हिंदू हा फारसी शब्द आहे. ‘हिंद’ आणि ‘हिंदू या शब्दांचा धर्माशी खरंतर काही संबंध नाही. सिंधू नदीच्या पलिकडील भौगोलिक कक्षेत येणाऱ्या प्रदेशाला ‘हिंद’ असं म्हटलं जातं. ‘हिंद’ या शब्दाचा उल्लेख उमर खैय्यामने बाराव्या शतकातही केला होता. सुभाषबाबूंनी दिलेली ‘जय हिंद’ ही घोषणा कोणत्याही धर्मासाठी नव्हती. ‘हिंदवी स्वराज्य’ हा शब्दही धर्ममूलक नाही तर तो प्रदेशाशी संबंधित आहे. हिंद, हिंदू, हिंदुस्तान या सगळ्या शब्दांचा धर्माशी मूलतः संबंधच नाही.
भारतामध्ये मुस्लिमांव्यतिरिक्त ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारसी आणि अत्यल्प प्रमाणात ज्यू हे अल्पसंख्याक लोक राहतात. त्यांना धर्म आहे, धर्मसंस्थापक आहे आणि धर्माचं म्हणून एक पुस्तक आहे. याउलट भारतात बहुसंख्याक असलेल्या आणि स्वतःला ‘हिंदू’ म्हणवणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांचा हिंदू हा धर्म नसून तो भौगोलिक प्रदेशाशी संबंधित संस्कार आहे… चांगला आणि वाईटही.
वेद हे अपौरुषेय आहेत, असं मानलं जातं. त्यामुळे इथे संस्थापकाचा प्रश्नच येत नाही. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे पौराणिक ग्रंथ असून ती महाकाव्यं आहेत. जसं ग्रीसमध्ये होमरने लिहिलेली ‘इलियड’ आणि ‘ओडेसी’ ही महाकाव्यं आहेत. ‘रामायण’ महर्षी वाल्मिकींनी लिहिलं आणि ‘महाभारत’ महर्षी व्यासांनी लिहिलं, असं मानलं जातं. वाल्मिकींनी लिहिलेलं ‘रामायण’ हे मुळात राम-रावण युद्धानंतर समाप्त होतं. त्यानंतर उत्तरकाळात त्यामध्ये अनेक श्लोकांची आणि कथांची भर घालण्यात आलेली आहे. ‘महाभारता’च्या बाबतीतसुद्धा तसंच म्हणता येईल. ही दोन्हीही महाकाव्यं हा समाजातल्या असाधारण प्रतिभेचा आणि सृजनशीलतेचा दाखला आहे. ‘महाभारता’त घडलं नाही असं या पृथ्वीवर काहीच नाही, अशा अर्थाचा एक श्लोक आहे जो वास्तवामध्ये रोज अनुभवावा असा आहे. असं असलं तरी या सगळ्या कथा आहेत, तो इतिहास नाही. इंग्रजीत ज्याला मायथॉलॉजी म्हणतात त्याला मराठीत मिथक असं म्हटलं जातं. मिथकांचे नायक हे कितीही उदात्त असले तरी ते फक्त त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक साहित्याचा एक भाग असतात. समकालीन वास्तवाशी त्यांची गल्लत करणं धोकादायक होतं.
आज ऐरणीवर आलेल्या मुद्द्यासंदर्भात लिहीत असताना ‘हिंदुत्व’ नावाच्या एका धार्मिक राजकीय धारणेशी आपण झगडत आहोत. या संकल्पनेचा दंश आणि डंख भारतीय समाजातलं प्रेम, वैविध्य, शाश्वत मूल्यं आणि नैतिकता सारं नष्ट करत आहे. यामागचं कारण असणारं ‘हिंदुत्व’ हे भासमान आणि राजकीय आहे, वास्तविक नाही. त्याची निर्मिती राजकीय भयंकरातून झालेली आहे. त्यात शुभंकर असं काहीही नाही. वेदांमधल्या ‘यजुर्वेदा’ मध्ये ‘धर्म’ असा जो उल्लेख येतो तो ‘ब्राह्मणधर्म’ असा येतो, ‘हिंदुधर्म असा नाही, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं.
अरबस्तानामध्ये इस्लामच्या उदयाअगोदर जशा वेगवेगळ्या टोळ्या अस्तित्वात होत्या, तद्वत हिंदुस्तानामधील सामाजिक रचना ही जातींमध्ये विभागली गेलेली होती. त्यामध्ये एक उतरंड होती. विविध जाती ह्या इथल्या टोळ्याच होत. शूद्र-अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या या जातींचा इथल्या मूळ, स्थानिक संस्कृतीशी संबंध होता. मूळ संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या या जाती मूर्तिपूजक होत्या. पण ही मूर्तिपूजा एक धर्म म्हणून नव्हती, तर स्थानिक संस्कृतीचा तो एक अविभाज्य भाग होता. ज्याप्रमाणे ख्रिश्चानिटीच्या उगमाअगोदर ग्रीसमध्ये अपोलो, झ्यूस, अथेनाकिंवा पोसायडन अशा देवतांची पूजा केली जात असे, त्याचप्रमाणे इथल्या स्थानिक जाती-जमाती मूर्तिपूजक होत्या, तर वैदिक आर्य हे यज्ञसंस्कृतीचा भाग होते. हा भेद लक्षात घ्यायला हवा. म्हणूनच इथल्या जातींना एका धर्माच्या आधिपत्याखाली आणून आपण गल्लत करतो. इथे जो धर्म होता तो ‘यजुर्वेदा’मध्ये उल्लेख केलेला ब्राह्मणधर्म होता.
कारण हिंदू हा जर एकधर्म असता तर विविध जातींमधल्या रोटीबेटी व्यवहाराला सहज मान्यता असती. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर इतर धर्मातून हिंदू धर्मात येऊ पाहणाऱ्याला धर्मांत सहज प्रवेश मिळाला असता. पण अशा पद्धतीने कोणालाच हिंदू धर्मात प्रवेश मिळत नव्हता. कारण हिंदू धर्मात घ्यायचं म्हणजे कोणत्या जातीत घ्यायचं, हा मुख्य प्रश्न होता. आजही जर एखादा परधर्मी मनुष्य हिंदू धर्मात येऊ पाहत असेल तर त्याला शूद्र मानल्या जाणाऱ्या जातीत घेणार की ब्राह्मण जातीत घेणार? याला धर्म म्हणून काही नियम आहे का? तर नाही. कारण हिंदू हा धर्म नाही.
म्हणूनच हे हिंदुत्व काय आहे? हा प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न असा की, हिंदुत्व असेलच तर मग बहुजनांचं हिंदुत्व काय आहे आणि ब्राह्मणांचं हिंदुत्व काय आहे ? कारण बहुजनांसाठी जे हिंदुत्व आहे ते ब्राह्मणांचं नाही आणि ब्राह्मणांचं जे हिंदुत्व आहे ते बहुजनांचं नाही आणि ते तसं कधीच नव्हतं, याला इतिहास साक्ष आहे.
ब्राह्मण नसलेल्या म्हणजेच ब्राह्मणेतर असलेल्या बहुजनांना अपौरुषेय मानलेल्या वेदांच्या उच्चारणाचे, अध्ययनाचे अधिकार कधीच नव्हते. कारण वेदांवर अधिकार सांगणाऱ्या ब्राह्मणांच्या दृष्टीने इथले बहुजन हे त्यांच्या ब्राह्मणधर्माचा भाग नव्हते. तर ते एका अशा उतरंडीवर आधारित रचनेचा भाग होते ज्यामध्ये त्यांनी कोणती कामं करायची आणि कोणती कामं करायची नाहीत, हे निश्चित करण्यात आलं होतं. त्यांचा दर्जा शूद्र-अतिशूद्र असा ठरवण्यात आला होता. कामाच्या बदल्यात त्यांना मिळू शकणारा मोबदला आणि शिक्षा याही निश्चित करण्यात आल्या होत्या. यातून शोषणाची एक भलीमोठी संस्कृती उभी राहिली ज्यामध्ये शोषक म्हणून सर्व नाड्या ब्राह्मणांच्या हातात होत्या आणि आजही आहेत. ब्राह्मणी श्रेष्ठत्वावर आधारलेला ब्राह्मण धर्म हाच पुढे ब्राह्मणवाद म्हणून विकसित होत गेला. त्यालाच आज आपण हिंदुत्व असं म्हणतो. अर्थातच त्याचं आजचं विकसित स्वरूप हे राजकीय आहे. कोणत्याही अर्थाने ते अध्यात्मिक नाही.
जे जे परकीय आक्रमक भारतात आले ते आपल्याबरोबर एक धर्म घेऊन आले. त्यातला इस्लाम हा सर्वात मोठा धर्म होता. पोर्तुगीजांसारख्या आक्रमकांनी ख्रिश्चानिटी आणली. ब्रिटिश आणि पोर्तुगीज वगळता इतर सर्व आक्रमक भारतात आल्यावर भारताचे होऊन गेले. ब्रिटिश आणि पोर्तुगीज वगळता ते भारताची लूट करून परत आपल्या देशात गेले, असं सुरुवातीची काही आक्रमणं वगळता झालं नाही. इस्लाम भारतामध्ये आला आणि स्थिरावला तो मोगलांमुळे. परंतु एका मर्यादिच्या पलीकडे मोगलांनीही भारत इस्लाममय करून टाकला, असं झालं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे हिंदू हा एक धर्म नसून तो अनेक जातींचा आणि त्यातून निर्माण झालेल्या शीख, जैन, बौद्ध वगैरे धर्मांचा समुच्चय होता.
वसाहतकाळात ब्रिटिशांच्या माध्यमातून भारतीयांना आधुनिक मूल्यांचा परिचय झाला. समाजात वैचारिक, सांस्कृतिक घुसळणीला सुरुवात झाली आणि एका प्रबोधन युगाला सुरुवात झाली. यातूनच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताने धर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम) ही बाब मूल्य म्हणून स्वीकारली. धर्मनिरपेक्षता या मूल्याचं महत्त्व ओळखण्याचं सामर्थ्य असणारे दोन महापुरुष भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या काळात भारताकडे होते. ते म्हणजे पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. सेक्युलॅरिझमचा स्विकार हा स्वाभाविक असण्याचं मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये तयार झालेले बौद्ध, शीख, जैन हे तीन धर्म. याव्यतिरिक्त अल्पसंख्याक मुस्लिम आणि ख्रिश्चन तसंच हिंदू या शीर्षकाखाली येणारे अनेक जातींचे समूह इथे राहत होते. त्यांची राज्यवार असलेली विभागणी, त्यांच्या भाषांची विविधता यांमुळे भारत या राष्ट्राची निर्मिती ही पाकिस्तान किंवा सौदी अरेबियासारखी एक पैगंबर आणि एक धर्मग्रंथ यांना मानणाऱ्या एका राष्ट्रासारखी होऊ शकणार नव्हतीच.
आता इथे थेट मुद्दयावर यायचं झालं तर आज राजकीय हिंदुत्वाच्या नावाखाली जे काय हिंदुत्व, हिंदू धर्म, जय श्रीराम वगैरे चालू आहे त्याचा मानवाच्या आध्यात्मिक प्रगतीशी काहीही संबंध नाही. मुळात ते राजकीय आहे, धार्मिक नाही. आणि या हिंदुत्वाला अभिप्रेत असलेला धर्मही असा आहे की, जो भासमान आहे, वास्तविक नाही. तो असा धर्म आहे, ज्याला ‘ब्राह्मण धर्म’ असं म्हटलेलं आहे. म्हणूनच मग ‘बहुजनांचं काय?’ उपस्थित होतो. इथे आधी ब्राह्मणवाद्यांची चाल लक्षात घ्यायला हवी. त्यांनी आपली राजकीय शक्ती वाढवण्याकरता बहुजनांना भासमान हिंदुत्वाच्या कक्षेत यायला परवानगी दिलेली आहे. आणि बहुजनही हजारो वर्षांचा आपला विषमतेविरुद्धचा लढा विसरून आपण ब्राह्मण झाल्याच्या आनंदात ब्राह्मणवादाच्या वर्चस्ववादाचा म्हणून म्हणजेच हिंदुत्वाचा झेंडा घेऊन पुढे निघालेले आहेत. त्यांना वेदांचा आधार नाही, अधिकार नाही आणि तो कधीच असणार नाही. ‘मनुस्मृती’ने बहुजनांचं स्थान हे शूद्र-अतिशूद्र निश्चित केलेलं आहे. शतकानुशतके हे शूद्र- अतिशूद्र एका शोषण संस्कृतीचे घटक म्हणूनच जगत आलेले आहेत. आज भारतीय संविधानामुळे त्यांना थेट तसं वागवता येत नसल्याने तूर्तास त्यांना हिंदुत्वाचं गाजर दाखवून नंतर त्यांची गावकुसाबाहेर प्रतिष्ठापना करण्याची योजना साकारली जात आहे.
आज जेव्हा आपण ‘ब्राह्मणवाद’ असं म्हणतो तेव्हा जन्माने ब्राह्मण असलेला ब्राह्मणवादी असतो, असा त्याचा अर्थ होत नाही जन्माने बहुजन असलेला बहुजनवादी असेल, असंही नव्हे. तो रेष पुसली गेलेली आहे. ब्राह्मण जातीच श्रेष्ठत्ववर्चस्व मूल्य म्हणून मान्य करणं म्हणजे ब्राह्मणवाद. या ब्राह्मणवाद्यांना त्यांच्या राजकीय लाभाकरता तसेच संविधानाच्याजागी ‘मनुस्मृती’ची पुनर्स्थापना होईपर्यंत बहुजनांचा ब्राह्मणवादासाठी वापर करायचा आहे. हे लक्षात न घेता हिंदुत्वाच्या मागे जाणारे बहुजन हेही ब्राह्मणवादी असतात. त्याचवेळी ब्राह्मणवादाला विरोध करणारा ब्राह्मण हा बहुजनवादी असू शकतो. नरेंद्र दाभोलकरांची हत्या हे याचं उत्तम उदाहरण आहे. तो हत्या म्हणजे ब्राह्मणवाद आणि पुरोहितवादाविरुद्ध लढणाऱ्या एका ब्राह्मणाची हत्या होती.
ब्रिटिश राजवटीमध्ये भारतात अनेक महान समाजसुधारक होऊन गेले. कोल्हापुरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे त्यांतील एक अग्रणी. खुद्द छत्रपतींनाही शूद्र मानून छत्रपती म्हणून असलेला त्यांचा वेदोक्त पद्धतीने म्हणजेच वेदातील मंत्र म्हणून स्नान करण्याचा अधिकार तत्कालीन ब्राह्मणांनी नाकारला होता. राजारामशास्त्री भागवतांसारख्या ब्राह्मणवादी नसलेल्या ब्राह्मणाने है उघडकीला आणेपर्यंत ते ब्राह्मणेतर समाजाच्या आणि खुद्द छत्रपती शाहूंच्याही लक्षात आलं नव्हतं. त्यानंतर वेदोक्त का पुराणोक्त हा वाद महाराष्ट्रात गाजला. दक्षिणेकडे रामस्वामी पेरियरांसारख्या समाजसुधारकाने ब्राह्मणशाहीविरुद्ध बंड पुकारलं आणि एकंदरीतच राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या ब्रिटिश राजवटीत आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात गेल्या सत्तर वर्षांत ब्राम्हणवादाची पूर्ण पिछेहाट झाली. पण याचा अर्थ ब्राह्मणधर्म, ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणशाही संपली असा नव्हता. शोषक जेव्हा दुर्बल असतो तेव्हा तो ताकद गोळा करण्याचं काम करतो, ही ताकद गोळा करताना तो ज्यांचं शोषण करायचं आहे त्यांचं प्रथम साहाय्य घेतो. ते साहाय्य घेऊन शोषणाच्या संस्कृतीची परंपरा पुढे नेता येईल अशी एक राजकीय संस्कृती उभारली की, तो ज्यांचं शोषण करायचं आहे त्यांना त्यांची जागा आणि किंमत परत दाखवून देतो. ब्राह्मणवादाबद्दल नेमकं हेच आता सुरू आहे.
इतिहासामध्येही गौतम बुद्धांच्या उदयानंतर ब्राह्मणवादाची झालेली पिछेहाट आणि नंतर सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे झालेली ब्राह्मणवादाची पिछेहाट पुष्यमित्र शुंगाच्या काळामध्ये भरून काढण्यात आली! शुंग साम्राज्याच्या उदयामध्ये बुद्धांनी निर्माण केलेल्या समतेच्या तत्त्वज्ञानापासून फारकत घेण्यात आली. बुद्धांचे विहार, स्तूप, प्रतीक आणि मूर्ती यांचा मोठ्या प्रमाणावर नाश करण्यात आला. याच काळात ब्राह्मणवादाला हिंदू धर्माचं रूप देण्यात आलं. नंतरच्या काळात शंकराचार्यांनी चार पीठांची स्थापना करून त्याला एक संघटित स्वरूप प्राप्त करून दिलं. यात आधीची उतरंडीची व्यवस्था कायम ठेवून बहुजनांना, शूद्रांना अतिशूद्रांना आणि स्त्रियांना मूलभूत मानवी अधिकार नाकारण्यात आले. त्यांच्या श्रमशक्तीवर ब्राह्मणांचा निर्विवाद अधिकार प्रस्थापित करण्यात आला. ही संस्कृती ‘ब्राह्मण धर्म’ म्हणून प्रस्थापित झाली असती तर तिच्या विस्तार योजनेला खीळ बसली असती म्हणून तिचा ‘हिंदू धर्म असा उल्लेख होऊ लागला.
वास्तवामध्ये मंदिरांमध्ये, मंदिरांच्या गाभान्यामध्ये कित्येक ठिकाणी आजही बहुजनांना, शूद्र-अतिशूद्रांना आणि स्त्रियांना प्रवेशाचा अधिकारच नाही आहे. वेदांच्या अध्ययनाचा अधिकार शूद्र-अतिशूद्रांना व स्त्रियांना एकत्रितपणे नाकारण्यात आलेला होता, त्याला आजही ब्राह्मणवादाची मान्यता नाही. यातला विरोधाभास म्हणजे आज हिंदू अशी मान्यता असलेली अनेक मंदिरं आणि त्यातील मूर्ती या एकेकाळी बौद्ध विहार आणि स्तूप होते. त्यात बुद्धांच्या मूर्ती होत्या, शिल्पं होती. ते पाडून, त्यात बदल करून शुंग साम्राज्याच्या काळामध्ये त्यांचं ब्राह्मण देवतांमध्ये रूपांतर करण्यात आलं.
हिंदू नावाच्या भासमान संकल्पनेची गंमतच हो आहे की, ज्यामध्ये ‘ब्राह्मणदेवता’ असा शब्दप्रयोग आहे, पण बहुजनांमधले कुणबी असोत की, मराठा किंवा भंडारी असोत, त्यांचा उल्लेख भंडारी देवता, कोळी देवता असा कधी केला जात नाही. याचं कारण काय? तर इथे देवता तोच आहे जो सर्वशक्तिमान आहे. ज्याच्याकडे सर्वसत्ता एकवटलेली आहे. भारत नावाच्या देशात राहणान्या समाजाचा हा सर्वांत मोठा सांस्कृतिक विरोधाभास आहे. ‘हिंदुत्व’ असं आपण कोणत्याही अर्थाने म्हटलं तरी त्याचा अर्थ ब्राह्मणवाद’ असाच असतो. अगदी निःसंदिग्ध आणि निःसंशयपणे. या हिंदुत्वाचा जेव्हा राजकीय वापर करायचा असतो तेव्हा बहुजन हे श्रमशक्तीसाठी आणि बाहुबलासाठी प्यादी म्हणून अत्यावश्यक असतात. त्यांचा वापर होतो आहे हे त्यांना कळू नये यासाठी रस्त्यावरच्या लढाईत त्यांना हिंदू म्हणून उतरवलं जातं. मात्र मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यात आणि रोटीबेटी व्यवहारात ते निषिद्ध असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यावर विस्ताराने लिहिलेलं आहे. प्रबोधनकार ठाकरेंनीसुद्धा यावर कठोर प्रहार केलेले आहेत. ब्राह्मणवादामध्ये राजकीय सरमिसळीची शक्यता फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि बनिया इतक्यांपुरतीच मर्यादित आहे. आदिकाळापासून ती होतही आलेली आहे. थोडक्यात ब्राह्मणवादाने विविध जातींचे शोषण करत असतानाही त्यांना ते कळू नये यासाठी हिंदुत्व हे नाव घेतले तसेच या विविध जातींना आपल्या अमलात ठेवण्यासाठी मुसलमान हा एक सामायिक शत्रू निर्माण केला.
वेद हे आधुनिक ज्ञान नव्हे. किंबहुना वेदांमध्ये कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक उन्नतीचे मार्गही सापडत नाहीत. कित्येकदा वेदांमधल्या वस्तुस्थितीचं वाचन केलं तर तत्कालीन जीवनपद्धतीविषयी वाटणारा आदर कदाचित कमी होऊ शकेल. ज्ञान, आध्यात्मिक प्रगती आणि समज ही उपनिषदांमध्ये आहे. अर्थात, चार वेद काय किंवा दहा उपनिषदं काय, ती बहुजनांपासून कायम दूर ठेवण्यात आलेली आहेत. प्राचीन काळात ती संस्कृतमध्ये असल्यामुळे जनभाषेमध्ये तिचा विस्तार होण्याच्या शक्यताच नव्हत्या. अर्थात, जिथे छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त स्नानाची परवानगी नव्हती तिथे सामान्य माणसांचं काय ?
ब्रिटिशांच्या आगमनामुळे ब्राह्मणवादाच्या विस्ताराला खीळ बसली. आधुनिक ज्ञान, विज्ञान आणि प्रबोधन यांचा भारतामध्ये प्रवेश झाला. पेशवाईमध्ये गांजलेल्या बहुजन जाती आणि जमाती यांनी अखेरच्या काळात ब्रिटिशांना साथ दिली आणि पेशवाईचा अंत घडून आला. ब्राह्मणवादाने आपलेच परके करून ठेवलेले होते, त्यामुळे परक्यांचे दास होण्याची वेळ भारतावर आली. ज्या हिंदुत्वाचा गवगवा आपण करतो आहोत त्याचं स्वरूप हे असं आहे. त्यामध्ये आधुनिक फॅसिझमचं आणि प्राचीन ब्राह्मणवादाचं एक विलक्षण मिश्रण आहे. ते आज सर्वशक्तिमान बनून देशातील सर्वसत्तांच्या अग्रस्थानी विराजमान झालं आहे.
पुष्यमित्र शुंग किंवा शुंग साम्राज्य, शंकराचार्य किंवा शंकराचार्यांची पीठं, वेदोक्त किंवा मनुस्मृती ही लेबलं आहेत. ही लेबलं बदलता येतात. किंबहुना या लेबलांना बदलून, वेगवेगळी नावं धारण करून ब्राह्मणवाद पुन्हा पुन्हा उभा राहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे अचूक ओळखलेलं होतं, पेरियारांना त्याचा गाभा कळलेला होता. एवढंच नव्हे तर पं. जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनाही हे कळलेलं होतं. नंतरच्या काळात कांशीराम यांनीही ब्राह्मणवादाचं हे रूप समजून घेतलेलं होतं. ब्राह्मणवादाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे की, त्याच्या मर्मस्थळाला ओळखणाऱ्या महापुरुषांना एक तर ते प्रातःस्मरणीय आणि वंदनीय बनवून देवघरात नेतात किंवा जनतेची बुद्धी भ्रांत करणारी निंदा-नालस्ती आणि भाकडकथा पसरवून त्या महापुरुषांना बदनामीच्या समुद्रात लोटून देतात. यातला एक खोट्या मोठेपणाचा भाग तथागत बुद्ध, डॉ. आंबेडकर आणि सरदार पटेलांच्या वाट्याला आला आणि तर निंदा-नालस्तीचा दुसरा भाग गांधी आणि पं. नेहरूंच्या वाट्याला आला. या मानसिकतेमागचं मुख्य कारण म्हणजे ब्राह्मणवादाला साध्य साधनशुचिता नाही.
डावपेचाचा एक भाग म्हणून त्यांच्यासाठी भगवान बुद्ध हे विष्णुचे नववे अवतार असू शकतात परंतु विष्णुला मानणाऱ्या कोणाच्याही देवघरात भगवान बुद्ध कधी पुजले जात नाहीत किंवा त्यांच्या नावाने कोणतीही आरती रचली जात नाही. हा विरोधाभास का आहे? तर इथे बुद्धांचा विलय करणं हा खरा उद्देश आहे. त्यासाठी आधी भले त्यांना देवत्व द्यावं लागलं तरी चालेल. कारण बुद्धांची निंदा करून त्यांचा विलय करता येणार नाही, इतके ते जगभर वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांचा विलय करण्याकरता ब्राह्मणवाद त्यांना देवत्व बहाल केलेलं आहे. जे बुद्धांच्या बाबतीत तेच स्त्रीच्या बाबतीत. ब्राह्मणवादाच्या भासमान जगामध्ये स्त्री ही एक देवी आहे आणि वास्तविक जगामध्ये भोगवस्तू आहे. तिला कोणतेही अधिकार नाहीत. पुरुषसत्ताक शोषणसंस्कृतीमध्ये तिने घर आणि मुलं सांभाळावी आणि मानवी हक्कांमध्ये समानतेची मागणी करू नये अशी अपेक्षा आहे. राजा राममोहन रॉय, लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि ब्रिटिश सत्ता भारतात नसती तर कदाचित आजही हिंदू स्त्री सती जात राहिली असती. पतीच्या मृत्यूनंतर बालविधवा केशवपन करून लाल आलवणाखाली आल्या असत्या. म्हणूनच हा ब्राह्मणधर्म वास्तवात काय आहे हे बहुजनांनी समजून घेणं आवश्यक आहे.
जगभर सर्व धर्मामध्ये धर्मांच्या संघटना या दोन तत्त्वांवर चालतात. एक आभासी, भासमान तत्त्व आणि दुसरं वास्तव तत्त्व. भासमान जगात मोक्ष, मुक्ती, विकास, दयाळूपणा, क्षमा आणि शांती असते. आणि वास्तविक जगात शोषण, दास्य, क्रौर्य, भोग आणि विलासिता असते. तथाकथित धर्माच्या संघटनेला वाहून घेतलेली माणसं बहुतांश वेळा किडलेल्या मनोवृत्तीची बनत जातात, त्याचं कारण ही ढोंगाची संस्कृतीच असते.
भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशामध्ये मनुष्य आपला धर्म आपल्या घराच्या चार भिंतीतच मानेल, हे संविधानाला, घटनाकारांना आणि राष्ट्रनिर्मात्यांना अपेक्षित होतं. आज दुर्दैवाने ती संस्कृती नष्ट होऊन परत आपण शुंग साम्राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. या शुंग साम्राज्याच्या पुष्यमित्र शुंगालाच वि. दा. सावरकर यांनी आपल्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथामध्ये पहिलं सोनेरी पान म्हणून मान दिलेला आहे. या सहा सोनेरी पानांमध्ये राघोबादादा पेशव्याला जे स्थान आहे तेही स्थान छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यात आलेलं नाही. किंबहुना परधर्मीय स्त्रियांना युद्धामध्ये अटक झाल्यावर सोडून देणं ही छत्रपती शिवाजी महाराज आणि चिमाजी अप्पा यांची सद्गुणविकृती आहे, असं प्रतिपादनही त्यात करण्यात आलेलं आहे. याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय हे एक सोनेरी पान न मानता, “तो एक काकतालिय योग होता” असं प्रतिपादन सावरकरांनी केलेलं आहे.
‘काकतालिय योग’ म्हणजे एखादा कावळा फांदीवर बसतो आणि फांदी तुटते, त्यात फांदी तुटायला आलेलीच असल्याने कावळ्याचं त्यात काही योगदान नसतं, कावळ्याचं बसणं आणि फांदी तुटणं हा एक संयोग जुळून येतो त्याला ‘काकतालिय योग’ असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाचा उल्लेख सावरकरांनी काकतालिय योग म्हणून केला आहे. याचं मूळ कारण सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीत आहे आणि हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद हेच खरं. म्हणूनच सावरकरांसाठी राघोबादादा पेशवे आणि पुष्यमित्र शुंग यांचं जे महत्त्व आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाही कारण सावरकरांच्या दृष्टीने ते कुणबी आहेत, बहुजन आहेत. भारताच्याच इतिहासात नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये महानायक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना हे जे ‘काककालीय स्थान हिंदुत्वाने दिलं आहे, ते हिंदुत्वाचे सर्वात मोठे राजकीय भाष्यकार असलेल्या विनायक दामोदर सावरकरांचं प्रतिपादन आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवं. ब्राह्मणांचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे, याचं याहून वेगळं उदाहरण देण्याची आवश्यकता नाही.
मग त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली की तो महापुरुष महाअवतारात जमा होतो! देवघरात नाहीतर सार्वजनिक मखरात पूजेला लावलेला प्रात:स्मरणीय अवतार!
त्या कुळवाडीभूषण व कुणब्यांचा उद्धारकर्ता असलेल्या महान छत्रपतींची जागा मग थोरला बाजीराव किंवा रघुनाथराव यांजसाठी मोकळी होते. असा तो कावा आहे.
फॅसिझम ही एक आधुनिक संकल्पना आहे. १९३० आणि १९४० च्या दशकामध्ये प्रथम इटलीमध्ये फॅसिझमचा उदय झाला आणि मग जर्मनीमध्ये नाझीझमचा उदय झाला. मुसोलिनी आणि हिटलर हे अनुक्रमे त्याचे नायक होते. त्या नायकांचं कौतुक भारतामधल्या ज्या संघटनांनी केलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे तत्कालीन सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांचा मुख्य समावेश आहे. फॅसिझमचं असं कौतुक त्यांनी करावं याच्यामागे काही कारणं आहेत. ब्राह्मणवादाच्या हजारो वर्षांच्या इतिहासातल्या ज्या अनेक परंपरा आहेत त्यातल्या काही साम्यस्थळांच्या खुणा फॅसिझम आणि नाझीझममध्ये गोळवलकर गुरुजींना दिसल्या. अर्थात, त्या आपल्यालाही दिसू शकतात पण आपल्याला त्याचं कौतुक वाटणं शक्य नाही. म्हणजे एक विशिष्ट धर्म आपला शत्रू आहे, हे समाजाला वारंवार सांगून समाजाला सतत युद्धप्रवण ठेवणं, स्त्रियांना दुय्यम लेखणं,
वास्तविक संस्कृतीपेक्षा भासमान संस्कृतीवर प्रेम करायला शिकवणं ही काही साम्यस्थळं आहेत. त्याचवेळी लष्करी गणवेश, सैन्याचं अती उदात्तीकरण, प्रचारयंत्रणेद्वारे जनमानसात विरोधकांची शत्रू अशी प्रतिमा निर्माण करणं, त्यासाठी जनतेचं ब्रेनवॉश करणं या फॅसिझम आणि नाझीझमच्या वैशिष्ट्यांचं ब्राह्मणवादाला आकर्षण वाटलं. ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकामध्ये गोळवलकर यांनी हिंदू वर्णव्यवस्थेचं कौतुक केलेलं आहे. समकालीन जगातील आधुनिक समतावादी मूल्यांना अनुसरून त्यांनी त्याचा निषेध नक्कीच केलेला नाही. एकीकडे सावरकरांसारखा हिंदुत्व नावाच्या भासमान संकल्पनेखाली राजकीय शक्ती गोळा करू पाहणारा लेखक-विचारवंत आणि दुसरीकडे माधवरावांसारखा कृतिशील राजकीय-सांस्कृतिक नेता यांच्या भासमान जगामध्ये एका अखंड हिंदू साम्राज्याचा उदय ही संकल्पना साकारली गेलेली आहे. या संकल्पनेचा वास्तविक समकालीन जगाशी, समकालीन भारताशी, भारताच्या वास्तवाशी काडीचाही संबंध नाही.
किंबहुना त्यांनी लिहिल्याप्रमाणे प्रयोग करायला गेल्यास भारत अखंड होण्याऐवजी शतखंड होण्याची शक्यताच जास्त आहे. भारत हा ब्रिटिश येण्याअगोदर एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हता. भारताचं अस्तित्व अकबराच्या काळामध्ये औरंगजेबाच्या काळामध्ये आणि मराठा साम्राज्याच्या काळामध्ये एका प्रचंड मोठ्या भूभागावर पसरलेलं दिसतं. पण ते पसरणं फक्त प्रशासकीय आणि लष्करी आहे. त्यात एका देशाची संकल्पना साकारली गेली नव्हती. मोगल काळात मुख्यतः अकबराच्या आणि औरंगजेबाच्या काळात तसंच मराठा साम्राज्याच्या काळात एक मोठा प्रदेश एका प्रशासनाच्या अमलाखाली होता पण त्यात शेकडो संस्थानं होती, जी स्वतःला एका देशाचा भाग मानत नसत. म्हणूनच “मै मेरी झाँशी नही दूँगी” असं राणी लक्ष्मीबाई म्हणते. नानासाहेब पेशवे पुण्याचे अधिपती असतात. हे सारे संस्थानिक मोगल बादशाह बहादुरशहा जफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७चं ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धचं युद्ध लढतात. ही लढाई भारताच्या स्वातंत्र्यासाठी नसून आपापल्या संस्थानांच्या स्वायत्ततेसाठी होती.
स्वातंत्र्योत्तर काळात सेक्युलॅरिझम आणि संविधानामधील चार प्रमुख तत्त्वं म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व, यांवर आपलं संघराज्य आणि संविधान उभं राहिलेलं आहे. आणि या चारही गोष्टी ब्राह्मणवादाच्या विरोधात आहेत. घटनाकारांना याची कल्पना होती. महत्त्वाचं म्हणजे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या बरोबरच्या विशाल जनसमुदायाला सोबत घेऊन त्यांच्या अतिशूद्र असण्याच्या विरोधात लढा देतच होते. तो लढा थेट ब्राह्मणवादाविरुद्धच होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या लढ्याच्या एका टप्प्यावर “मी जन्माने हिंदू असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही” असं जाहीर केलं. याचं मुख्य कारण हेच होतं की, हिंदू म्हणून रचित झालेल्या ब्राह्मणवादाची व्याप्ती मानवतावादाला स्पर्श करू शकत नव्हती. त्यामुळे तो साधा ऐहिकवादी धर्मही ठरू शकत नव्हता, आध्यात्मिक तर नव्हताच नव्हता. अतिशूद्र हे कायम अतिशूद्र होते, ते कधी हिंदू नव्हतेच. तथाकथित हिंदूंनी (ब्राह्मणवाद्यांनी) त्यांना कधी आपलं मानलंच नाही. याचा डंख डॉ. आंबेडकरांना विसरता येणं शक्य नव्हतं. इथे विषय थोडासा बदलून एक वेगळं उदाहरण देऊ शकतो.
आधुनिक हिंदू म्हणून ज्या स्वामी विवेकानंदांचा आज गौरव केला जातो, त्या स्वामी विवेकानंदांना शिकागोतल्या सर्वधर्म संमेलनासाठी कोणत्याही ब्राह्मणपीठाने किंवा हिंदू धर्म म्हणवणाऱ्या पीठाने पाठवलं नाही, त्यांची शिफारस केली नाही कारण स्वामी विवेकानंद हे कायस्थ होते. ब्राह्मणवाद कायस्थांना बहुजनांमध्येच गणत असे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांची शिकागोमध्ये पोहोचेपर्यंत अक्षरशः परवड झाली. एवढेच नव्हे तर त्यांचे शिकागोचे प्रसिद्ध भाषण जगप्रसिद्ध झाल्यावरही त्यांची बदनामी करण्याकरता भारतातील हिंदू पीठांनी पत्रकं काढली. याबाबतचा उल्लेख विवेकानंदांनी अमेरिकेहून पाठवलेल्या पत्रांमध्ये आढळतो. या संदर्भात एक स्वतंत्र पुस्तक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी लिहिलं आहे. हा विषय समजण्याकरता इथे इतकं पुरेसं आहे.
ब्राह्मणवाद, ज्याला राजकीय अर्थाने हिंदुत्व म्हटलं जातं ते, कोणत्याही तऱ्हेने भारताला संघराज्य म्हणून एकत्र ठेवून वैज्ञानिक पद्धतीने पुढे नेऊ शकणार नाही, याची पूर्ण कल्पना घटनाकारांना आणि देशाचे पहिले पंतप्रधान असलेल्या पं. नेहरूंना होती. त्यामुळे आपल्या राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे त्यातच स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टी मुळामध्येच ब्राह्मणवादाचा, हिंदुत्वाचा पाया उखडणाऱ्या आहेत. कारण इथली बहुजनांची हिंदू संस्कृती किंवा एका सैल अशा अर्थाने ‘हिंदू वृत्ती’ असं जर आपण म्हटलं तर ती वैविध्यपूर्ण आहे. अनेक जातींमध्ये आणि अनेक छोट्या धर्मामध्येसुद्धा ती समाविष्ट आहे. मग जैन असो, लिंगायत असो, शीख असो, बौद्ध असो हेसुद्धा काहीप्रमाणात या हिंदू वृत्तीचा भाग आहेत. त्यामुळे या वैविध्याला नाकारणं हे ब्राह्मणवादाचं मूळ उद्दिष्ट आहे आणि ते देश मोडणारं आहे; याचबरोबर ते बहुजनांना पुन्हा शोषणाच्या खाईत ढकलणारं आहे. वैदिक संस्कृती कधीच समतेवर आधारलेली नव्हती, ना मानवतेवर आधारलेली होती. मानवतेवर आणि समतेवर आधारलेली संस्कृती उभी करण्याकरता स्वातंत्र्योत्तर काळात वैज्ञानिक दृष्टिकोनातून परिश्रम करण्यात आले. त्यामुळे विंध्य पर्वताच्या वर आणि विंध्य पर्वताच्या खाली म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये एवढा फरक असूनही संघराज्य म्हणून, एक देश म्हणून भारत आत्तापर्यंत उभा राहिलेला आहे. त्यामुळेच बहुजनांचा विकास होऊ शकला, शूद्रांना अतिशूद्रांना, स्त्रियांना ज्ञान मिळू शकलं, न्याय मिळू शकला. आधुनिकता त्यांच्यापर्यंत पोहोचली.
वैदिक हिंदुत्व हे भासमान आहे. राजकीय हिंदुत्व हेसुद्धा भासमान आहे. त्यातला ब्राह्मणवाद आता खुद्द ब्राह्मणांच्या हिताचासुद्धा उरलेला नाही. एक राजकीय शक्ती म्हणून भारताच्या उदयाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली असल्या भासमान भ्रांत कल्पनेच्या मागे धावणाऱ्या बहुजनांच्या झुंडी स्वतःच्या आणि पर्यायाने उभारलेल्या भारतीय शक्तीचा विनाश करू शकतील इतक्या ताकदवान होताना दिसत आहेत. वेदांनी या समाजाला समतेचं मूल्य दिलं नाही. एक केलं नाही. सातत्याने दंश करून हा देश अखंड होण्यापासून वंचित ठेवला. त्यामुळेच इथल्या बहुजनांना परकीय आक्रमणाबद्दल कधी रागच आला नाही. कारण त्यांना कोणाची ना कोणाची तरी गुलामीच करायची होती. एकतर ब्रह्मणवादाची किंवा परकीय आक्रमकांची. आत्ता कुठे गेली सत्तर वर्ष एक समाज म्हणून स्त्रिया, शूद्र- अतिशूद्र, ब्राह्मण या सर्वांना हा देश आपला आहे, असं वाटतं. दुसऱ्या देशासमोर त्याची मान झुकू नये असं वाटतं. हे स्वातंत्र्य आणि हे भान आपल्याला संविधानाने दिलेलं आहे, वेदांनी नाही.
चातुर्वर्ण्यप्रणीत विषमतेने जो आपल्याला दंश केलेला होता त्याचं विष आत्ता कुठे उतरत होतं तर ते परत चढवण्याचं काम जे लोक, जे पक्ष, जी माणसं करत आहेत ते कुठच्याही इतर देशविरोधी शक्तीइतकेच देशविरोधी आहेत, असं म्हणायला पाहिजे. बहुजनांच्या संस्कृतीला कमी लेखल्यामुळे भारत हा जगाच्या स्पर्धेमध्ये कायमच मागे पडत राहिला. ब्राह्मणवाद कायम बहुजनांमधील कलाकार, कुशल कारागीर, असाधारण बुद्धिवान माणसं चिरडून टाकत आला. त्यांच्या हाका जर आजही आपण ऐकू शकलो नाही आणि भासमान हिंदुत्वाच्या मागे धावत सुटलो तर आपल्या अस्तित्वाला एका प्रलंबित आत्महत्येचं स्वरूप येईल, इतकाच इशारा देणं मी इथे इष्ट समजतो. साक्षात पेशव्यांना न्यायला जे आलं नाही ते पुष्पक विमान विद्रोही महाकवी तुकारामांना न्यायला आलं, यातला नेमका अर्थ समजून घ्यायला हवा. तसंच निःशस्त्र, अहिंसेचा पुजारी असलेल्या आणि कोणत्याही संरक्षणाविना वावरणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची अत्यंत थंड रक्ताने हत्या करण्यात आली, यातला अर्थही समजून घ्यायला हवा. या अशा हिंसक संस्कृतीचा उदय होत असताना त्याचा पाईक होण्याची पात्रता ज्यांच्या अंगी आलेली आहे अशांना देशद्रोही मानणं आणि त्यावर उपाय करणं, हा नव्या अंधारापासून दूर राहण्याचा एक मार्ग आहे.
मात्र सध्या चाचपडत असताना हा मार्ग आपल्याला सापडेलच याची खात्री देता येत नाही. जेव्हा जेव्हा ब्राह्मणवाद प्रबळ होतो तेव्हा तेव्हा इथली लोकशाही मरते, सामान्यांचे अधिकार हिरावून घेतले जातात. आणि जेव्हा बहुजनवाद प्रबळ होतो तेव्हा सामान्य माणसाला, अगदी सामान्यातल्या शेवटच्या माणसाला आपले हक्क आणि आपला स्वतंत्र आवाज प्राप्त होतो, लोकशाही प्रबळ होते, हा इथला इतिहास आहे. तेव्हा कशाला बळ द्यायचं, याचा निर्णय इथल्या बहुजनांनी घ्यायचा आहे.
राजू परुळेकर
0 टिप्पण्या