अतिक्रमण विभाग हा सर्वात बदनाम विभाग असून त्याची प्रचिती आज ठाण्यात दिवसेंदिवस येत आहे. कुणाच्या अधिपत्याखाली आजपर्यंत ठाणे होते. कुणाचे वर्चस्व आजही ठाण्यात आहे. कुणी कुणी गद्दारी करून पक्षांतर केलं. या सर्व बाबींचं कनेक्शन आज ठाण्यात महेश आहेर प्रकरणात आहे. त्यामुळेच आज यांचे प्रवक्ते या बाबीचं समर्थन करताना दिसत आहेत. त्यामुळे आता ठाणे हे गुंडागर्दीचे शहर म्हणून उदयास येत आहे. आज उद्या राजकारण संपेल तेव्हा मात्र कुठे नेऊन ठेवलाय ठाणे माझा हा प्रश्न जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. आज धर्मविरांच्या या ठाणे जिल्ह्यात धर्मवीरानी असली प्रकरणे खपवून घेतली असती का असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाढवे यांनी केला.
ठाणे महानगर पालिकेचे सहा.आयुक्त महेश आहेर यांच्या व्हायरल ध्वनिफीतमुळे ठाण्यातील वातावरण तापले असून याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गाढवे बोलत होते. त्यांच्यासोबत प्रवक्ते चंद्रभान आझाद तसेच सह प्रवक्ते तुषार रसाळ यावेळी उपस्थित होते. महेश आहेर यांनी आपण ४० लाख रुपयांचे कलेक्शन दर दिवशी करत असल्याची वाच्यता या ऑडीओ क्लिपमध्ये केली आहे. तर ही रक्कम महेश आहेर कोणकोणत्या बिल्डरकडून, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून, ठेकेदारांकडून वसूल करतात आणि कोणा कोणाला पोहोचवतात याची चौकशी करण्यासाठी त्यांची सी.डी.आर मागवावी. जेणेकरून याबाबतचे सर्व पुरावे मिळतील. यामुळे मग खरे गुन्हेगार उघडकीस येतील असा विश्वास चंद्रभान आझाद यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री ठाण्यातले असल्यानेच ठाण्यात काय घडतं हे त्यांना तात्काळ कळते. मात्र मागील दोन दिवसांपासून प्रत्येक ठाणेकरांना कळलेली माहिती मुख्यमंत्र्यांना कळली नाही हे कसे शक्य आहे. आज ठाण्यातील राजकीय युद्धात परिवाराचा बळी देण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे आज ठाणेकरांचे परिवारही सुरक्षित राहिलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच असल्याचे मत गाढवे यांनी व्यक्त केले.
परिवाराला संपवण्यासाठी शार्पशुटर नेमलेत, बाबाजीला सांगण्यात आलेय, कोण आहे हा बाबाजी पोलिस यंत्रणेने तात्काळ या सर्व प्रकरणाची शहनिशा करावी अशी मागणीही गाढवे यांनी यावेळी केली. स्पेनपर्यंत ही घटना पोहोचली आहे. याचा अर्थ काय? किती देशात यांची महती पोहोचली आहे. या गँगस्टर प्रवृत्तीचा आणि या सर्व घटनेचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर निषेध करतो.
इथे अन्यायाला स्थान नाही ही आमच्या पक्षाची आधीपासूनच भूमिका आहे. आज जरी ते दुसऱ्या पक्षाच्या आमदाराबाबत घडत असले तरी तेही महाविकास आघाडीचे घटक आहेत. आणि जरी आम्ही आघाडीचे घटक नसतो तरी आम्ही या अन्यायाचा निषेधच केला असता. असेही गाढवे म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही तर यापुढे ठाणेकरांचं काही खरे नाही. सर्व ठाणेकर परिवराच्या बाबतीत हेच घडल्याशिवाय राहणार नाही असे भकीतही गाढवे यांनी व्यक्त केले.
याआधीही महापालिकेचे अधिकारी सुबोध ठाणेकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची अनधिकृत बांधकामाबाबत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. मात्र या घटनेचीही कोणत्याच प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. आज कळवा मुंब्र्याचे तीन तेरा वाजलेत. अतिक्रमणाने ही शहरे ग्रस्त झाली आहेत. मात्र पालिका प्रशासन याकडे जाणिवपूर्वक डोळेझाक करीत आहे. विस विस लाखाच्या लाच मागितल्या जात असल्याचा आरोप गाढवे यांनी केला. महेश आहेर सारखी व्यक्ती लिपिक पदावरून आज सहा.आयुक्तापर्यंत कशी पोहोचली. यांची शैक्षणिक पात्रता काय? असा सवाल करून अशी व्यक्ती आज एका आमदाराच्या परिवाराला उध्वस्त करण्याची भाषा करते याची चौकशी फास्ट ट्रॅकवर व्हावी अशी मागणी गाढवे यांनी केली. या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आम्ही ठाम राहणार असेही गाढवे यांनी सांगितले.
गँगस्टर लोकांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटत असतील तर संविधानाची शपथ ब्रेक करून कायद्याचे उल्लंघन होत आहे असे दिसून येते. प्रसिद्धीमाध्यमातून ही बाब सर्वत्र होत असताना मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र याचा इन्कार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमे चालवत असून ते संपूर्णपणे चुकीचे आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशी कोणतीही भेट घेतलेली नाही असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे. तेव्हा याबाबत आता रुग्णालय प्रशासनानेच शिंदे हॉस्पिटल मध्ये आले, कोणत्या कक्षात कोणाला भेटले याचा सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करावा म्हणजे सत्य समोर येईल, गोल्डन गँग चालवीत असलेले राजकारणी आणि अधिकारी किती टोकाला जावून ठाणेकरांचे जीवन अशांत व अस्वस्थ करीत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रा चंद्रभान आझाद शिवसेना प्रवक्ते ठाणे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या