बरसू येथील रिफायनरीला विरोध करण्यासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणार्यांवर आज लाठीचार्ज करण्यात आला. या संदर्भात पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मा. मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आपल्या हौसेखातर खारघरमध्ये १४ बळी घेण्यात आले. आता रिफायनरी नको म्हणून बारसू पंचक्रोशीतील सर्वच गावे भांडताहेत. तरीही लाठीचार्ज, अश्रूधूर असे प्रकार केले जात आहेत. ही तर राक्षसी राजवट आहे, अशा शब्दात आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.
डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जो काय प्रकार सुरू आहे. ते महाराष्ट्र बंद नव्हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. ही दादागिरी महाराष्ट्र सहन करणार नाही. कारण आज बारसूतील ग्रामस्थांवर जी वेळ आलीय ती उद्या आपल्यावरही येणार आहे. या आंदोलनात सत्यजित चव्हाण यांस अटक करण्यात आली आहे. या आंदोलकांचे नशिब की त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाचा ठपका ठेऊन त्यांच्यावर अद्याप देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही. जास्त दांडगाई जनता सहन करत नाही, हेच या सत्ताधाऱ्यांना समजत नाही.
कोणताही प्रकल्प रेटून नेता येत नाही. शरद पवार यांनी चर्चेने हा प्रश्न मार्गी लावावा, असे म्हटले होते. पण, या सरकारला हृदय नाही. महिलांना मारहाण केली जात आहे. ही विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. सत्तेचा अहं योग्य नाही. स्थानिकांना जर हा प्रकल्प नको असेल तर जुलूम का ? आज लाठीचार्ज करून मोजमाप कराल. उद्या गोळीबारही करतील. गरिबांच्या जीवाची पर्वाच नाही. गरीबांचा जीव गेला तरी त्यांना फरक पडत नाही. गरीब मेल्यानंतर लाकडे सरकार पुरवेल. या सरकारने हे ध्यानात ठेवावे की, आज गवत जाळले आहे, उद्या ग्रामस्थ प्रकल्प जाळतील, अशी टीकाही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली.
प्रस्तावित रिफायनरी जागेच्या सर्व्हेला ग्रामस्थांचा विरोध केला आहे. रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेने संघर्ष वाढलेला आहे. या रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी शासनाचा स्थानिकांवर बारसूमध्ये एक प्रकारचा अघोषित कर्फ्यू लावला आहे. पोलीस चोवीस तास पहारा देत आहेत आणि पोलीस व्हॅन स्थानिक लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस फेऱ्या मारत आहेत. गावकऱ्यांसाठी पाणी घेऊन जाणारे टँकरही पोलिसांकडून रोखले जात असून, ग्रामस्थांना त्यांच्याच शेतात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बारसूपर्यंत कोणीही पोहोचू नये म्हणून धरतळे आणि रंताळे येथे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. प्रकल्पस्थळाची खरी स्थिती उघड करणाऱ्या पत्रकार आणि प्रसारमाध्यमांना वृत्तांकन आणि व्हिडिओ शूट करण्यासही बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती उघडकिस आली आहे.
प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू झालेले ठिय्या आंदोलन कडक उन्हातही आणि रात्रीही प्रकल्पस्थळी सुरूच ठेवले होते. जोपर्यंत प्रकल्प रद्द करण्याची घोषणा होत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. गाडी चालवा, गोळ्या घाला पण आंदोलन मागे घेणार नाही, अशी शपथ आंदोलकांनी घेतली आहे. या आंदोलनाला बारसू, सोलगाव पंचक्रोशी, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय न घेतल्यास संपूर्ण कोकणात जनतेच्या पाठिंब्याने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही रिफायनरी विरोधी संघटनेने दिला आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलक ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आलेले ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच बारसूमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पंचक्रोशीत सशस्त्र पोलीस चोवीस तास पहारा देत असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बारसूपर्यंत कोणीही पोहोचू नये म्हणून धरतळे आणि रंताळे येथे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. प्रकल्प परिसरात जाण्यास ग्रामस्थ आणि स्थानिक पत्रकारांनाही मज्जाव करण्यात आला आहे.
दरम्यान याबाबत सरकारने दडपशाहीचे धोरण आखले असून रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामादरम्यान. २२ एप्रिल ते ३१ मे २०२३ दरम्यान प्रकल्प परिसरात मनाई आदेश लागू केला आहे.. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी दिला आहे. यापूर्वी बारसू परिसरात सर्वेक्षण आणि भू सर्वेक्षणाद्वारे प्रकल्प विरोधात भूमिका घेणाऱ्यांकडून जोरदार विरोध झाला होता. तीव्र आंदोलने झाली होती. या प्रकरणी गुन्हे देखील नोंदविले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित प्रकल्पातील माती परीक्षणासाठी डिलिंगचे काम सुरु होत आहे. म्हणून प्रशासनाने मनाई आदेश लागू केला आहे. तालुक्यातील बारसू सडा, बारसु पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ वरचीवाडी, गोवळ, खालचीवाडी गोळ या ठिकाणी ड्रिलिंगचे काम सुरु असताना १ किमी व्यासाच्या परीघात प्रशासकीय व पोलीस यंत्रणेच्या परवानगी शिवाय प्रवेश व संचार करण्यास मनाई असेल. या कालावधीत समाज माध्यमांवर चिथावणीखोर वक्तव्य करणे, पोस्ट, चित्र, व्हिडिओ प्रदर्शित करणे, यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात भारतीय दंड संहिता १९६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या