ठाण्यात दि.५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान एकूण आठ दिवसांच्या भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घोडबंदर रोड विभागातील आनंदनगर येथील मूच्छाला कॉलेजच्या मागे असलेल्या महापालिका मैदानात हा महोत्सव होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वैष्णवी प्रतिष्ठानतर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांनी आज येथे दिली. मागील सुमारे ७ वर्षे घोडबंदर रोड विभागात दरवर्षी भरणारा आणि येथील आबालवृद्धांची मोठी पसंती व उदंड प्रतिसाद लाभणारा हा भरगच्चं सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारा महाराष्ट्र महोत्सव गेली दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नव्हता. त्यामुळे यावर्षी सलग आठ दिवस चालणाऱ्या या भव्य-दिव्य महाराष्ट्र महोत्सवात दरदिवशी विविध सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रम, नृत्यस्पर्धा, पैठणीचा खेळ, महाहळदीकुंकू, महाराष्ट्र श्री स्पर्धा वगैरे कार्यक्रम सुप्रसिद्ध कलाकारांतर्फे सादर होणार असून या महोत्सवात आगरी - कोळी पद्धतीच्या विविध वस्तू व रुचकर झणझणीत खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार असल्याचेही नरेश मणेरा यांनी सांगितले.
आठ दिवस दररोज सायं. ०७.०० ते रात्रौ १०.०० या वेळेत होणाऱ्या या महाराष्ट्र महोत्सवात दि.०५ फेब्रु. २०२३ रोजी " उत्सव महाराष्ट्राचा " हा महाराष्ट्राचे सण उत्सव व लोकगीतांवर आधारित सांगीतिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुप्रसिद्ध कलाकार अक्षया अय्यर, नितीन तुपे, प्रीतम बावडेकर व अमृता दहिवेलकर सादर करणार आहेत. दि.०६ फेब्रु. २०२३ रोजी " खेळ पैठणीचा " हा महिलांचा अत्यंत आवडीचा खेळ क्राईम पेट्रोल फेम सतीश नायकोडी यांचे सूत्रसंचालनाखाली रंगणार आहे. दि.०७ फेब्रुवारीला " ट्रिब्यूट टू लता मंगेशकर " या कार्यक्रमात गानसम्राज्ञी स्व. लतादीदी मंगेशकर यांची अजरामर गीते सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई, केतकी भावे-जोशी, धनश्री देशपांडे, संपदा गोस्वामी व आर.जे.अमित काकडे हे सादर करणार आहेत. तर दि. ०८ फेब्रुवारीला " महाराष्ट्र श्री " शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे.
दि.०९ फेब्रुवारी रोजी " आगरी-कोळी बाणा " हा आगरी-कोळी पारंपरिक गीतांचा व नृत्याचा कार्यक्रम लोकप्रिय कलाकार सोनाली सोनावणे, योगेश अग्रावकर, पौर्णिमा काकडे, निलेश जोशी, आरजे अमित आणि वंदना पांचाळ या सादर करणार आहेत. तर दि.१० फेब्रुवारीला " लाखात देखणी " हा लोकप्रिय व गाजलेल्या लावणी नृत्यांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध नृत्यांगना दीप्ती आहेर, आकांक्षा कदम, सुकन्या काळण, सोनाली पवार व सोनाली पाटील या सादर करणार आहेत. दि.११ फेब्रुवारीला सुचित्रा सावंत आणि मेघा साळवी यांचे सूत्रसंचालनाखाली घोडबंदर रोड विभागातील लहान थोरांच्या नृत्यगुणांना वाव देण्यासाठी " नृत्यस्पर्धा " रंगणार आहेत. तर दि.१२ फेब्रुवारीला सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांचा लोकप्रिय गीतांचा लाईव्ह कार्यक्रम होणार आहे.
या महाराष्ट्र्र महोत्सवात नेत्रदीपक प्रवेशद्वार, सजावट, देखावे व आकर्षक विद्युत रोषणाई असणार असून या भव्य - दिव्य महोत्सवाची जोरदार तयारी या महोत्सवाचे आयोजक वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेनेचे ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडी करीत आहेत. या भव्य - दिव्य महाराष्ट्र महोत्सवास घोडबंदर रोड विभागातील आबालवृद्ध नागरिकांनी नेहमीप्रमाणे उपस्थित राहून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा व मनोरंजनाचा आनंद लुटावा असे आवाहन महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक नरेश मणेरा यांनी केले आहे.
0 टिप्पण्या