभिषणाला डोळ्यासमोर ठेवून घर का भेदी लंका ढाये हा वाक्प्रचार तयार झाला. असल्याची पुष्टी अनिल काकडे यांनी केली आहे.  

काकडे यांनी व्यक्त केलेली मते सर्वसामान्य शिवसेनेची आहेत. प्रत्येक शिवसैनिकांला अगदी हेच वाटत आहे. सत्तांतराकरिता आजपर्यंत अनेकांनी आपले पक्ष सोडल्याचा इतिहास आहे. मात्र सोडलेला पक्ष हा माझाच आहे असं मात्र पहिल्यांदाच घडत आहे. यामागे कोणती शक्ती कार्यरत आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. सत्तांतर झाल्यानंतर प्रत्येक दिवशी शिवसेनेला कोणत्या ना कोणत्या कारणाने धक्का देणे हेच सध्या पहावयास मिळत आहे. मग सुरुवातीला शाखा ताब्यात घेणे... दहिहंडीच्या उत्सवावर आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न... अगदी पुढे जाऊन शिवसेनाभवनापर्यंत देखील ही मजल गेली.  इतकेच काय तर ठाण्यात आता भवानी देवीचा उत्सवावरूनही राजकारण होणार...  एकीकडे आम्ही बाळासाहेब आणि दिघेसाहेबांचे शिलेदार आहोत असे सांगायचे आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना एकमेकात भिडवायचे आणि दुरून आपण मजा बघायची या मागे कोणती शक्ती कार्यरत आहे. याचा मागोवा घेणे आज गरजेचे आहे. अन्यथा दोघांचे भांडण लाभ मात्र ....

दसरा मेळावा किंवा इतर काही कारणांनी जुन्या नव्या शिवसैनिकांची डोकी फुटणार असतील तर याचा फायदा कुणाला होणार? पुन्हा जुन्या थाटणीची शिवसेना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली तर इथली प्रशासकीय यंत्रणा त्यांना काय करणार हे आत्ताच सांगणे कठीण आहे. कारण या यंत्रणेवर ताबा कुणाचा आहे हे नव्याने सांगायला नको? तेव्हा हा वाद आता सत्तांतराचा नाही तर .....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com