विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटक संस्थानातील जमखंडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी बाबा आणि आईचे नाव यमुनाबाई असे होते. विठ्ठल रामजी हे थोर समाज सुधारक धर्म सुधारक व लेखक, साहित्यिक होते . त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. *विठ्ठल रामजी शिंदे महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाज सुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक होते.*
शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळविली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्.एल.बी.परिक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरविली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी *१८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया,* म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली.
एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात. मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने *एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज* यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या.
अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणॆ, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे, इत्यादी. या संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालविणे, प्रबोधनपर व्याख्याने, कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या शाखा अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या.
शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतिक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते थोर सुधारक होते. *त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला.* मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात.शिंदे यांनी महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळींत उच्चनैतिक भूमिकेवरून भाग घेतला. मुंबई कायदे-कौन्सिलच्या १९२० च्या निवडणुकीत पुण्यातून मराठयांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहत्यांची विनंती त्यांनी अव्हेरली; कारण त्यांना जातीय तत्त्व मान्य नव्हते. उलट मागासलेला जो बहुजनसमाज, त्याचा कैवार घेणारा बहुजन पक्ष स्थापन करून त्याच्यावतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली. या पक्षाने शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व स्त्रीवर्ग यांच्या हितसंबंधांसाठी झटण्याचा निर्धार प्रकट केला. या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही.
महात्मा गांधी-प्रणीत कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे, या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था त्यांनी स्थापन करण्यात आली. तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. मुंबईत एक ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ भरविली. पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठी त्यांनी चळवळ केली. *पुणे येथे भरलेल्या ‘मुंबई इलाखा शेतकरी परिषदे’चे नेतृत्व शिंदे यांनी केले.* अखेर सरकारला सारावाढ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली. शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसांत एकी करावी, कामगारांसमवेत एकजूट करावी तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन केले.
ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले. आपला समाज रूढी व परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांडे आहेत. त्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांना मान्यता देऊन त्या तत्त्वांचा प्रसार लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. अशा या थोर समाजसुधारकाला जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
*डाॅ. सुवर्णा नाईक - निंबाळकर, पुणे*
0 टिप्पण्या