एक गैरसमज अनेक शतकांपासून पद्धतशीरपणे भारतात आणि परदेशात पसरवला गेला आहे. तो हा की भारतातील आयुर्वेदशास्त्र अति प्राचीन असून, शुश्रुत आणि चरक या दोन महाविद्वानांनी हे ज्ञान समस्त जगाला दिले आहे. यातील आयुर्वेद म्हणजेच "चिकित्सा आणि नैसर्गिक औषधे" हे शास्त्र जरी प्राचीन होते तरी त्याकाळात ते पूर्ण विकसित नव्हते.
ब्राह्मणी परंपरा असे मानते कि ब्रह्मदेवाने आयुर्विज्ञान हे दक्षप्रजापतीला दिले आणि ते त्याने अश्विनीकुमारांना शिकविले आणि त्यांनी ते ज्ञान इंद्राला दिले. तेथून ते धन्वंतरीची रूपात असलेल्या काशी नरेश दिवोदासला मिळाले जे त्याने सुश्रुतला दिले आणि मग सुश्रुताने, संहिता लिहून जगासमोर आणली. इंद्राने हेच ज्ञान नंतर अत्रेय पुनर्वसू यांना दिले जे त्यांनी अग्निवेशाला दिले आणि अग्निवेशाने ते चरकला शिकविले ज्याने नंतर चरक संहिता लिहिली.
विशेष म्हणजे वैदिक काळात अशी मान्यता होती कि शाररिक व्याधी या जादूटोणा, राक्षसी शक्ती किंवा तंत्रमंत्र याने होते! मग जर व्याधी अशा काल्पनिक कारणाने होत असेल तर त्यांचा उपचार नैसर्गिक औषधाने कसा होऊ शकतो?
केनेथ झिस्क त्यांच्या "Asceticism and Healing in Ancient India" या पुस्तकात लिहितात की अशा प्रकारच्या "भाकड कथा" भारतीय वैदिक परंपरेत दिसतात.
पालि भाषेत "चर" म्हणजे फिरणारा किंवा "चंक्रमण" करणारा असा होतो. बौद्ध धम्मात असे चंक्रमण करणारे बौद्ध भिक्खू असत हे सर्वांना माहीत आहेच. चरक या शब्दाचा मूळ धातू चर आहे.
देबीप्रसाद चटोपाद्याय हे Science and Society in Ancient India या पुस्तकात लिहितात की "चरक संहिता"चा अर्थ त्याकाळात भटकंती करणारे बौद्ध श्रमण यांनी हे ज्ञान एकत्रित केले आहे असा होतो. सुश्रुत यांच्याबद्दल देखील कुठलीही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसून, अभ्यासकांच्या मते अनेक जणांनी मिळून ही संहिता लिहिली आहे. म्हणजेच शुश्रुत नावाचा कोणी व्यक्ती झालेला नाही, तर ते एक काल्पनिक पात्र तयार केले गेले आहे!
१९०७ मध्ये सुश्रुत संहितेचे इंग्रजीत संपादन करणारे कविराज कुंजलाल भीषगरत्न लिहितात कि "सुश्रुत संहितेची रचना ही माध्यमिक बौद्ध आचार्य नागार्जुन यांनी लिहिलेल्या एका संहितेचा आधार घेऊन लिहिलेली आहे". सुश्रुतबद्दल आमच्याकडे कुठलाही ठोस पुरावा नाही असे कविराज कुंजलाल स्पष्ट लिहितात. याचाच अर्थ, आज जो शुश्रुत संहिता ग्रंथ आहे, त्याचे मूळ लिखाण बौद्ध आचार्य नागार्जुन यांनी लिहिले आहे आणि नंतरच्या काळात कोणी तरी या ग्रंथाची नक्कल करून, शुश्रुत हे काल्पनिक नांव दिले. म्हणजेच बौद्ध आचार्य नागार्जुन यांना कुठलेही credit मिळू नये म्हणून हा सगळा खटाटोप!
ग्रीक इतिहासकार मेगॅस्थनिस याने देखील श्रमण आणि त्यांच्या सखोल वैद्यकीय ज्ञानाबद्दल लिहिले आहे. बौद्ध भिक्खू जेव्हा लोकांना धम्म सांगत, तेव्हा लोकांच्या शाररिक व्याधींसाठी देखील औषधोपचार करीत. याचाच अर्थ आयुर्विज्ञानाची खरी बैठक बुद्धकाळात झाली आणि बौद्ध भिक्खुंनी या ज्ञानात संशोधन करीत, अनेक नवीन उपाय शोधले जे त्यांनी लोकांच्या उपयोगासाठी आणले. याचे मूळ कारण म्हणजे बुद्धांनी भिक्खू संघाला सांगितले होते की 'माझी सेवा करायची असेल तर आजाऱ्यांची शुश्रूषा करा'.
जसे आधुनिक काळात डॉक्टर Hippocratic Oath घेतात तशीच "वेज्जावतपद" हे बौद्धकाळातील वैद्यांसाठी प्रतिज्ञा होती जिच्या सात मुद्द्यात रुग्णांची सेवा करण्याची प्रतिज्ञा आहे.
बुद्धविचारांसोबत उत्तोरोत्तर आयुर्विज्ञानाचा प्रसार देशात व परदेशात वाढत गेला. यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. "अष्टांगहृदय" या प्रसिद्ध ग्रंथात, ग्रंथकाराने भ.बुद्धांना सर्वात आधी वंदन केले आहे -
रागादिरोगान् सततानुषक्तानशेषकायप्रस्रुताशेषान् ।
औत्सुक्यमोहारतिदाञ् जघान यो पूर्ववैद्याय नमो स्तु तस्मै ।।
म्हणजेच जगातील प्राणिमात्रांच्या शरीराला मनामध्ये प्रमाद अस्वस्थता उत्पन्न करणाऱ्या रागजन्य, कामक्रोधादि रोगांचे ज्यांनी समूळ उच्चाटन केले त्या वैद्य शिरोमणी तथागत बुद्धाला म्हणजेच अपूर्व (अद्भुत) वैद्याला मी नमस्कार करतो.
बौद्धकाळात विकसित झालेले आयुर्विज्ञान, ८व्या ते १०व्या शतकानंतर वैदिकपूर्व काळाशी जोडण्यात आले आणि हे ज्ञान ब्रह्मदेवाने, शुश्रुत आणि चरक यांना दिले असा खोडसाळपणा करण्यात आला.
भारतीय आयुर्विज्ञान इतिहासात केवळ जीवक यांचा काळ तसेच चिकित्सा आणि निदान पद्धतीबद्दल अचूक माहिती मिळते. जगातील सर्वात प्राचीन मेंदूची आणि पोटाची शस्त्रक्रिया आचार्य जीवक यांनी केल्याचा उल्लेख आहे. आचार्य जीवकांनी संशोधित केलेल्या अनेक चिकित्सा व औषधपद्धती नंतरच्या काळात इतरांच्या नावावर प्रसिद्ध झाल्या.
जगभरातील आयुर्विज्ञान शाखेत गौरविलेले जीवकांना मात्र भारतातील आजच्या आयुर्वेदाच्या शिक्षणात कुठलेही स्थान देण्यात आले नाही ही इथल्या 'आयुर्वेदाचार्यांची' मानसिक दिवाळखोरी नव्हे काय?
म्हणूनच अभ्यास, संशोधन, लेखन आणि प्रसार गरजेचा आहे.
अतुल मुरलीधर भोसेकर
संयुक्त लेणीं परिषद
9545277410
0 टिप्पण्या