दर्शन सोळंकी याच्या शवविच्छेदनाची परवानगी कुणी दिली? शवविच्छेदनाकरिता आई-वडील अथवा जवळच्या नातेवाईकांची परवानगी आवश्यक असताना दर्शनचा मृतदेहाचे शवविच्छेदन आयआयटी प्रशासनाने कुणाच्या परवानगीने केले. असा सवाल राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केला. मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांनी आज याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस पक्षाचे रमेश कांबळे, भीम आर्मी संघटनेचे शशांक कांबळे तसेच कॉ.सुबोध मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील पवई येथील आयआयटीमध्ये आयआयटी बॉम्बेमध्ये बी. टेकच्या पहिल्या वर्षात शिकणाऱया एका 19 वर्षीय दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने वसतीगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्याने जातीधिष्ठित हिणकस वागणूक मिळाल्यामुळे दुर्दैवी निर्णय घेतला, असा सर्वत्र संशय व्यक्त केला जात आहे. अनेक सामाजिक व शैक्षणिक संघटना सातत्याने आयआयटी-मुंबई समोर न्यायासाठी निदर्शने करीत आहेत. या सर्व प्रकरणाची महाराष्ट्र शासनाच्या एस.आय.टी.मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी मुणगेकर यांनी केली.
प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी पवई पोलीस स्टेशनला भेट देऊन चौकशी केली. याबाबत मला खात्रीलायक असे समजते की दर्शनचा मृतदेहाचे शवविच्छेदन त्याच्या वडिलांच्या संमती शिवाय करण्यात आले. त्यामुळे दर्शनने जातिभेदामुळे आत्महत्या केली असावी, या संशयाला पुष्टी मिळते. मी संस्थेचे संचालक डॉ. सुभाश चौधरी यांची या घटनेसंबंधी भेट घेतली. त्यांनी यासाठी आयआयटी अंतर्गत विद्यार्थी प्राध्यापकांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. मात्र अशी समिती या घटनेला न्याय देऊ शकेल याबाबत आमचा विश्वासच नाही.
तेव्हा या सर्व प्रकरणाची महाराष्ट्र शासनाने शहनिशा करण्यासाठी या घटनेचा तपास एस.आय.टी. सोपवावा या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना बुधवार दि. 1 मार्च रोजी दुपारी 3 वाजता आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करत आहोत. या आंदोलनाकरिता दर्शन सोळंकीचे वडील रमेशभाई सोळंकी जातीने उपस्थित राहणार असून या आंदोलनात ते सहभाग नोंदवणार आहेत. तरी सर्व न्यायप्रिय संघटनांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन निमंत्रक म्हणून भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
कॉ.सुबोध मोरे यांनी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणाला दहा दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी पोलिस प्रशासनाने याबाबत अद्यापही गुन्हा नोंद केला नसून, या आत्महत्येबाबत अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद व्हावा आणि पोलिसांनी तात्काळ संशयीत आरोपींना ताब्यात घ्यावे अशी मागणी केली. तर शशांक कांबळे यांनी दर्शन सोळंकी आत्महत्येबाबत आयआयटीच्या प्रशासनावर ताशेरे ओढले. या आयआयटीमध्ये दोन ग्रुप कार्यरत आहेत. एक कट्टर जातीवादी तर दुसरा आंबेडकरी. कट्टर जातीवादी ग्रुपचे विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत इतर विद्यार्थ्यांना त्यांच्यात सहभागी करून घेत नाहीत. ऐन कैन प्रकरणी त्याची छळवणूक करीत असतात. याबाबत आयआयटी प्रशासन मौन बाळगून आहे. येथील प्राध्यापक आणि इतर कर्मचारी वर्ग हा 85 टक्के स्वतला उच्च समजणाऱया जातीतून आला आहे. त्यामुळे येथील प्रशासनाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. आता यासाठी ठोस आंदोलनाची गरज असल्याचे प्रतिपादन कांबळे यांनी केले.
0 टिप्पण्या