माणसाला धर्माची आवश्यकता आहे हे महात्मा फुलेंना मान्य होते तसेच ते महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनाही मान्य होते। आदिवासींची संस्कृती ही वेगळी आहे, आदिवासी धर्म हाच त्यांचा धर्म। आदिवासी चातुर्वर्ण्य मध्ये बसतो का ? तर नाही, तो चातुर्वर्ण्य चौकटीच्या बाहेर आहे। त्यांचे वेगळेपण आहे, त्यांची स्वतःची संस्कृती आहे। म्हणून आदिवासींचा कायदा झाला पाहिजे, पण अजूनही आदिवासींचा कायदा नाही।
माणसाला धर्माची आवश्यकता असतांना आरएसएस आणि भाजप सरकारला मात्र या देशालाच धर्माची आवश्यकता आहे असे धोरण राबवित आहे। राज्यघटनेनुसार या देशाला कोणताही धर्म नसून आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, सारे धर्मीय लोक देशात गुण्यागोविंदाने नांदणे हेच सरकारचे ध्येय असले पाहिजे, पण केंद्र सरकार व त्यांच्या पक्षाची व त्यांच्या पक्षाच्या राज्यसरकारांची वाटचाल मात्र तशी दिसत नाही। उलटपक्षी आरएसएस ही संघटना आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी प्रयत्नशील असून तसे घडवून आणीत आहे। आदिवासींना हे कोणत्या वर्णात/ जातीत टाकणार आहेत ? (आदिवासींना आरएसएस वाले वनवासी म्हणून संबोधित आहेत, ते खऱ्या अर्थाने आदिवासीच आहेत।)
आदिवासींचा नेता बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारला सहन झाला नाही। ब्रिटिशांनी त्यास खूप त्रास दिला, त्यास सैरावैरा करून सोडले होते कारण तो आदिवासींची बाजू घेऊन, त्यांच्या हक्कासाठी इंग्रज सरकारशी लढा देत होता। आदिवासींना काबूत ठेवण्यासाठी अखेर इंग्रजांना जंगलचा कायदा (Forest Law) करावा लागला। ब्रिटिश गेले पण भारत स्वतंत्र होऊनही ब्रिटिशांच्या कायद्याचा कालखंड संपला का ? पर्यावरण (Environment) खाली ज्या योजना केल्यात व आजही सरकार ज्या योजना राबविते त्या सर्व योजना डोंगरी भागात लावतात। खरे म्हणजे जंगल (फॉरेस्ट) हे आदिवासी भागातच का म्हणून राखीव करायचे ? प्रत्येक गावातील एकूण शिवारातील जमिनीच्या 15 % जमीन ही फॉरेस्ट साठी राखीव झाली पाहिजे। विषेश उपाययोजना करून ह्या राखीव केलेल्या फॉरेस्ट मध्ये वन्य प्राण्यांचे रक्षण करता येते, अशी अनेक उदाहरणे आहेत। मुंबईमध्ये सुद्धा वन्य प्राणी आहेत तेथे मुंबईकरांना त्यापासून काही धोका नाही। म्हणून आदिवासी राहत असलेले जे फॉरेस्ट आहे त्यावर आदिवासींचाच काही प्रमाणात हक्क असला पाहिजे।
सरकारचे धोरण मात्र उरफाटेच दिसून आलेले आहे। व्याघ्र व इतर झोनच्या नावाखाली आदिवासींना अनुसूचित क्षेत्रामधून हकलण्यात आले व हकलण्यात येत आहे। ते trible zone असावे व तेथे आदिवासींचे राज्य असावे या ऐवजी तेथील जंगल खाली करून आदिवासींना विस्थापित केले जात आहे। कारण सरकारला जंगलातील लाकूड व लोखंड, तांबे, सोने, कोळसा ही खनिजे हवी आहेत। गडचिरोलीतील सुराजगड मध्ये जवळपास 28 % लोखंड असून जगातील ती सर्वात मोठी लोखंडाची खाण आहे। अशी अनेक झोन कमी अधिक प्रमाणात आहेत। 1980 पर्यंत ही क्षेत्रे शाबूत ठेवल्या गेली होती, जेणेकरून देशाला अडचणीच्या (निकडीच्या) वेळी ती कामी येतील, पंडित नेहरूंच्या काळातही ती दक्षता घेतली होती। पण गेल्या काही वर्षांपासून मात्र चित्र बदललेले आहे।
आदिवासी समाज आधी त्यांच्या भागात सामूहिक शेती करीत होता। दरवर्षी जमिनीचे तुकडे करून आदिवासी कुटुंबे त्यांच्या हिस्यावर आलेल्या शेत जमिनीच्या तुकड्यावर शेती करीत होते। परत पुढीलवर्षी नव्याने जमिनींच्या तुकड्याचे वाटप करण्यात येत होते त्यामुळे नेहमी एकच तुकडा दरवर्षी कोणत्याही एका कुटुंबाच्या हिस्यावर येत नव्हता, म्हणजे कायमचा राहत नव्हता। एकाच कुटुंबाची जमिनीच्या विशिष्ट तुकड्यावर त्याची मालकी राहत नसल्याने त्या कुटुंबाची त्या शेतीवर नोंद होत नव्हती, त्याचा 7/12 व 8 अ चे रेकॉर्ड होत नव्हते। कालांतराने आता कायम एकच तुकडा प्रत्येक कुटुंब शेतजमीन कसित असल्याने मागचे रेकॉर्ड मिळत नसल्याने कुटुंबाच्या नावावर जमीन देण्याकरिता अडचण येत आहे असे सरकारचे म्हणणे आहे। खरे तर मागील चालत आलेली प्रथा ग्राह्य धरून आता कसणाऱ्या कुटुंबास जमीन त्यांच्या नावाने करून देणे आवश्यक आहे।
सर्वोच्च न्यायालयाच्या 2005 च्या निर्देशानुसार, राज्यघटना (संविधान) परिच्छेद 244 नुसार तरतूद असल्याने, आदिवासींचे स्वायत्त मंडळ स्थापन केले होते। आदिवासींच्या भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीचा हा उद्धेश होता। सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वेगळे व आदिवासींचे प्रश्न वेगळे असतात त्यासाठी हे पाऊल उचलले होते। पण आतापर्यंत तरी आदिवासींचे प्रश्न मार्गी लागले का ? या परिच्छेदाच्या अनुषंगाने राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित "जनजाती सल्लागार परिषद" स्थापण्यासाठी सुद्धा सविस्तरपणे निर्देश दिलेले आहेत।
आदिवासींची संस्कृती जपणे, त्यांना शेतजमिनीचे पट्टे कायम स्वरूपी मिळणे या अत्यंत महत्वाच्या प्रश्नासोबतच आदिवासींचे जे जीवनावश्यक प्रश्न आहेत ते म्हणजे:- रेशन कार्ड, जातीच्या दाखल्यासोबत इतर दाखले, स्थानिक जागेवर लहान उद्योग उभी करण्याची संधी-सुविधा, शिक्षणाची चांगली व्यवस्था, घरकुलाची योजना प्रभावीपणे राबविणे इत्यादी प्रश्न आहेत, ते सुटण्यास खूप अडचणी येत आहेत तसेच त्या सोडविण्यास दुर्लक्ष होत आहे। त्यासाठी (हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी) 1970 मध्ये शासनाने समिती गठीत करून निर्णय घेतला होता की, ठिकठिकाणी समिती सदस्य व शासकीय अधिकारी यांनी जाऊन कॅम्प घ्यावे व या प्रश्नांची युद्ध पातळीवर सोडवणूक करावी, पण तसे अजूनही झाले नाही। सरकार आपल्या बजेटमध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांची आदिवासी समाजासाठी तरतूद करीत असते, असे असूनही आदिवासींच्या जीवनात काही फरक पडलेला दिसत नाही; त्यांची अजूनही प्रगती नाही। खरे तर आदिवासींनी आपले स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजाचे स्वतंत्र संघटन उभे करणे आवश्यक आहे।
वरील सर्व मुद्यासहित अनेक मुद्यावर एड बाळासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी मेळाव्यात आपले विचार मांडले। बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या *आलेवाडी* या गावाशेजारील शेतात "वंचित बहुजन आघाडी"च्या वतीने भव्य आदिवासी मेळावा दिनांक 15 मार्च रोजी संपन्न झाला, त्या मेळाव्यात बाळासाहेब उपाख्य एड प्रकाश आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शन करतांना आदिवासींच्या बहुतांश प्रश्नांना हात घातला होता व त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आदिवासींच्या पाठीशी राहण्याचा विश्वास दिला होता। या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित होता। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हुसेनभाऊ सुरत्ने होते. वंचित बहुजन आघाडीचे अशोकभाऊ सोनोने, शरदभाऊ वसतकर, प्रदीप वानखडे, धैर्यवर्धन पुंडकर, राजकुमार सोनेकर, प्रशांत वाघोदे, रामकृष्ण रजाने, गणेशभाऊ चोकसे, विशाखाताई सावंग, देविदास दामोदर, प्रवीण पाटील यांच्यासह पक्षाचे जिल्हा, जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर शाखांचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते।
वृत्तांकन - भीमराव तायडे 9420452123
=========================
- टीप:- भाषणाचे लेखी टिपण करतांना घाईने लिहावे लागते, त्यावरून काही वाक्ये सुटतात म्हणून कदाचित संदर्भही बदलू शकतात। त्याची दक्षता जास्तीत जास्त घेऊन टिपण केले असले तरी वृत्तांकनात काही विरोधाभास किंवा त्रुटी आढळल्यास ती चूक माझी आहे, अशी कबुली देतो, त्यास सर्वस्वी मीच जबाबदार आहे। अनेक चॅनेलचे समाज माध्यमावर वरील भाषणाचे तुटक-तुटक अनेक व्हिडीओ आलेले आहेत, त्याचे सुद्धा अवलोकन करावे। = भीमराव तायडे
0 टिप्पण्या