काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात पूजा करताना मंदिरातील तथाकथित महंतांनी ‘पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला. मात्र वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे महंतांनी सांगितले, नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला आहे. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला आलेला अनुभव लिहिला आहे. तसंच नाशिकमध्ये महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणून दिले नाहीत असा आरोप केला आहे.
हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणाऱ्या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्यांना सद्बुद्धि दे…हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे,माणसाने माणसाशी माणसासम वागणे.. असं संयोगीताराजे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आपण सर्वजण देवाची लेकरे…आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते.
त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले. नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हटली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे…अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!- अशी पोस्ट संयोगीताराजे छत्रपती यांनी आपल्या इंस्टाग्रामवर लिहिली आहे. अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजेंनी रामनवमीच्या दिवशी केल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रबळसत्ते विरुद्ध 18 पगड जातीतील मावळ्यांच्या मदतीने महाराष्ट्राचे स्वराज्य निर्माण केले त्या छत्रपतीचा राज्याभिषेक शूद्र म्हणुन महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नाकारला, तसेच राजर्षी शाहू महाराजांना शूद्र म्हणून वेदोक्त मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही असे बजावले. त्याच छत्रपतीच्या घराण्यातील राजस्त्रियांना आज देखील वेदोक्त मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही असे नाशिक येथील त्रंबकेश्वर मंदिरातील पुजारांनी बजावले. आणि पुराणूक्त मंत्र म्हणून देवकार्य केले. पुरोगामी म्हणून दिंडोरा पिडणाऱ्या महाराष्ट्रात आजही ही शोकांतिका घडत असताना राजकीय नेते मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. याची खरी तर लाज वाटली पाहिजे.
अजूनही छत्रपतीच्या घराण्याला ह्या महाराष्ट्रात शूद्र समजून वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही म्हणून सरळ नाकारले जात असेल तर हिंदुराष्ट्रत बहुजनांची काय स्थिती असेल? याबाबत बहुजन वर्गाने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजातील व्यक्ती आधुनिक काळात शिकून पद प्रतिष्ठा आणि आर्थिक दृष्टीने संपन्न झाला तरी सामाजिक दृष्टीने तो शुद्रच समजल्या जात आहे. जरी त्याने देव-धर्मा साठी दंगली केल्या - दगड-धोंडे खाल्ले, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, केसेस झेलल्या तुरुंगात गेला, जीवन उधवस्त करून घेतले तरी त्याला इथली व्यवस्था शूद्रच समजणार. कितीही छाती फुगवून तो म्हणाला... गर्व से कहो....... तरी तू शूद्रच.
बहुजन समाजाने त्यांच्या उत्थानाची आणि सामाजिक स्टेटस ठरविण्याची जबाबदारी या तथाकथित उच्चवर्णिय समजणाऱ्याकडे दिली. त्यांची बुद्धी अजूनही या वर्गाच्याच ताब्यात आहे. छत्रपतींच्या घराण्यातील स्त्रीयांबाबत नुकताच घडलेल्या प्रकाराने अजूनही बहुजन समाज काहीच शिकत नसतील आणि स्वतःला शूद्र समजून घ्यायलाच आनंदाने तयार असतील तर त्याला काही उपाय नाही. मागच्या वेळेस पुण्यातील खोले प्रकरणात निषेध करणारे तसेच आता छत्रपतीच्या राजघराण्यातील स्त्रीच्या अपमानित करणाऱ्याच्या पुजाऱ्या विरोधात तत्वत: तथाकथित बामणशाही विरोधी भूमिका घेऊन कार्यवाही करणार आहेत का? असा प्रश्न आहे.
0 टिप्पण्या