कोण होता जिवा ...उमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव. गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा. आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.आणि त्याच्या बरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे. हा हिरडस मावळातला.वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.
वास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार ? लेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते ..!मैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला. आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.राजीयांनी पांढरा अंगरखा घातला होता.कृष्णा घोडीवर स्वार होते आणि कमरेला तलवार बांधली होती. जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते.
राजे खाली उतरले ..तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजीरावांना मिठी मारली.तितक्यात खबर आली की, बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली.मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने.हे ऐकून मैदान शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन् मैल आले होते.आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते. तेही राजांच्या हस्ते'' मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही.या गावात असा कोण आहे का? जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल ?असेल तर समोर या.''ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरु झाली.एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता. सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.राजे सर्व पाहत होते.तितक्यात कोणीतरी किंचाळला... ''आरं आला रं जिवा आला ''
राजांनी चौकशी केली तानाजीरावांपाशी ..तानाजी म्हणाले, ''राजं , ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होतं..निजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय."राजांच्या चेहर्यावर एक तेज आले होते.
कुस्तीची सलामी झडली .भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जिवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता. डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला. भिकाजीने उसन्या अवसानाने पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले. जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले.
तितक्यात शिंगे-करणे गरजू लागली. खुद्द राजे येत होते.पटापटा सर्व बाजूला झाले.राजीयांनी हासत हासत जिवाला मिठीच मारली. मनात काय राजकारण होते माहीत नव्हते; मात्र राजे जाम खुश झाले होते.राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जिवाला बक्षीस दिले..आणि विचारले.."जिवा काय करतोस ??"
जिवा उद्गारला ,''काय नाय,वरातीत पट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो.''
राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ? पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमांच्यासोबत..!!आहे कबूल ..?"
जिवा हसला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.
प्रतापगडाच्या पायथ्याशी मु. पो. कोंडवली, जि. सातारा येथील साकपाळ कुटुंबात वीर जिवाजींचा जन्म 9 ऑक्टोबर 1665 (अश्विन शुद्ध 6 शके 1557) रोजी झाला. आईवडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले या आप्ताने केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. बालपणापासून त्या काळी आलेल्या धकाधकीच्या संकटातून लढायांच्या काळात मुलांना लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे. जिवाजीसुद्धा साता-याच्या तालमीतला लाल मातीत मेहनत करणारा पठ्ठा होऊ लागला. जोर, बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याचे शिक्षण त्याला मिळाले होते. मातीत कुस्त्या खेळणे या प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला. जिवाजी दांडपट्टा तर असा फिरवायचा की पायाच्या टाचेखाली ठेवलेल्या लिंबाचे तो डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच दोन तुकडे करायचा. उंच उड्या मारण्यात तर तो निष्णात होता. उड्डाण मारल्यावर हवेतच शत्रूच्या शरीराचे दोन तुकडे करत असे. शिवाय त्याची नजर तीक्ष्ण होती.
शिवरायांना जेव्हा जिवाजी महालेविषयी समजले; तेव्हा त्यांनी जिवाजीला खास सैन्यात दाखल करून घेतले. तरणाबांड-भरदार मान-जाड पल्लेदार मिशा, सरळ नाक, भलेमोठे कपाळ आणि भेदक नजर पाहताच शत्रूलाही कापरे भरत होते. शरीराने वाघ-सिंह ज्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी धावतात त्याप्रमाणे तो अतिशय चपळ होता. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूरच्या दरबारात बडी बेगमने सर्व मातब्बर सेनापती, सरदारांना बोलावले होते. तिने सर्वांना सवाल केला, शिवाजीला कोण पकडून आणेल? दरबारात तर शांतता पसरली. तेवढ्यात मागून एक प्रचंड देहाचा, पायातील वहाणा कर्रकर्र वाजवत दरबारात आला. त्याने बडी बेगमचे आव्हान स्वीकारले. अफजल खान निश्चितच हे काम फत्ते करणार असा विश्वास तिला वाटू लागला. भल्याबु-या मार्गाने किंवा विश्वासघाताने अनेक शत्रूंना संपवण्यात तो तरबेज होता.
अफजल खान आपल्यासोबत हजारो सैनिक, घोडदळ-पायदळ घेऊन मजल दरमजल करत महाराष्ट्रात दाखल झाला. तेव्हा शिवराय रायगडावर होते. रायगड सोडून शिवरायांनी प्रतापगडावर जाण्याचा विचार केला. कारण प्रतापगड सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय योग्य किल्ला होता प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर शामियाना उभारण्यात आला होता. अफजल खानाचे मनोराज्य चालू होते. महाराज गडाच्या पाय-या उतरत असताना, थोड्या अंतरावर सय्यद बंडा उभा होता. जिवाजींनी सय्यद बंडाविषयीची माहिती महाराजांना दिली. त्याला तेथून दूर करण्यास सांगितले. महाराजांनी वकिलामार्फत निरोप पाठवून सय्यद बंडास दूर करण्यास सागितले. अफजल खान, त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियान्यात होते. अफजल खानाने शिवरायांना दोन्ही हात हवेत पसरून आलिंगन दिले. त्यांची मान डाव्या कुशीत दाबून ठेवली आणि उजव्या हाताने कट्यारीने पाठीवर वार केला. अंगात चिलखत असल्याने कट्यार घसरत गेली. अंगरखा टराटरा फाटत होता. शिवरायांनी क्षणाचाही विलंब न लावता अस्तन्यात लपवलेला बिचवा काढून खानाच्या पोटात खुपसला. शिवरायांवर त्याच्या वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने हल्ला चढवला. शिवाजीराजांनी कृष्णाजी कुलकर्णी याचेही तलवारीने दोन तुकडे केले. इकडे सय्यद बंडा गोंधळाचा आवाज ऐकून धावत आला. महाराजांवर हल्ला करणार इतक्यात जिवा महालेने सय्यद बंडाचा समशेर असलेला हात वरच्यावर हवेत कापला. शिवरायांनाही या चपळाईचे कौतुक वाटले. तेव्हापासूनच ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हा वाक्प्रचार रूढ झाला. सुरतेच्या स्वारीतही जिवाजींनी महाराजांना वाचवल्याची नोंद आहे.
म्हणतात ना होता जिवा, म्हणून वाचला शिवा
0 टिप्पण्या