महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही वक्तव्य आपण सगळयांनी बघितले ते महाराष्ट्रातील, देशातील कुणालाही चीड येईल अशाप्रकारचे वक्तव्य होते. राज्यपाल वारंवार असे का बोलतात… का वागतात आणि सत्ताधारी यांच्याबद्दल का गप्प बसतात हे एक महाराष्ट्राला पडलेले कोडं आहे. मी उपमुख्यमंत्री असताना भेटायला जायचो. मला बर्याचदा राज्यपाल म्हणायचे, अजितजी मुझे अभी बस.. मुझे अभी यहा नही रहना है… जाना है… हे खोटं नाही खरं आहे… मी त्यांना वरीष्ठांना सांगा असे सांगितले होते. त्यांना जाण्याकरता वरीष्ठ परवानगी देत नाही म्हणून ते अशी वक्तव्य केल्यानंतर तरी वरीष्ठ इथून आपल्याला पाठवतील, जसं आम्ही अधिकार्यांना कुठे टाकले आणि त्यात त्याला बदली हवी असेल तर वेडंवाकडं काम करतो की त्याची बदलीच होते. तसे काही राज्यपालांच्या मनात आहे का अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होते असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला ते उपस्थित होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अशाप्रकारचा अपमान होतो. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, प्रेरणास्थान आहे म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. असा अपमान आम्ही सहन करणार नाही. याची नोंद सर्वांनी घ्यावी. महापुरुषांबद्दल अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्याची दखल केंद्रसरकारने घेतली पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्रातून परत बोलवावे व महाराष्ट्राचा अपमान थांबवावा. भाजपाचे एक प्रवक्ते आहेत त्यांनी वाहिनीवरील चर्चेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले. कुणी तुम्हाला सांगितले… कुठं वाचलं… कुठल्या पुस्तकात पाहण्यात आले. की तुम्हाला स्वप्न पडले अशा प्रकारच्या विकृत, राष्ट्रद्रोही मानसिकतेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजप यांनी या वक्तव्याचा निषेध करण्याऐवजी सारवासारव केली व पाठराखण करण्याची भूमिका घेतली त्यांच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेचाही अजित पवार यांनी निषेध केला.
महागाई आणि बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न या देशात आणि राज्यात आहेत त्या प्रश्नांवर कोण बोलत नाही. मात्र हे असले नको ते विषय काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि लोकांचे लक्ष विचलित केले जाते. काही ठिकाणी असलेले प्रकल्प त्यामध्ये समृद्धी महामार्गाचे काम उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे रस्तेविकास मंत्री होते. एक मे रोजी उद्घाटन करायचे ठरले होते. पण ब्रीजचे काम कोसळले म्हणून १५ ऑगस्टला करायचे ठरले परंतु जून अखेरला आमचे सरकार गेले. कधी उद्घाटन करणार आहे माहित नाही. वास्तविक त्या भागातील लोकांची मागणी आहे की नागपूर ते शिर्डी उद्घाटन करायचे ठरले होते. डिसेंबर आला तरीही उद्घाटन होत नाही. कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला. हा रस्ता झाला तर त्याचा वापरतरी व्हायला हवा. संपूर्ण झाला नसला तरी जेवढा झाला आहे तेवढा तरी वापरायला सुरुवात केली तर निश्चितच त्याचा फायदा मराठवाडा- विदर्भातल्या विकासावर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे मेट्रो प्रकल्प रखडले आहेत. कामे कशी तात्काळ होतील यासाठी प्रयत्न नाही असा आरोपही अजित पवार यांनी सरकारवर केला.
डिसेंबरमध्ये विधीमंडळाचे अधिवेशन नागपूरला होत आहे. यासंदर्भात ३० नोव्हेंबरला सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यात अधिवेशनाबाबतची रुपरेषा ठरवण्यात येईल. मुळात अधिवेशनाची तारीखच अशी घेण्यात आली आहे की, अधिवेशन जास्त काळ चालले पाहिजे. सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना पहिले अधिवेशन नागपूरला झाले त्यानंतर कोरोनामुळे एकपण अधिवेशन नागपूरला झाले नव्हते. त्यामुळे जास्त काळ कामकाजाला मिळायला हवा आणि नीट चर्चा घडायला हवी. अधिवेशनात अनेक मुद्दे आहेत. त्याबद्दल आज बोलणार नाही. गटनेत्यांसोबत बैठक झाल्यावर आमच्या सर्वांच्या समवेत चर्चा झाल्यावर बोलणे हे जास्त उचित ठरेल असेही अजित पवार म्हणाले. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महामहिम राज्यपाल महोदयांना विचारांमधील अंधार दूर होऊ दे त्यांच्या वक्तव्यामधील गोंधळ संपू दे… राज्याच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थना सगळ्यांच्या साक्षीने अजित पवार यांनी आज केली.
0 टिप्पण्या