Top Post Ad

बोस रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक जगदीशचंद्र बोस

 


     पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात दि.३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे बोस झाले. त्यांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे व त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का? असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असत. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग आदींचे निरीक्षण करणे, हा त्यांचा आवडता छंद होता.


     डॉ.जगदीशचंद्र बोस हे कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.बोस यांनी लिहिलेली पुस्तके- इरिटेबिलिटी ऑफ प्लँट्स, इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लँट्स, ट्रॉपिक मुव्हमेण्ट ॲण्ड ग्रोथ ऑफ प्लँट्स, दि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लँट्स, प्लँट रिस्पॉन्स, दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस, दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लँट्स, रिस्पॉन्सेस इन दि लिव्हिंग ॲण्ड नॉन लिव्हिंग, लाइफ मुव्हमेण्ट्स ऑफ प्लँट्स- भाग १ ते ४ आदींचा समावेश आहे.

     विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर ते वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करुन त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणार्‍या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून वनस्पतींना संवेदना असतात हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केले. 

इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात इ.स.१८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र विषय शिकवत असतानाच त्यांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे.जे.थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते. इ.स. १८९६मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग मार्कोनीने केले तर त्याच्या एक वर्षाआधीच जगदीशचंद्रजींनी ते केेले होते. हे आता अमेरिकेस मान्य करावे लागत आहे. 
   
  डॉ.सर जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले. त्यांचे वयाच्या ७९व्या वर्षी दि.२३ नोव्हेंबर १९३७ रोजी निधन झाले.

!! त्यांच्या पावन स्मृतींना व संशोधनांना मानाचा मुजरा !!


एन. के.कुमारजी. (से.नि.प्रा.शिक्षक)....७७७५०४१०८६
मु. पो. ता. जि. गडचिरोली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com