नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे ,या मागणीसाठी मागील तीन वर्षापासून आंदोलन सुरू आहे .सदर मागणीला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्वता मान्यता देण्याचे कबूल करून शासकीय ठराव करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कोरोना महामारीमुळे तो ठराव सरकारने पारित केला नाही. सत्तेतून पायउतार होता होता नवी मुंबई विमानतळाचा व संभाजीनगर विमानतळाचा नामांतराचा शासकीय ठराव संमत करण्यात आला मात्र नाशिक विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित ठेवला.
आता सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असता नाशिक विमानतळाच्या मागणीने जोर धरला, याबाबत नाशिक विमानतळ नामांतर कृती समितीचे संयोजक तानसेन ननावरे ,आनंदराव निरभवणे ,नितीन मोरे ,पत्रकार महादू पवार, श्याम वाडकर ,सुखदेव दांडगे इत्यादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी केली असता मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्याचे आश्वासन दिले,
नाशिक विमानतळाच्या नामांतराचा तिढा आता सुटण्याच्या दृष्टीक्षेपात आला असता काही तथाकथित साधूंना पुढे करून नाशिक विमानतळाला रामायण कालीन जटायू यांचे नाव देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचे वृत्त
प्रसारित करण्यात आले आहे. सदर मागणी जाणिवपूर्वक करण्यात आली असून हा तर खोडसाळ व समाजात दुही निर्माण करून नामांतराला खिळ घालण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट मत या आंदोलनाचे प्रमुख तानसेन ननावरे यांनी व्यक्त केले.
तथाकथित रामायण कालीन जटायूच्या नावाची नाशिक विमानतळाला मागणी करणाऱ्या या साधूंचा बोलविता धनी कोण आहे ? त्याचा पर्दाफाश त्वरित करण्यात यावा, अशी तीव्र मागणी करण्यात येत असून यामुळे नाशिक विमानतळचा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याबाबत सरकारने तात्काळ निर्णय घेतला नाही तर हा संघर्ष तीव्र करण्याचा इशारा ननावरे यांनी दिला आहे. देशात बामणेत्तर समाजाला संघर्षाशिवाय काही पदरात पडत नाही, हे आजवर कित्येकवेळा स्पष्ट झाले आहे. मात्र यावेळी आम्ही हे होऊ देणार नाही. काहीतरी खोडसाळपणा करून दोन समाजामध्ये तेढ लावण्याचे राजकीय षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही तेव्हा केंद्र व राज्य सरकारने याबाबतीत त्वरित निर्णय घेऊन हा तिढा सोडविण्याचे आवाहन नाशिक विमानतळ नामांतर कृती समितीचे संयोजक तानसेन ननावरे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या