Top Post Ad

नामांतराचा स्मृतिदिन कि नामविस्ताराचा जयंती दिन

 

       नामांतर आंदोलनातून तयार झालेले कार्यकर्ते आणि नेते आज स्वताच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाच्या वळचनिला कटोरा घेऊन भिक मांगतांना दिसत आहेत. त्यामुळेच आजच्या आंबेडकर चळवळीतील बहुसंख्य तरुण कार्यकर्त्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. नामांतर चळवळीतील सर्वात आक्रमक नेते व त्याचा राजकीय गट आज पेशवाई समर्थक भाजपाचा सत्ताधारी भागीदाराचा समर्थक झाला आहे.ज्या मराठा ओबीसी तरुणांना बाळकडू पाजून शिवसैनिक बनविले त्यांनीच राजकीय लोकप्रतिनिधी बनून साठ वर्षाचा अभेद किल्ला नांव चिन्हासह उध्वस्थ करून टाकला. आजची त्यांची पडझड आम्हाला पाहवत नाही.तरी सुद्धा त्यामुळे नामांतर चळवळीत पचविलेले बाळकडू कसे विसरणार?. ज्या बाळकडूने मराठवाड्यात दलितांच्या घरादाराची राख रांगोळी करून हजारो निरपराध निष्पाप लोकांचा बळी घेतला.त्याचा तो इतिहास आम्ही कसा विसरावा हा मोठा प्रश्न सर्वच समाजाला पडला पाहिजे.जी १६ वर्ष आम्ही रात्र दिवस संघर्ष करण्यात घालविली ती कशी विसरावी त्या सोळा वर्षाच्या नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद' असा नामविस्तार करण्यात आला. त्याला आज  ४६ वर्षे झाली.त्या नामांतराचा स्मृतिदिन साजरा करणार कि नामविस्ताराचा जयंती दिन साजरा करणार?. 

  भारतीय इतिहासात अनेक आंदोलनाचा इतिहास हा प्रेरणादायी आहे.तर काही आंदोलनाचा इतिहास दु:खदायी असतो. तो विसरता येत नाही.२७ जुलै १९७८ मध्ये महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नांव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी आनंदोत्सव साजरा करीत असतानांच भारतीय जातीव्यवस्थेची मुळे घट्ट असणाऱ्या माणसाच्या डोक्यातील सैतान जागा झाला.सरकारच्या निर्णयाला त्याने जातीचा रंग दिला. आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरवात केली. ते १६ वर्ष ही घरादारासह जिवंत माणसाच्या रक्ताची होळी खेळत राहिले.आम्ही मांगत राहिलो. नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता,तर तो समता, स्वातंत्र्य,बंधुभाव पुढे नेणारा लढा होता. नामांतर झालेच नाही झाला तो नामविस्तार!.

     बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सामाजिक मूल्ये रुजली नाहीत हे आजचे आपले समाजवास्तव आहे. नामांतराची घोषणा जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली तेव्हा त्यांनी म्हटले होते, नामांतराचा उत्सव नामांतरवाद्यांनी जल्लोषात साजरा करू नये. त्याचवेळी नामांतरास नामविस्तार म्हणण्याचा फसवा शब्दच्छलही करण्यात आला होता. पुरोगामी म्हणविणारा महाराष्ट्र जातीय मानसिकतेतून मुक्त झालाच नाही.हे नामांतराचा १६ वर्षाचा संघर्ष आणि भिमा कोरेगांव १८१८ च्या संघर्षाला २०० वर्ष पूर्ण झाल्यानंतर २०१८ ला घडविलेल्या संघर्षातून सिद्ध झाले आहे. खैरलांजी, खर्डा, सोनईसारखे अनेक लक्षवेधी माणुसकीला लाजविणारे अत्याचार दलित समाजावर होत राहिले. नामांतरासाठी ‘लढा’ द्यावा लागला हे वास्तव आणि नामांतर झाल्यानंतर त्याचे श्रेय घेणाऱ्यांची राजकीय स्पर्धा, ही दोन्ही कारणे नामांतराचा हेतू निष्प्रभ करत आहेत? या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी, लढा का व कसा द्यावा लागला, यांची माहिती किती लोकांना आहे?.

     मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी २७ एप्रिल १९५७ साली शासनाने जी पळणीटकर समिती स्थापन केली होती त्या समितीने शासनाला स्वतंत्र विद्यापीठाची शिफारस करताना विद्यापीठासाठी ज्या नावांची शिफारस केली होती त्या नावांमध्ये औरंगाबाद, पैठण प्रतिष्ठान, दौलतबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन या स्थलवाचक नावांचा समावेश होता. याबरोबरच दोन महान महत्वपूर्ण व्यक्तींचीही नावे होती. एक होते छत्रपती शिवाजी महाराजांचे व दुसरे नांव होते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे. पण अखेर सर्व नावे मागे पडून विद्यापीठासाठी प्रदेशवाचक ‘मराठवाडा’ हे नाव स्वीकारले गेले. महाराष्ट्रात पुढे महात्मा फुले, पंजाबराव देशमुखांच्या नावाने विद्यापीठे निघाली.कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन झाले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आले. परंतु १९७७ चा नामांतर लढा सुरू होईपर्यंत महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ सुरू करून बाबासाहेबांचे उचित स्मारक उभारावे असे ना शासनाला वाटले ना लोकांना सुचले.या पार्शवभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यावर केलेल्या सत्याग्रहास २० मार्च १९७७ रोजी ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दलित संघटना (काँग्रेस प्रणित रिपाई) एकत्र आल्या असता, महाड सत्याग्रहाचा सुवर्ण महोत्सव व बाबासाहेबांनी १९५० साली औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालय उभारून मराठवाडय़ात उच्च शिक्षणाची रोवलेली मुहूर्तमेढ लक्षात घेता बाबासाहेबांचे नाव विद्यापीठास देण्यात यावे, अशी मागणी काही संघटनांनी केली.

     नामांतराच्या मागणीस त्यावेळी युक्रांद,युवक काँग्रेस, अ.भा.वि.प, जनता युवक आघाडी, समाजवादी, क्रांतिदल, एस.एफ.आय,पुरोगामी युवक संघटना आदी विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा होता.विद्यापीठाच्या कार्यकारिणीने नामांतराचा ठराव संमत केला होता. जनता पक्ष,शेकापनेही नामांतरचा पुरस्कार करणारे ठराव संमत केले होते. पण याच वेळी दुसरीकडे स्वत:स गांधीवादी,समाजवादी,दलितांचे पाठीराखे म्हणविणाऱ्यांनी म्हणजे गोविंदभाई श्राफच्या संस्था,संघटना यांनी त्याला विरोध केला होता.आणि त्याला साथ मिळाली मुंबई ठाण्याबाहेर नसणाऱ्या शिवसेनेची. यांनी मराठवाडय़ाच्या अस्मितेच्या नावाखाली नामांतरास विरोध सुरू केला होता.पण त्यांचा विरोध मराठवाडय़ात हिंस्र उत्पात माजवेल असे मात्र वाटले नव्हते.कारण शिवसेना मुंबई ठाण्या पलीकडे कुठे ही नव्हती यांची जाणते राजे,राजकारणातील चाणक्य आदरणीय शरद पवार यांना खात्री होती.म्हणूनच २७ जुलै १९७८ रोजी तत्कालीन पुलोदचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा ठराव विधिमंडळाच्या उभय सभागृहांत एकमताने संमत करून घेतल्यावर मराठवाडय़ात जो दलित विरोधी आगडोंब उसळला तो माणुसकीचा बळी घेणाराच ठरला होता. मराठा ओबीसी तरुणांना जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन हल्ले करणाऱ्याचा प्रमुख शिवसेना बाळकडू होता. ज्यांचा विद्यापीठाशी दूरान्वयाने संबंध नव्हता अशा खेडय़ापाडय़ांतील दलितांचे रक्त सांडण्यात आले. सरकारी मालमत्तेचा विध्वंस करण्यात आला. पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. दलित समाज स्वाभिमानाने जगतो,शिक्षण घेतो,गावकीची कामे नाकारतो याची जी सल सवर्ण मराठा,मागासवर्गीय समाजाच्या मनात दडून होती, त्याचा स्फोट विधिमंडळातील ठरावानंतर अक्राळविक्राळपणे बाहेर आला.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान,व्यासंगी असतील,त्यांचे मराठवाडा प्रेमही वादातीत असेल, हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावे म्हणून त्यांनी निजामाविरुद्ध कडक भूमिकाही घेतलेली असेल,तरीही त्यांच्यासारख्या एका पूर्वाश्रमीच्या महाराचे नांव विद्यापीठास देणे हे सनातनी मानसिकतेला सहन होत नव्हते आणि म्हणून त्यांनी नामांतरास हिंस्र विरोध केला हे नाकारता येत नाही. नामांतराचा लढा म्हणूनच दलितविरोधी मानसिकता बदलण्याचा लढा होता. १९७७ ते १९९४ पर्यंत सलग १७ वर्षे लढून परिवर्तनवादी चळवळीने हा लढा जिंकला असे म्हणता येत नाही. १४ जानेवारी १९९४ रोजी विद्यापीठास बाबासाहेबांचे नाव जोडले गेले,पण म्हणून महाराष्ट्रातील दलितविरोधी मानसिकता बदलली, असे काही आजही म्हणता येत नाही.

      नामांतर चळवळीचा वापर दलित पुढाऱ्यांनी आपले सवतेसुभे उभारण्यासाठीही करून घेतला हे सत्य ही नाकारता येत नाही. नामांतर होऊन २९ वर्षे झाली तरीही दलित नेते नामांतराच्या बाहेर पडून दलित समाजाच्या कोणत्याही मूलभूत समस्याला,प्रश्नांना हात घालतांना दिसत नाहीत. दलितांच्या रोजीरोटीचे प्रश्न उग्र होत आहेत.पण या प्रश्नांवर आवाज न उठविता दलित नेते चारी दिशांना चार तोंडे करून नामांतर एके नामांतर करीतच १४ जानेवारीला दरवर्षी औरंगाबाद विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर आपापले सर्कसचे तंबू ठोकून नामांतराचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा हलकट खेळ खेळत असतात. याला काय म्हणावे?.त्याबाबत काय लिहावे हेच समजत नाही? नामांतरानंतर दलित चळवळीची पुढील दिशा काय असावी याचे चिंतन दलित चळवळीने केलेच नाही. म्हणून आंबेडकरी चळवळीची आज दुर्दशा झाली आहे. 

आंबेडकरी चळवळीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ज्या मध्यमवर्गीय बुद्धीजीवी विचारवंत,पत्रकार,संपादक,लेखक-साहित्यिकांवर असते.ते सत्य मांडण्याची हिंमत दाखवत नाहीत. त्यांच्यापैकी बरेच जण गटबाज पुढाऱ्यांची भडवेगिरी करण्यात धन्यता मानतात,सोबत भाजप- सेना अथवा काँग्रेसचे कधी छुपेपणाने, तर कधी उघडपणे गुणगान करण्यातच धन्यता मानीत असतात.नामांतर चळवळीत काम करणाऱ्या  आमदार खासदार बनण्याचे स्वप्न पडत आहेत.त्यासाठी आज ते कोणाशी ही युती आघाडी करण्यासाठी तयार आहेत.समाजाच्या कोणत्याही प्रश्नाचे त्यांना काही घेणेदेणे नाही.असे लिहले तर ते चुकीचे असणार नाही.कारण धनदांडगे जात दांडगे यांनी आपले पक्ष बदलले आहेत.कालचे शत्रू आजचे मित्र झाले आहेत.तर कालचे मित्र आजचे शत्रू बनून सर्वच संपायला निघाले आहेत.म्हणूनच म्हणतात राजकारणात कोणी कायम शत्रू नसतो.तर कोणी कायम मित्र नसतो.पण असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजुर असलेल्या समाजाचे मात्र सर्वच आर्थिक शोषण करणारे असतात.ते त्यांना फक्त मतदार म्हणून हवे असतात.

     शिक्षणात नोकरीत आरक्षण घेणारा लाभार्थी आंबेडकरी विचारांच्या ट्रेड युनियन पासून चारहात लांब आहे.म्हणूनच त्यांचे पदोन्नतीतील आरक्षण गेले तरी तो पाहिजे त्या प्रमाणत जागृत होऊन मनुवादी विचारांच्या ट्रेड युनियन मधून बाहेर पडला नाही. आरक्षणामुळे मध्यमवर्गीय झालेला पांढरपेशा वर्ग तर इतका आत्ममग्न झाला आहे, की काही अपवाद वगळता मागे राहिलेल्या आपल्या बांधवांसाठी संस्था,संघटना,पक्ष, बांधणी करून जीवन समृद्ध करावे,रचनात्मक प्रकल्प योजनाबद्ध निर्माण करून राबवावेत याची जाणीव त्याला राहिलेली दिसत नाही.

    धम्म परिषदेतून पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होणारे निवडणुकीत मात्र क्षुद्र स्वार्थाला बळी पडून प्रस्थापित राजकीय पक्षांना मते देतात तेव्हा बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन चळवळ उभी तरी कशी रहाणार? यांचे गांभीर्याने आत्मचिंतन करीत नाही,नामांतराची लढाई जिंकल्यानंतर दलित चळवळ नवे प्रश्न,नव्या आव्हानाना मुळीच भिडलीच नाही.जो-तो खोटे मानापमान,प्रतिष्ठा,कमालीचे क्षुद्र अहंकार व अप्पलपोटय़ा स्वार्थात बुडून गेला.महाराष्ट्रात खेडोपाडी जो जातीयवाद घट्ट होत चालला आहे तो पाहता दलित-दलितेतर संवाद वाढण्याची गरज प्रकर्षांने जाणवते आहे. ग्रामीण भागात दलित समाजावर अत्याचार झाल्यावर ७० च्या दशकात समाजवादी,गांधीवादी आणि डाव्या पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते तिथे धावून जात असत. डॉ.बाबा आढावांनी सामाजिक एकोप्यासाठी ‘एक गाव एक पाणवठा’ सारखी चळवळ हाती घेतली होती. 

दलित-दलितेतर युवक एकत्र येऊन सामाजिक परिवर्तनाचे लढे लढत होते.पण हे आता ते पूर्ण थंडावून,उलट खेडोपाडी जातवर्चस्ववादी संघटनांचा उदय झाल्यामुळे दलित-दलितेतर दुरावा वाढत चालला आहे. सामाजिक सामंजस्य वाढविण्यासाठी म्हणूनच दलित-दलितेतरांचा सहभाग असणारे उपक्रम खेडोपाडी नव्या जोमाने राबविले जाणे आवश्यक होऊन बसले आहे. उदा.असंघटित कष्टकरी कामगार, मजुर, भूमिहीन शेतमजूर यांची नांव नोंदणी अभियान,आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे,असंघटीत कष्टकरी मजुरांच्या मुलामुलींना शिक्षण घेण्यासाठी शिशुवृती,वसतिगृह या प्रश्नावर,समस्यावर आताचे स्व्यमघोषित नेते तोंड उगडत नाही.पुतळा विटंबना,हत्याकांड,रेल्वे स्टेशनचे नामांतर यापलीकडे त्यांचा अभ्यासच नाही.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,महात्मा फुले संत गाडगेबाबा आदी संत महापुरुषांची जयंती दलित-दलितेतरानी एकत्र येऊन साजरी करणे,दलित, शोषित,पीडित वर्गाच्या सामाजिक,आर्थिक प्रश्नांवर जातपात विरहित वर्गलढे उभारणे असे लक्षवेधी सामाजिक परिवर्तनाचे आणि समाजप्रबोधन करणारे उपक्रम राबविने काळाची गरज आहे.जो पर्यंत ते राबविले जाणार नाहीत,तो प्रयन्त महाराष्ट्रात सामाजिक सुसंवाद साधला जाणार नाही.मनुवादी विचारांच्या संस्था संघटना पक्ष वाढत जाणार हे उघड आहे. 

    नामांतरानंतर सामाजिक परिवर्तनाची अपेक्षित चळवळपुढे गेली नाही हे खरे असले तरी नामांतरानंतर विद्यापीठाची गुणात्मक उंची वाढली हे नाकारता येत नाही. नामांतर झाले तर हे बौद्धांचे,दलितांचे विद्यापीठ होणार, अभ्यासक्रम बुद्ध धर्माधिष्ठित होणार,दलितांनाच इथे नोकऱ्या लागणार,सर्वात नीचपणा लोकसत्ता दैनिकाचे संपादक माधव गडकरी यांनी केला होता. खरी वैचारिक फुट पडणारी आग त्यांनी लावली होती. तथाकथित सुवर्ण मराठा समाजातील तरुण या विध्यापीठातून पदवीधर झाला तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असणारे प्रमाणपत्र घरातील दर्शनी भागत लावावे लागेल.हा प्रचार एका मान्यताप्राप्त दैनिकाच्या मनुवादी विचारांच्या  संपादकाने केल्यामुळे कॉंग्रेस मधील मराठा समाजाचे बहुसंख्य तरुण मुले शिवसेनेकडे गेले त्यांनी बाळकडू पिऊन ग्रामीण भागात आक्रमक झाले.त्यामुळेच मुंबई ठाण्यापुरती असलेली शिवसेना खेड्यापाड्यातील गावा गावात गेली.त्यामुळेच ती आज सत्तेजवळ गेली.हा इतिहास नामांतर चळवळीतुन तालुका जिल्ह्याचे नेते झालेले नेते.आज स्वताला संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय नेते म्हणून विसरले असतील.तसेच समाज पण विसरला असेल तरी इतिहास हा इतिहास असतो.तो सोयीनुसार विसरलो म्हणून खोटा ठरत नाही.  

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद असे नामांतर झाल्यास अन्य महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नता तोडणार, विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा ढासळणार असा जो अपप्रचार करण्यात येत होता तो आज शंभर टक्के खोटा ठरून नामांतरानंतर या विद्यापीठाचा भौतिक विकास झाला, शैक्षणिक दर्जा वाढला. मुंबई-पुणे विद्यापीठानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘ए-ग्रेड’ मिळविला. पण तरीही नामांतराचे पुढचे पाऊल हे मानसिक परिवर्तनास चालना देणाऱ्या चळवळी गतिमान करणे हेच असावे, याविषयी दुमत नसावे.नामांतरामुळे जे नेते झाले तेच रिपाई पूर्वीच्या गटबाज नेत्यापेक्षा जास्त समाजासाठी चळवळी करिता नालायक धोकादायक बनले असे लिहले तर चूक ठरणार नाही,आजच्या नेत्यांनी खासदार की,आमदारकी करिता कोणा सोबत युती आघाडी केली म्हणुन आम्ही बाळकडूची कामगिरी विसरू शकत नाही. त्यामुळे आजच्या तरुणा पुढे मोठा प्रश्न आहे. नामांतराचा स्मृतीदिन साजरा करावा की जयंती दिन कारण नामांतर तर झालेच नाही, झाला तो नामविस्तार!.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेऊन जयजयकार करणाऱ्यांनी याचा गांभियाने विचार करून आंदोलन करण्याची मर्यादा लक्षात घेऊन मतदारसंघ आणि संविधानाच्या चौकटीत राहून वैचारिक पातळीवर पक्ष किंवा संघटना बांधणी करावी.तरच भविष्यात स्वाभिमानाने जगता येईल.

सागर रामभाऊ तायडे,
भांडुप मुंबई, 9920403858,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com