बुधवार दि. ८ फेब्रुवारी रोजी या परिसरात तेथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची ते जनतेच्या बाजूने बातम्या देतात म्हणून करण्यात आलेली पाशवी हत्या अतिशय धक्कादायक, दुःखद आणि कमालीची संतापजनक आहे. रिफायनरी प्रकल्पाचे एक कंत्राटदार आणि समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीचे भारतीय जनता पक्षासोबत घनिष्ट संबंध असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांच्या तपासावर राजकीय दडपण येण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी कसल्याही दडपणाला भीक न घालता आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडत या गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत.
राज्याच्या शिंदे फडणवीस सरकारला राजकीय नीतीमत्तेची जराही चाड असेल तर त्याने तेथील जनक्षोभ ध्यानात घेऊन रिफायनरीच्या कामास त्वरित स्थगिती द्यावी. जनतेला उध्वस्त करणारे प्रकल्प तिच्या माथी मारून हत्येसारख्या पापाचे धनी होऊ नये. हत्या झालेल्या पत्रकाराच्या कुटुंबास महाराष्ट्र सरकारने पन्नास लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहीती पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
------------------------------------------
भूमिका घेणारा पत्रकार कोणत्याच नेत्याला अथवा राजकीय पक्षाला आवडत नाही.. शशिकांत वारिशे यांनी तर राजकीय पक्षांचे हितसंबंध ज्या रिफायनरीत गुंतलेले आहेत त्याला विरोध करणारी भूमिका घेतली होती.. ही भूमिका भुमीपूत्रांच्या हिताची असली तरी ती दलाल आणि धनदांडगयांना पचणारी नव्हती.. एक पत्रकार समाजहिताची भूमिका घेऊन सातत्यानं त्याविरोधात आवाज उठवतो आहे, त्याच्यामुळे आपले हितसंबंध धोक्यात येत आहेत हे पाहून पित्त खवळलेले दलाल आणि हितसंबंधी यांनी शशिकांत वारिशे यांचा आवाज कायमसाठी बंद करण्याचं षडयंत्र रचलं आणि ते प्रत्यक्षात आणलं देखील..
पत्रकारांकडून समाजाच्या भरपूर अपेक्षा असतात.. त्या रास्त ही असतात.. परंतू समाजाच्या या अपेक्षा पूर्ण करताना पत्रकारांचे जेव्हा बळी जातात किंवा पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा समाजाची भूमिका काय असते? अनेकदा असं दिसून आलंय की, समाज शांत असतो..मला काय त्याचे हीच समाजाची भूमिका असते.. रिफायनरी विरोधात सातत्यानं लिहिणारया शशिकांतची हत्या झाल्यानंतर समाजातून किंवा समाजहिताचं काम करणार्या संस्था, संघटनांकडून निषेधाचा सूर अजून तरी व्यक्त झालेला नाही.. आम्ही पत्रकार घटनेचा निषेध करणारच पण हा केवळ एका घटका पुरता मर्यादित विषय आहे का? तर नाही.. समाजस्वास्थय आणि माध्यम स्वातंत्र्या बरोबरच लोकशाही टिकली पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं अशा सर्वांसाठी शशिकांतची हत्त्या हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असला पाहिजे...."भूमिका घेणारी व्यक्ती एकटी नाही" हा संदेश जोपर्यंत राज्यकर्त्यांपर्यत पोहोचणार नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार असल्याने लोकहितासाठी काम करणारया व्यक्ती, संघटनांनी शशिकांतच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुढं आलं पाहिजे.. असं आमचं आवाहन आहे. तशी विनंती देखील आहे.. असं झालं नाही तर कोणताही पत्रकार कोणत्याच विषयावर भूमिका घेणार नाही.. मग पत्रकार भूमिका घेत नाहीत हा टाहो देखील आम्ही ऐकून घेणार नाही..
एस.एम देशमुख
---------------------------------------------
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील पत्रकार काळ्या फिती लावून तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करतील.. नंतर अधिकारयांना निवेदनं देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त करतील. मुंबईतील सर्व पत्रकार संघटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता गांधी पुतळ्यासमोर काळया फिती लावून आंदोलन करतील आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देतील. यानिमित्तानं पुन्हा एकदा राज्यातील पत्रकार संघटना एकत्र येत आपलयामधील एकजुटीचं दर्शन घडवत आहेत.
आज झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत राज्यातील पत्रकारांवर होणा-या हल्ल्याच्या संदर्भात सांगोपांग चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन करावे असा निर्णय घेतला गेला. त्यानुसार राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांशी चर्चा करून उद्याच्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी या आंदोलनात राज्यातील सर्व पत्रकार तसेच संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणारऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे.. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दिनांक १० फेब्रुवारी रोजी राज्यभर पत्रकार काळ्या फिती लावून काम करतील आणि तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतील. हा विषय सर्व पत्रकार आणि संघटनांसाठी जिव्हाळ्याचा असल्याने स्थानिक पातळीवरील सर्व मतभेद बाजुला ठेऊन सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाने केले आहे
----------------------------------------------------------------
रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पत्रकार शशिकांत वारीसे त्यांच्या गाडीला सोमवारी (6 फेब्रुवारी) पंढरीनाथ आंबेरकर याच्या कारने जोराची धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूरला मृत्यू झाला होता. दरम्यान पत्रकार वारिसे यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्याबाबत प्रसिद्ध केलेली बातमी आणि त्यांचा झालेला अपघात ही वेळ पाहता हा नक्की अपघात की घातपात? याची चर्चा सध्या कोकणात सुरु झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कुंभवडे या गावचा रहिवासी.पंढरीनाथ आंबेरकर सुरुवातीच्या काळात छोटासा आंबा व्यापारी . 2017 सालानंतर मात्र आर्थिकदृष्टीने सक्षम झाला. कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाची घोषणा झाली आणि त्यानंतर त्याने काही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. स्वतः देखील काही जमिनी खरेदी केल्या. यामध्ये त्याला आर्थिक नफा चांगलाच झाला. दरम्यानच्या काळात टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपला व्यवसाय सुरु केला आणि वाढवला. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आताची घोषणा बारसू आणि सोलगाव येथे झाली. या ठिकाणी देखील आंबेरकर याने जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. तसेच स्वतःसाठी देखील काही जमिनी खरेदी केल्या. याबाबतच्या अनेक गोष्टी आपणाला राजापूर परिसरामध्ये ऐकायला मिळतात.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात एका सभेमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आंबेरकर आणि काही जणांनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी राजापूर कोर्टाच्या आवारामध्ये नरेंद्र जोशी या रिफायनरी विरोधकांच्या नेत्यावर हल्ला केला. याप्रकरणी त्याच्या विरोधात राजापूर पोलीस स्टेशन येथे कलम 143, 146, 147, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तर राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस स्टेशन येथे अश्विनी अशोक वालम शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी 14 जानेवारी 2018 रोजी कलम 143, 147, 149, 323, 504 आणि कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी वालम या कोकण रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या पत्नी आहेत. त्यांच्यासह काही महिला एकत्र आल्या होत्या. त्यावेळीही शिवीगाळ करण्यात आले आणि अशोक वालाम यांना मारण्याची धमकी देण्यात आली, असा उल्लेख या FIR मध्ये करण्यात आला
-----------------------------------------------------
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची निघृण हत्त्या करणार्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. रिफायनरीला विरोधाची भूमिका घेणारे शशिकांत वारिशे यांनी एक बातमी दिल्यामुळे त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली.. या बातमीचा राज्यभर निषेध होत असतानाच किरण नाईक यांनी तातडीने भेट घेऊन या प्रकरणी सरकारने लक्ष घालून आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.. त्यावर या प्रकरणी लक्ष घालून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे..
-------------------------------------------------------
0 टिप्पण्या