ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी..... या नाट्यगीताने अजरामर झालेल्या गोड गळ्याच्या जेष्ठ गायिका वाणी जयराम यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने गायन क्षेत्रातील आणखी एक तारा निखळून पडला. ३० नोव्हेंबर १९४५ रोजी जन्मलेल्या वाणी जयराम या जरी मूळच्या दक्षिणे भाषेतील गायिका असल्या तरी त्यांनी मराठी भाषेतही अनेक गाणी गायली. मराठीसह तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेतही त्यांनी अनेक गाणी गायली. त्यांनी १८ भारतीय भाषेतून १० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. वाणी जयराम या लहान असतानाच सिलोन रेडिओवर हिंदी गाणी ऐकायच्या. ते गाणी त्या गुणगुणायच्या.
वाणी जयराम यांनी वयाच्या ८ व्या वर्षीच मद्रास आकाशवाणीवर गाणे सादर करून आपल्या प्रतिभेचा आविष्कार जगाला दाखवून दिला होता. मद्रास युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ स्टेट बँकेत नोकरी केली. वाणी जयराम यांचे लग्न संगीताची आवड असलेल्या कुटुंबात झाले. त्यांचे पती जयराम यांनाही संगीताची खूप आवड होती. ते त्यांना नेहमी गाण्यासाठी प्रोत्साहित करत. लग्नानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि त्या मुंबईत आल्या. मुंबईत त्यांनी संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ व्यावसायिक गायिका म्हणून काम करण्याच्या निर्णय घेतला.
१९७१ साली गुड्डी चित्रपटात तीन गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश मिळवला. या चित्रपटातील त्यांनी गायलेले हमको मन की शक्ती देणा हे गाणे आजही अनेक शाळांमध्ये प्रार्थना गीत म्हणून गायले जाते. वाणी जयराम यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९८० साली मीरा या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. त्यांना एकूण तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वाणी जयराम यांना अलीकडेच पद्मभूषण या भारतातील सर्वोच्च तिसऱ्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दाक्षिणात्य कलाकार असूनही त्यानी मराठी नाट्यगीत आणि भावगीतामध्ये प्राविण्य मिळवले. त्यांनी गायलेली नाट्यगीते व भावगीते कमालीचे लोकप्रिय झाली.
अलीकडेच त्यांच्या कारकीर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाले. आपल्या ५० वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय गाणी गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वाची मोठी हानी झाली आहे. गोड गळ्याच्या जेष्ठ गायिका वाणी जयराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५
0 टिप्पण्या