औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी प्रथम स्वत:चे चारित्र्य बघावे. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात कामाला होतात की नाही, तिकडे नोकऱ्या करायचात की नाही, हे सांगावे. आम्ही तर दरबारात साधे चोपदारही नव्हतो. त्यामुळे लोकांना शहाणपण शिकवताना प्रथम आपला इतिहास तपासावा, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना फटकारले. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या विषयी प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, जुन्या काळात जयचंद होते, त्यांनी परकीयांना राज्यात आणलं, त्यामुळे आपण गुलाम झालो. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी प्रथम ते जयचंद आहेत की नाही, याचा खुलासा करावा आणि मग आमच्यावर टीका करावी,
प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्या संघटनांना सडेतोड शब्दांमध्ये फटकारले. मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली असे म्हणता येईल. या स्थळावर शेवटी लोकांची श्रद्धा आहे, आपली श्रद्धा आहे की नाही, हा वेगळा भाग आहे. ज्याला मानायचं आहे, त्यांनी मानावं, ज्यांना नाही मानायचं त्यांनी मानू नये. पण मानणाऱ्या आणि न मानणाऱ्यांनी एकमेकांचा अपमान करु नये. लोकांच्या या श्रद्धेचा मान आपण राखला पाहिजे, त्याचा आदर झाला पाहिजे. सरकारनेही या श्रद्धेचा अपमान करु नये, इथं भद्रा मारुतीचं मंदिर आहे. या मारुतीच्या मंदिराने देखील आम्हाला मदत केली आहे. त्यांना कसलाही आक्षेप नाहीये, त्यालाही मी असंच संध्याकाळी भेट देतो आहे. भारताच्या दृष्टीकोनातून खुलताबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे. याचा लोकांनी विचार करावा. नावावरून जो भांडण लावण्याचा प्रकार चालला आहे त्यांना एवढंच सांगतो की, औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं ते कोणाला मिटवता येणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राज्यात १२ ठिकाणी दंगली करण्याचा प्रयत्न झाला. नागपूर एसआयटीचा रिपोर्ट वाचला तर त्यामध्ये सरकारला सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. काही संघटना राज्यात दंगल करणार आहेत, असे त्या अहवालात म्हटले होते. पण महाराष्ट्राच्या जनतेने दंगलींना प्रतिसाद दिला नाही. सर्व दंगली दोन ते तीन तासांमध्ये आटोक्यात आल्या. याचा अर्थ महाराष्ट्रातील जनतेचा या दंगलींना पाठिंबा नाही, असे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले.
औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने तुमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय अडचण होत असल्याचा मुद्यालाही बगल देत प्रकाश आंबेडकर म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीला मी भेट दिल्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने अद्याप कोणतंही वक्तव्य केलेले नाही. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्त्व हे प्रबोधनकारांचे हिंदुत्त्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्त्वही प्रबोधनकारांचे हिंदुत्त्व होते. नंतर सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी जे जे करता येईल, ते ते केले. पण शिवसेनेच्या हिंदुत्वाचा मूळ गाभा हा प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचाच राहिला. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही त्याच मार्गावर चालत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या