Top Post Ad

श्री सदस्यांच्या बैठकीची पोलखोल


 जय सद्गुरू
 निमित्त इथं फेसबुकवर सुरू असलेली धर्माधिकारी फॅमिली अन शिंदे गुरुशिष्य भक्त गोंधळ आहे. वाटलं स्वानुभव रेखाटावा. 

जय सद्गुरू,जय जय रघुवीर समर्थ,सद्गुरू कृपा हे शब्द मला अति परिचयाचे आहेत.12 वीची परीक्षा झाली अन ओळखीच्या व्यक्तीकडून बैठक समजली. भित्र्या मनाची मी कुटूंबासोबत बैठका करू लागले. आठवड्यातून 1 दिवस अडीच तास देऊ लागले. हळूहळू वाचायला बसावे वाटले. पण शिक्षकी पेशात असल्याने निरुपणाला बसण्याची आज्ञा झाली. म्हणजेच मला वाचायची किंवा निरूपण करायची इच्छा आहे असे लेखी रेवादांड्याला द्यावे लागते, ते हो म्हटले की झालो आपण अधिकारी. ह्याने म्हणे घराण्याची पुण्याई वाढते. मागच्या जन्माचे पाप धुतले जाते. काही आयुष्यात चांगल घडलं की सद्गुरुकृपा अन वाईट घडलं तर पूर्व जन्म पाप.

       ह्यात नाव देऊन मी तब्बल 8 वर्ष निरूपण करायचे. तेव्हा तर 1 स्त्रियांची बैठक, शिवाय रात्री 2 वेळ पुरुषांची बैठक ऐकायला जायचे. त्यातून संपूर्ण रविवार निरुपणाला जायचे. लोक अधिकारी म्हणून संबोधायचे. बऱ्याचदा छोट्या भावाला चांगले संस्कार व्हावे म्हणून म्हणून बालभक्तीला झोपेतून उठवून जबरदस्ती नेलाय.तिथं गेल की हजेरी लावा. उशिरा गेलं की लेट मार्क, 4 बैठका गेल्या की हजेरीवरून नाव कमी होणार असले नियम असायचे. रजिस्टर असलेली नाव जेव्हा श्रीसदस्य ते धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रवास झाला तेव्हा मात्र सगळं खटकू लागलं. वर्षातून 4 स्पेशल बैठका ऐकायला वाडीत म्हणजे रेवदंड्यात जायचो तेव्हा वैभव पाहून अनेकदा मनात यायचं हे ह्यांच्याकडेच का? आपल्याला ह्या जन्मात तरी अशी संधी यावी. 
पण बैठकीत एकच सुरू, ठेविले अनंते तैसेंच रहावे,चित्ती असू द्यावे समाधान.

       आपण सद्गुरू आदेश ह्या नावाखाली भित्रे बनत मानसिक गुलाम होतोय हे शेवटी 2013 ला प्रकर्षाने जाणवू लागले. अटी नियम पटत नव्हते. मनाविरुद्ध वागावे लागायचे. आपण कधी मोकळेपणे जगणं अनुभवू का असं वाटू लागलं.कधी हा सत्कार, कधी सकाळी उठून कलियुगातील सत्यदत्तव्रतपूजा अन कधी एकमुखी दत्त अधिष्ठान स्थापना... ह्या करत दिवसभर बोकळत फिरलोय. ह्या गोंधळात समाज म्हणून नातेवाईक, पै पाहुणे ह्यांच्यात यायला जायला वेळच मिळाला नाही. अंतरात्मा, मन, शरीर,पंचमहाभूत, उपासना,श्रवण  ह्यावर सद्गुरू आदेश हे सगळं ऐकून डोक्याचा पार भुगा झाला होता. घराच्या झाडांच्या कुंड्याची कधी देररेख न करणारी मी वृक्षारोपण करायला जाऊ लागले. आरोग्याची काळजी न घेणारी आरोग्य शिबिरात हजेरी लावली. ह्यांनी मात्र पेट्रोल पंप, वाड्या, गाड्या,बंगले उभारले.

      सद्गुरुंच्या घरी काही कार्यक्रम असल्यास बैठकीत नाव घेतली जात अन आपण आपली वेळ त्यांच्या खाजगी समारंभात द्यावी लागे. कधी स्वयपाकाला मदत तर कधी शेतात काम करायला फुकटचे मजूर म्हणून. त्यातही त्यांच्या घरात प्रत्यक्ष कामाला असणारा वर्ग बहुतेक उच्च वर्गीय अन बाकी कामाला मात्र बहुजन वर्ग. जाती भेद पलीकडे माणूस म्हणून सर्व धर्माला तिथे टिकाव होता. लोक स्वतःचे कुळाचार, संस्कार सोडून फक्त भक्त होवुन दोन वेळा उपासना, बैठक श्रवण करून मनुष्य म्हणून प्रवास करू पाहत होते.

    आदर्श कुटूंबव्यवस्था असावी म्हणून प्रसंगी व्यसनी नवऱ्याला पती परमेश्वर मानणे. आंतरजातीय विवाह केल्यास बैठकीत शरम वाटते म्हणून बैठकीला उपस्थित राहण्यास निर्बंध घालून त्या घराला वाळीत टाकणे, असे प्रकार स्वतः पाहिले आहेत. संस्कारवर्ग म्हणून बालभक्ती चालवताना बालकाला समजू लागल्यापासून अश्या प्रकारे देवभोळे बनवून निव्वळ हिंदू सण समारंभ कुटूंबात कसे साजरी करायचे ह्याचे मार्गदर्शन निरुपणात व्हायचे. पहाटे झोपमोड करून अधिष्ठानला तुळशीपत्र लावतो तो अधिक पुण्यवान असे म्हणून कित्येक जणांना ह्या शेड्युल मुळे हार्ट व बीपी संबंधी आजार जडलेत. बैठकीत जाता येता किंवा गादीवर बसताना कुणाला हार्ट अटॅक आला की, पुण्यवान ज्याला सद्गुरुचरणी वीरमरण आले म्हटले जात. 

पण त्या व्यक्तीच्या कुटूंबियांनी मात्र हा नैसर्गिक आघात समजून मोक्ष प्राप्त झाला म्हणून सुटकेचा निश्वास सोडायचा.गादीवर बसणें म्हणजे मनाचे श्लोक वाचायला बसणे, दासबोध ओव्या वाचणे. अन निरूपण म्हणजे त्या ओवीवर थोडक्यात वाद्याशिवाय केलेलं कीर्तन. अश्या कीर्तनात संतांच्या वेगवेगळ्या दाखल्यांचा वापर करत श्रोते म्हणजे ऐकायला येणाऱ्यांना खिळवून ठेवणे. हे करण्यात काही हुशार व्यक्ती हेरली अन त्यांना भारी निरूपण करतो म्हटलं की शेट खुश. स्वारी उत्तम गाऊन घेते हा वाक्यप्रयोग केला जायचा म्हणजे नऊ महिने आईने पोटात बाळाला वाढवायचं, कष्ट करून जन्म द्यायचा अन पोराला बापाच नाव दिल्यासारखे वाटायचं. 

नवरा लायकीचा नसताना केवळ संसार टिकवण्यासाठी सद्गुरू आज्ञा पाळणाऱ्या बाया मी पाहिल्यात. ऐन तारुण्यात संसाराचा त्याग केलेली लोक पाहिलेत. नोकरी, व्यवसाय, नातलग ह्यांना गुंडाळून ठेवून केवळ जय सद्गुरू करणारी जमात पाहिलीय. बैठक झाल्यावर बाई दुपारच्या वेळी स्वयंपाक अन पोरं वाऱ्यावर सोडून बैठकीच्या सतरंज्या टाकणारी लोक पहिली. ही कामे म्हणजे पुण्य मिळवण्याचा मार्ग! असले विचार पेरले जाऊन पिढ्यानपिढ्या ह्यांच्या गुलाम झाल्यात.

   बाबासाहेबांच्या जातीत जन्म घेऊन केवळ त्यांच्या कार्याची माहिती नसल्याने कधी घरच्यांनी कुळ देवता, कधी जन्मपत्रिका, कधी त्रंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळी, कधी नवस, कधी गंडादोरा तर प्रसंगी ऐन उमेदीच्या काळात बैठकीला बसवून आयुष्यातील बहुमूल्य वेळ वाया घालवला आहे.कुटूंबीय कमी शिकलेले चालतील; पण बुद्धाचा धम्म व बाबासाहेबांचा संघर्ष दाखवणारा हवा म्हणजे आपण स्वतंत्र मताची व्यक्ती म्हणून घडू. लोक म्हणतात करून करून भागले अन देवपूजेला लागले. मी म्हणते जाऊ नये तेथे जावे पण विवेकासहित. हा विवेक जागरूक करण्याचे काम बार्टीच्या युथ लीडरशिप प्रोग्रॅमने केले. तिथं गेल्यावर बाबासाहेब ऐकला अन वाचला. अन महत्वाचा कृतीत उतवायचा प्रयत्न केला. 

    पूर्वी मीच होते जे कुटूंबासोबत अश्या उन्हात सद्गुरू सद्गुरू करत सत्कारला हजेरी लावायचे. पण कुटूंबात व्यक्तींना झालेला उन्हाचा त्रास पाहून सत्कारला जायचे नाही ठामपणे सांगू लागले. उपासना म्हणजे ग्रंथ वाचन बंद केलं. मला माझ्या पुढील आयुष्यात ना बैठक श्रवण करायची, ना उपासना, ना निरूपण करायचं म्हणत बाहेर पडली ती कायमची. तेव्हा माझ्यामागे बैठकीतील जी लोक माझी स्तुती करायची तीच लोक म्हणू लागली की रेशमा ठोसर ने पळून जाऊन लग्न केलं, ( इथं लग्नाला नवरदेव शोधलाच नव्हता) गादीवर बसून असं काम केलं, तोंड दाखवायला जागा ठेवली नाही म्हणून बैठक सोडली.

    मी रेवदंड्याला जाऊन सांगून आले. आमचा राम राम घ्यावा. ह्यापुढे प्रयत्न करणे, संघर्ष करणे हाच माझ्या आयुष्याचा मूलमंत्र असेल अन माणूस म्हणून जगेन. हे ठरवून जगू लागले. त्यातही आयुष्यात स्थित्यंतरे आली. काही म्हटले बैठक, उपासना सोडल्याने हे घडलं. मी म्हणते देर आये दुरुस्त आये. कुठलेही कर्मकांड, कुठल्याही धर्माचे पालन न करता जगायचे.असा माझा प्रवास आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे झालाय तो कायमचा.
जय जय रघुवीर समर्थ. आता मला आमच्या हिंदूराष्ट्रभुमीत ओळखणारे अंडभक्त म्हणतील, खाल्या मिठाला जागली नाही. बैठक सोडल्याने हे लिहण्याची दुर्बुद्धी झाली. सद्गुरू हिला माफ करो.सध्या फक्त निर्सगाला सत्य मानून जगणारी मी. निर्भीडपणे हे मांडण्याची बुद्धी झाली. कुणी ह्याला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणेल. पण मी ह्याला सम्यक बुद्धी म्हणेन.

रेशमा ठोसर.(१७ एप्रिल २०२३)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com