लोढा बिल्डरने ठाणे जिल्ह्यातील अठराशे हेक्टर जमिनी सर्व कायदे पायदळी तुडवून शासनाच्या संगणमाताने आपल्या नावे करून घेतलेली आहे.लोढा हे नाव म्हटलं तर सरकारमध्ये मंत्री असणारे,हजारो कोटींची उलाढाल असणारे बांधकाम व्यवसायिक आणि अशा भल्या मोठ्या बिल्डर विरुद्ध लढण्याची हिंमत दाखवणे एवढे सोपे नाही.न्यायाल
यीन लढ्यासाठी पैसा लागतो आणि तो इथल्या आगरी कोळी अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे नाही. न्यायालयात न्याय मिळेल याची शाश्वती नाही,पोलीस यंत्रणा विकली गेलेली, प्रशासन विकले गेलेले,सरकार सुद्धा विकलं गेलेलं अशा परिस्थितीत अशा गोरगरीब शेतकरी समाजासाठी लढणार कोण हा प्रश्न,त्यातच हे आंदोलन हातात घेतलं ते या मातीत जन्माला आलेल्या,स्वतः आगरी असणाऱ्या उरणच्या राजाराम पाटलांनी. मुंबई सानपाडा मध्ये एक गुंठा जमीन पाच कोटी रुपयांना विकली जाते पण अज्ञानी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलत कवडीमोल किमतीमध्ये अगदी एक दोन लाख गुंठा या दराने खरेदी करून तिथे टॉवर बांधून अगदी एक फ्लॅट 80 ते 90 लाख रुपयांना विकला जातो हा या भूमिपुत्र आगरी कोळी शेतकऱ्यांवरती केला गेलेला अन्याय आहे. आगरी कोळी समाज तसा मासेमारी करणारा आणि अल्पभूधारक जी शेती आहे तीही पावसाळी अशा परिस्थितीत आर्थिक उत्पन्न जेमतेम. शिक्षणाचा प्रचंड अभाव त्यामुळे अशा अशिक्षित समाजाला संघटित करणे,टिकवून ठेवणे आणि त्यांना आपल्या हक्कांसाठी संघर्ष करायला लावणे हे तसे कठीणच.
इतिहासात हा विडा माझ्या माहितीप्रमाणे दोनच माणसे उचलू शकली. एक स्वर्गीय दी.बा.पाटील आणि 1932 साली नारायण नागो पाटील अशा प्रतिकूल परिस्थितीत हे आंदोलन हातात घेतले ते उरणच्या राजाराम पाटलांनी आणि या आंदोलनाला नेतृत्व मिळाले.आता नेतृत्व म्हटले की,दोन गोष्टी अत्यावश्यक असतात एक बुद्धिमत्ता आणि दुसरी प्रामाणिक तत्त्वनिष्ठा यातील एक जरी गुण डळमळीत असला तर असं नेतृत्व अयशस्वी ठरते. राजाराम पाटलांना गेली काही वर्षे मी जवळून ओळखतो. बुद्धिमत्ता आणि तत्त्वनिष्ठा त्यांच्यात ठासून भरलेली आहे. एखाद्या नेतृत्वामध्ये नुसती बुद्धिमत्ता असून चालत नाही तरतत्वनिष्ठाही लागते. तत्वनिष्ठेच्या अभावाने असे नेतृत्व स्वार्थाला बळी पडते आणि विकले जाते तर आपल्या समाजाला प्रस्थापितांच्या दावणीला बांधते,आणि एखादे नेतृत्व तत्वनिष्ठ आहे पण बुद्धिमान नसेल तर विकले जाणार नाही पण लढायचं कसं हे त्याला कळणार नाही अशा परिस्थितीत असं नेतृत्व नपुसंक ठरतं, तर असा लढा कधीही यशस्वी होत नाही
राजाराम पाटील हे मी पाहिलेले अत्यंत बुद्धिमान व आपल्या समाजाशी,तत्वांची प्रामाणिक असणारे नेतृत्व,ज्या पद्धतीने हेदुटने गावच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यावरती संविधानिक चळवळीचे संस्कार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लोढासारख्या बलाढ्य शक्ती विरुद्ध,लोकशाही मार्गाने लढण्याची हिंमत त्यांनी सामान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण केली, ती वाखानण्याजोगी, म्हणून हे हेदुटने गावचे जनआंदोलन एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचले आहे.
एखादा लढा ज्यावेळी अशा भांडवलशाही शक्ती विरुद्ध उभा राहतो त्यावेळी अशा शक्ती या लढ्याला चिरडण्याचा प्रयत्न करतात यासाठी साम,दाम,दंड,भेद अशा सर्व प्रकारच्या आयूधांचा वापर करतात हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय,या जनआंदोलनाचे नेतृत्व करणारे माननीय राजाराम पाटील व या संपूर्ण आंदोलनाचे वार्तांकन करून आंदोलनाचे वार्तांकन समाजासमोर घेऊन जाणारे प्रभात पर्व न्यूज चे सागर राजे यांच्या वरती लोढा बिल्डरने पाच कोटींचा आब्रु नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. समाजात जन माणसासाठी लढा देणे, प्रसंगी अंगावरती केसेस दाखल होणे आणि त्या न्यायालयात वर्षानुवर्षे लढत राहणे हे आजच्या स्वार्थी नेतृत्वाच्या जमान्यात अगदी विरळच. हा देश भारतीय संविधानावर चालतो या देशात कायद्याचे राज्य आहे. आपण लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राहतो या देशाच्या संविधानाने देशातील भारतीय नागरिकांना संविधानाच्या कलम 19 एक ए नुसार बोलण्याचे व अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.
मीडियाला लोकशाहीचा चौथा खांब मांनले गेलेले आहे,आणि अशा परिस्थितीत या केसेस दाखल करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरळ सरळ गळजचेपी आहे. हे आंदोलन दडपण्याचा व दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे या आंदोलनाच्या सुरुवातीपासून मी या आंदोलनाचा साक्षीदार राहिलेलो आहे. काल राजाराम पाटलांच्या नेतृत्वाखाली हेदुटने गावच्या ग्रामस्थांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणात लक्षणीय रीत्या महिलांचा सहभाग होता.याचा परिणाम असा झाला की प्रशासनावरती दबाव येऊन खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी लोढाने केलेल्या गैरप्रकारच्या चौकशीचे आदेश दिले व त्यामुळे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले.
लोढासारख्या भांडवलदारा विरोधी उभे केलेले हे जन आंदोलन सर्वसामान्य ओबीसी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लढलेला लढा, व ओबीसी आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेले आहे हे आंदोलन आता शेतकऱ्यांचे आंदोलन राहिले नसून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे झालेले आहे.आंदोलनाची व्याप्ती आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात होत आहे.तसेच या आंदोलनाला लोकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
प्रताप नागवंशी - 8433787178,कल्याण.
0 टिप्पण्या