राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आव्हाड यांना जामीन देण्यात आला आहे. मॉलमध्ये हर हर महादेव या सिनेमाच्या वादावरुन आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 24 तासांच्या आतच आव्हाडांना जामीन मंजूर झाला आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे आव्हाडांना शुक्रवारी वर्तक नगर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आव्हाडांची शुक्रवारची रात्र कोठडीतच गेली. त्यानंतर नियमांप्रमाणे आव्हाडांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायलयाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली. मात्र आव्हाडांनी तात्काळ जामिनासाठी अर्ज केला. त्यानुसार आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन देण्यात आला.
जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर सकाळी 11 वाजता सुरुवात झाली होती. यावेळी आव्हाड यांचे वकील ॲड प्रशांत कदम यांनी आव्हाड यांची अटक कशी बेकायदेशीर आहे यावर युक्तिवाद केला. आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असून हे गुन्हे जाणीवपूर्वक दाखल करण्यात आले असल्याचे कदम यांनी सांगितले. आव्हाड यांना जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा जामीनपात्र कलम लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर यामध्ये सेक्शन 7 हे कलम जाणीवपूर्वक लावण्यात आले. हे कलम ठाणे शहरात लागू करू शकत नसल्याचे सांगत तशी तरतूद 1932 साली करण्यात आली आहे असा दावा ॲड प्रशांत कदम यांनी न्यायालयात केला. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखील स्वतःहून चौकशी करता पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे सांगत तपासाला पूर्ण सहकार्य केले असल्याचे कदम यांनी न्यायालयात सांगितले. ही अटक पुर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावाही ॲड कदम यांनी न्यायालयात केला.
आव्हाडांना जेव्हा ताब्यात घेण्यात आले त्यावेळी आयपीसी 141,143,146,149,323,504, महाराष्ट्र पोलीस कायद्यातील 37(3), 135 हे कलम लावण्यात आले होते. त्यानंतर यामध्ये कलम 7 वाढवून त्यांना तसेच त्यांच्या सोबत 11 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांची बाजू मांडताना सरकारी वकील ॲड. अनिल नंदगिरी यांनी आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडे पुरावे असून त्यामुळे त्यांच्या कस्टडीची मागणी त्यांनी यावेळी नायायालयात केली. या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हा निकाल एक तास निकाल राखून ठेवण्यात आला. त्यानंतर आव्हाड यांना पुन्हा वर्तक नगर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. यावेळीही वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या बाहेरही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
जितेंद्र आव्हाड यांना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबवस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी करत घोषणाबाजी देखील केली. खवबरदारीचा उपाय म्हणून कोर्ट नाक्याकडे येणारे दोन्ही मार्ग पोलिसांनी बंद केले होते. सुनावणी झाल्यानंतर आव्हाडांना न्यायालयाच्या बाहेर आणण्यात आले तेव्हा कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची सुटका झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी संपूर्ण प्रकरणामागे एक चाणक्य होता असे सूचक वक्तव्य केले. माझ्यावर करण्यात आलेल्या कारवाईत तो नियमच पाळण्यात आला नाही असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच पोलिसही हतबल होते असे सांगितले. विशेष म्हणजे हर हर महादेव या चित्रपटातील नेमक्या कोणत्या संदर्भ प्रसंगावर आक्षेप होता त्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आपल्याला किमान एक दिवस तरी तुरुंगात टाकायला पाहिजे, यासाठी षडयंत्र रचलं होतं. त्यासाठी विशिष्ट कलमं लावण्यात आली होती असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.
पहिल्यांदाच एक बाब स्पष्ट करू इच्छितो की, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनयकुमार राठोड यांचा माझ्या अटकेशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलत दर मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे पोलीस अधिकारी हतबल झाले होते. कारण असं अचानक कुणी कुणाला ताब्यात घेत नाही, मला कलम ४१ (अ) अन्वये जी नोटीस देण्यात आली होती, ती नोटीस मला दुपारी दोन वाजता देण्यात आली होती. त्यामध्ये तुम्ही पाच वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहा, असं सांगण्यात आलं होतं.
पण त्याआधीच म्हणजे अडीच वाजताच मला अटक करण्यात आली. नोटीस दिल्यानंतर ७२ तासांच्या आत कुणालाही अटक करता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा नियम आहे. मात्र, माझ्या प्रकरणात हा नियम पाळला नाही, माझ्यासह एकूण १२ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पण केवळ मला जारी केलेल्या नोटीशीवर ‘क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट- १९३२’ च्या सेक्शन ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बाकी ११ जणांवर हे कलम लावण्यात आलं नाही. मला एखादा दिवस तुरुंगात ठेवायचं असेल तर कोणतं कलम लावावं? असा विचार करून हे कलम टाकण्यात आलं होतं. यांना तक्रारदार मिळत नव्हता, त्यामुळे त्यांनी विवियाना मॉलचे व्यवस्थापक आणि सिनेपोलीसच्या कर्मचाऱ्यांवर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही आव्हाड यांनी केला.
नक्की वाचा विरोध कोणाला आणि का?...
हर हर महादेव चित्रपट बंद पाडण्या मागची कारणे.....
'हर हर महादेव'मध्ये शिरवळ येथे स्त्रियांचा बाजार भरलेला दाखवला आहे. इंग्रज तिथे भारतीय मुली, स्त्रियांना बांबूच्या पिंजऱ्यात टाकून जहाजातून परदेशात घेऊन जातात असे दाखवले आहे. शिरवळ म्हणजे नीरा नदी असणार. तिथून जहाजाने इंग्लंडमध्ये जायचं म्हणजे लई अवघड काम. नीरा, भीमा, कृष्णा असा पूर्वेकडे प्रवास करत बंगालचा उपसागर गाठायचा आणि श्रीलंकेला वळसा मारून परत पश्चिमेला इंग्लंडकडे जायचं! जगावर राज्य करणारा इंग्रज असा प्रवास करण्याइतका वेडा होता हे हा चित्रपट पाहिला नसता तर समजलेच नसते.
अफझल खानाच्या वधाचा प्रसंग देखील अतिशय विनोदी आहे. वाघनखाच्या वाराने घायाळ झालेला अफजल सरपटत शामियान्याच्या बाहेर येतो. आता तुम्ही विचाराल का? तर पुढच्या प्रसंगासाठी लागणारे दोन लाकडी खांब तिथे उभे केलेले असतात म्हणून. नुसतेच खांब बरं. त्याच्यावरती बांधकाम, तंबू काही नाही. तर ते दोन लाकडी खांब शिवाजी महाराज लाथ घालून पाडतात. तुम्ही पुन्हा विचाराल का? तर त्याचे कारण असे की, महाराजांना नरसिंहाप्रमाणे खांबाच्यामधून एन्ट्री घ्यायची असते. मग महाराज अफजलला मांडीवर घेतात आणि हिरण्यकश्यपू प्रमाणे त्याचा वध करतात. तुम्ही विचाराल का? तर तुळजापुरात देवीची विटंबना करणाऱ्या अफजलला तिथल्या पुरोहिताने शाप दिलेला असतो. नरसिंहाप्रमाणे कोणीतरी प्रगट होऊन तुझा वध करेल असा. म्हणजे शिवाजी महाराज हे फक्त एक निमित्त. बाकी सगळे ईश्वरकार्य!
त्याच्या आधी अफजलला जावळीच्या खोऱ्यात कसं आणायचं याचं नियोजन होतं. बाजीप्रभू म्हणे आपल्या माणसांकरवी अफजलच्या वाटेत खोटी मंदिरे उभी करत करत ती जावळीपर्यंत येतील अशी तजवीज करतात. ती मंदिरे पाडत अफजल जावळीत येईल याची त्यांना खात्री असते. म्हणजे आपण टेरेसवर गेलेल्या मांजराला दुधाची वाटी दाखवत खाली आणतो ना, अगदी तसं. बरं, खोटी मंदिरे म्हणजे काय याचं उत्तर मिळत नाही. मंदिराचे बांधकाम खोटे का त्यात असलेला देव खोटा? देव जाणे.
पावनखिंडीचे सिन तर अजबच आहेत. दोन्हीकडे डोंगराच्या उंचच उंच कडा असतात. मध्ये वाळूने सपाट केलेला, अगदी सरळ रेषेत जाणारा, एकाच रुंदीचा चिंचोळा रस्ता. तो रस्ता क्रिकेटची पीच वाटावी इतका सपाट दाखवला आहे. युद्ध करणे सोपे पडायला नको का? शिवाय इतक्या चिंचोळ्या जागेत, पावसाळ्यात सर्वांचे चेहरे स्पष्ट दिसावेत इतका लख्ख प्रकाश पडलेला असतो. बाजूचे डोंगर खोटे आहेत आणि प्रकाश स्टुडिओतील आहे ते लगेच लक्षात येतं.
0 टिप्पण्या