Top Post Ad

जहाल प्रबोधनकार - संत गाडगेबाबा


गाडगेबाबा म्हणजे एक जहाल, तिखट आणि अंधविश्वासामध्ये गुरफटलेल्या लोकांना झोंबणारे प्रबोधनकार होत. निरक्षर असलेल्या गाडगेबाबा यांनी शिकलेल्या लोकांना ज्ञानी करण्याचे काम हाती घेतले होते. गाडगेबाबा यांचे विचार, किर्तन आणि प्रबोधन म्हणजे अनिष्ट व्यवस्थेला चिरून माणसाला जागृत करून मानवतावादाची शिकवण देणारी चालती फिरती शाळाच होय. गाडगेबाबा यांचे विचार एवढे जहाल व परखड होते की आजही काही लोकांना त्यांचे विचार पटत नाहीत म्हणून महाराष्ट्राला ज्ञानी बनवणारे संत गाडगेबाबा अजून लोकांच्या घरात दिसत नाहीत. ज्यांच्या घरात गाडगेबाबा दिसत नाहीत त्यांच्या डोक्यात गाडगेबाबा दिसणे म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल. आजही अशी धारणा आहे की अंधश्रद्धा, देवदेवता, अनिष्ट रुढीपरंपरा, कर्मकांड यावर बोलणारा हा धर्म विरोधी आहे.

 परंतु सत्तर वर्षा अगोदर गाडगेबाबा यांनी या विषयाला हात घालुन महाराष्ट्रामध्ये संताची परंपरा कायम ठेवली. गाडगेबाबा समाजातील ज्वलंत विषय हाती घेऊन प्रबोधन करत असत. विचाराने लोकांच्या डोक्यातील घाण साफ करण्याचे काम गाडगेबाबा यांनी केले. समाजातील ज्वलंत विषय व्यसन, सावकारी, अंधश्रद्धा, कर्मकांड, स्पृश्य अस्पृश्यता, भोदुगिरी यावर सडकून प्रहार करणारे आणि व्यवस्थेला थेट, सत्य प्रश्न विचारणारे गाडगेबाबा हे खऱ्या अर्थाने समाजाचे प्रबोधनकार होत. प्रश्न आणग समस्या ह्या माणसाला असताना आणि त्यातून सुटका होऊन माणसाचे जिवन सुखद कसे होईल यावर औषध म्हणजे गाडगेबाबा यांचे किर्तन होय. गाडगेबाबा यांचा जन्म एका गरीब घरात झाल्याने कर्जबाजारीपणा चे चटके आणि सावरकराचे शोषणाचे विचार जवळून पाहिले. म्हणून कोणत्याही माणसाने सावकारा कडून कर्ज घेऊन आपली शेत जमीन किंवा इतर काही मौल्यवान वस्तू गहानात ठेऊ नये म्हणून गाडगेबाबा लोकांना प्रबोधनाच्या माध्यमातून सांगत. आम्ही जर गाडगेबाबा यांचे विचार थोडे जरी स्विकारले असते त्यावर विचार केला असता तर आम्हाला कर्जबाजारीपणा समजला असता. 

गाडगेबाबा यांनी कर्जबाजारी होऊ नका असा मौलिक संदेश दिला तरी आज भारत एवढा कर्जात बुडाला आहे की पन्नास वर्षे त्यातून बाहेर येईल की नाही याची शाश्वती नाही. शेतकरी महिला आजही कर्जात आहेत. कर्ज मानसाला कधीच प्रगती करू देत नाही म्हणून खर्चावर मर्यादा घालून नियोजन करण्याची शिकवण गाडगेबाबा यांची होती. दुसरी समस्या म्हणजे व्यसन. दारु ही तशी खुप काळापासून समस्या बनली आहे. आजही आपण विचार केला तर दारू ही सर्वात मोठी समस्या आहे. घरात दुध न पिणारे बाहेर महागडी दारू पिऊन आर्थिक दारिद्रय स्वतः निर्माण करतात. घरामध्ये खायला, मुलांना शाळेत जायला, पुस्तक घ्यायला कपडे घ्यायला पैसे नसताना परंतु प्यायला बरोबर पैशाचे नियोजन होते याचा दुष्परिणाम घरावर शिक्षणावर, आरोग्यावर आणि अर्थाजनावर होतो याची जाणीव लोकांना राहली नाही.

            भारतीय समाजाला लागलेला सर्वात भंयकर व्यसन कोणते असेल तर ते आहे अंधश्रद्धा. आजही आपण बघतो सुशिक्षित लोक सुद्धां अंधश्रद्धा, कर्मकांड, भोदुगिरी यांच्या आहारी गेलेले आहेत. आणि अंधश्रद्धा, कर्मकांड आणि भोदुगिरी वर जर कोणी बोलत असेल तर ते त्यांना धर्माचे विरोधक, नास्तिक समजतात. आणि गाडगेबाबा हे अंधश्रद्धा, कर्मकांड आणि भोदुगिरी यावर थेटवार करून समाजालाच प्रश्न विचारून पटवून देत असत. परंतु हेच विचार आजच्या पैशाच्या थैल्या घेऊन, अंधश्रद्धा जोपासऱ्या लोकांना पटत नाहीत म्हणून एकही स्वंय घोषित किर्तनकार कीर्तनात गाडगेबाबा यांचे नाव घेत नसेल. अंधश्रद्धा आणि देवदेवता याबद्दल तर गाडगेबाबा खुप आक्रमक होते. कारण लोक शिक्षण, आरोग्य यावर खर्च न करता अंधश्रद्धेपोटी आपला पैसा इतरत्र खर्च करत म्हणून आर्थिक आणि शैक्षणिक दारिद्रय वाढतच आहे असे गाडगेबाबा बाबा यांचे मत होतै म्हणून तर त्यांनी यावर कठोर प्रहार केले. 

देव कोणाला दिसला नाही, दिसणार पण नाही मग न दिसणाऱ्या देवासाठी एवढा खटाटोप कशाला असा थेट प्रश्नच ते लोकांना विचारत होते. देतो तो देव. तो जर सर्वाना देतच असेल तर तुमच्या कडून काही घेण्याची अपेक्षा तो कशाला करेल. तुमच्या कडून दान स्वरुपात घेऊन तुम्हाला दारिद्रय बनवणारा देव कसा होऊ शकतो म्हणून होम हवण कर्मकांड करून आपला पैसा वाया घालु नका. अशी शिकवण त्यांची होती. सत्यनारायण घालून एखादी गोष्ट चांगली होते हे केवळ आणि केवळ काल्पनिक आणि यावर विश्वास ठेऊ नका असे प्रबोधन गाडगेबाबा हे नाट्यमय पद्धतीने करत म्हणजे लोकांना सुद्धां समजायला सोपे जाई आणि लोकांना ते पटत असे. संत किंवा सत्पुरुष कोणाला म्हणायचे तर ज्यांच्या अंगी दया आहे तो सत्पुरुष असे गाडगेबाबा किर्तनाच्या माध्यमातून सांगत होते. देव हा दगडात नसुन रंजल्या गांजल्याच्या सेवेमध्ये आहे. दगडामध्ये फक्त अंधश्रद्धा आहे असे रोखठोक किर्तन गाडगेबाबा करत. देव दगडामध्ये तर माणसामध्ये आहे हे गाडगेबाबा नेहमी सांगत असत.

*देव देव करता शिनले माझे मन*
*पाणी आणि पाषाण जेथे तेथे* 
 हेच ते संत कबिराच्या भाषेत सांगायचे
*जतरा मे बिठाया पथरा*
*तिरथ बनाया पाणी*
*पैसो की धुलधानी*
*दुनिया हुई दिवानी*

अक्षर ओळख नसलेल्या गाडगेबाबा यांना हे माहिती होते पण आमच्या स्वतः सुशिक्षित समजणाऱ्या लोकांना आजही माहिती नाही याची खंत वाटते. देव दगडात शोधल्या पैसा जो माणसाची सेवा करतो त्यांना देव माना असा आग्रह गाडगेबाबा करत देव कोण तर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा काढून गोरगरीब लेकरांना शिकवले त्यांना देव माना. *संत तुकाराम महाराज* यांच्या ओवीचे उदाहरण देऊन ते स्पष्ट करतात.

*तुका म्हणे एकचि मरण खरे*
*उत्तमची उरे किर्ती मागे*
ज्याची किर्ती मागे उरते त्याला देव माणन्याचा संदेश गाडगेबाबा यांचा होता.

        अस्पृश्यता आणि जातीवाद  खुप मोठ्या प्रमाणात होता जातीवाद आणि अस्पृश्यता निवारण करण्यासाठी गाडगेबाबा नाट्यमय पद्धतीने लोकांना समजून सांगत असत आणि लोकांनाच प्रश्न करत असत आपण एकाच देवाची लेकरं तर वेगवेगळे कसे? असा सवाल करून एकीची भावना लोकांच्या डोक्यात भरत होते. तांब्या ला एखाद्या अस्पृश्य माणसाचा हात लागला तर काय होते? लोकांचे उत्तर - बाटतो. गाडगेबाबा यांचा पुन्हा प्रश्न- मग त्याला काय करतात? लोकांचे उत्तर शुद्ध, गाडगेबाबा यांचा पुढचा प्रश्न शुद्ध कसे करतात? लोक - तांब्याला विस्तवावर तापवून. गाडगेबाबा मग माणसाला हात लागला तर काय होते? लोकांचे उत्तर बाटतो. गाडगेबाबा यांचा पुढचा प्रश्न मग माणूस बाटला तर काडी कचरा गोळा करा आणि द्या पेटून. यातून  आपण माणव सर्व एकच आहोत हा निर्मळ संदेश गाडगेबाबा देत. गाडगेबाबा जेथे किर्तन करत तेथे जेवनही करत नव्हते. आणि फुकाचे कधी खात नव्हते. एवढे जरी आज लोकांना कळाले तरी भरपूर लोक ज्ञानी झाले असे समजून जाईल. याच बरोबर गाडगेबाबा यांचा जोर हा शिक्षणावर होता. आपल्या मुलांना शिकवा आणि मोठे करा. शिकलेले मुल दिल्लीत जाऊन भाषण देतात आणि न शिकलेले मुल ओझ उचलतात अशा प्रकारचे दाखले देऊन शिक्षणाचे महत्व पटवून द्यायचे. 

शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना त्यांच्या समोर एकमेव उदाहरण होते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. बाबासाहेब शिकले तर दिल्लीत भाषण करतात, गरीबाच्या मुलांना शिकवतात, आपणही मुलांना शिकवून मोठे केले पाहिजे हा आग्रह त्यांचा असे. संत गाडगेबाबा हे पंढरपूर येथे नित्य नियमाने जायचे तेथे जाऊन लोकांची सेवा करायचे. दुरवरुन आलेल्या लोकांना राहण्याणी सोय होत नसे तसेच अस्पृश्यता पाळली जात असल्याने बऱ्याच लोकांना निवारा उपलब्ध होत नसे. अशा परिस्थितीत लोक निधी मधून गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे अस्पृश्यांसाठी धर्मशाळा बांधुन निवारा आणि अन्नचा प्रश्न सोडवला. समोर पुन्हा मराठा धर्म शाळा व परिठ धर्मशाळा सुरु करुन धर्माच्या नावावार पोट भरणाऱ्या लोकांना चपराक दिली. लोकांनी दिलेल्या पैशाचा गैरवापर होणार नाही म्हणून त्यांनी कसोटीवर तपासून माणसाची नियुक्ती केली आणि धर्म शाळा सुरू करून वारकरी लोकांना मोठा हातभार लावला. स्वतः ला साधु संत समजणारे लोक हे आपल्या शिष्यांचा वापर वैयक्तिक कामासाठी करून घेत. मठामध्ये दारुचे सेवन करत. दारूमुळे लोकांचे जिवन उद्ध्वस्त होते आणि येथे स्वतः ला साधु समथणाराच दारू पितो हि गोष्ट गाडगेबाबा यांच्या मनाला चटका लाऊन गेली म्हणून गाडगेबाबा यांनी कोणाला गुरू केले नाही आणि त्यांना कोणी शिष्य सुद्धां जोडून घेतला नाही. सदैव लोकांना भुलथापा, अंधश्रद्धा, कर्मकांड, भोदुगिरी, व्यसन यामधून बाहेर काढण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. 

आज काही लोक किर्तनाच्या नावाखाली धंदा करतात हजारो रुपये लोकांकडून घेऊन अंधश्रद्धा, भोदुगिरी, कर्मकांडाचे महत्त्व सांगतात, सेवेच्या नावाखाली घेतलेला पैसा वैयक्तिक जिवनावर खर्च करतात. विज्ञानवाद, तर्क, अंधश्रद्धा, कर्मकांड, भोदुगिरी यावर कोणी बोलले तर आजचे किर्तनकार त्यांना धर्मविरोधी समजून त्यांना शिव्या देतात, धमक्या देतात, अनैतिक शब्दाचा वापर करतात. म्हणून कधी कधी प्रश्न येतो गाडगेबाबा तुम्ही सत्य बोलत होता अंधश्रद्धा, भोदुगिरी, कर्मकांड, नाकारून मानवहिताचे प्रबोधन करत होता म्हणून आज आम्हाला विज्ञानवाद आणि वारकऱ्यांच्या किर्तनाचे महत्व पटले. आज गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन, यादिवशी किमान पाच लोकांनी तरी अंधश्रद्धा, भोदुगिरी, विषमता, व्देष सोडून दिला तर गाडगेबाबा यांना खरी आदरांजली ठरेल. गाडगेबाबा यांचे कार्य बहुआयामी होते, ते एका लेखामध्ये, पुस्तकामध्ये बंदिस्त करणे शक्य नाही. तरी हा छोटासा प्रयत्न. संत गाडगेबाबा यांच्या परिवर्तनवादी विचार व कार्यांना नमन.

  • विनोद पंजाबराव सदावर्ते
  • रा. आरेगांव ता मेहकर
  • मोबा: 9130979300

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com