मुंबईतील माहिम परिसरात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांचा हात मिळवतानाचा फोटो आणि या दोघांच्या मागे औरंगजेबाचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला. “औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे” अशी कॅप्शन देत खाली ‘शिवरायांची जनता’ लिहिलं आहे. महाराष्ट्रात औरंगजेबावरून राज्यातील वातावरण तापवण्याचा डाव काही विघ्नसंतोषी मंडळी करीत आहेत. औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात मोठा वाद निर्माण करण्यात आला होता हा त्यातलाच एक भाग होता. याचा परिणाम कोल्हापुरात दंगलही उसळली. दंगलीमुळे कोल्हापूर दोन दिवस अशांत होते. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन तिथे फुलं वाहिली. यावर प्रसिद्धी माध्यमांनी चांगलीच मुक्ताफळं उधळली. मारुती मंदीरालाही भेट दिली हे मात्र डावलण्यात आलं. केवळ औरंगजेबच्या कबरीला भेट दिली याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात आले. मात्र त्याचाही समाजकंटकांना काही उपयोग न झाल्याने त्यांनी आता मुंबईतील माहिममध्ये फुकट छापून मिळणारे बॅनर लावले आहेत.
या प्रकरणी खरे तर उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांनाच जाब विचारात “जिन्नाहच्या कबरीवर आडवाणींनी डोकं का टेकलं होतं” असा प्रतिप्रश्न विचारला होता. २० जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, “जेव्हा आमची युती (शिवसेना-भाजपा) होती. तेव्हा लालकृष्ण अडवाणी साहेब (भाजपाचे ज्येष्ठ नेते) जिन्नाहच्या (मोहम्मद अली जिन्नाह) कबरीवर गेले होते. तसेच नवाज शरीफच्या वाढदिवसाच्या दिवशी आपले पंतप्रधान केक खायला गेले होते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. मला असं वाटतं, लोकांना आता इतिहासात अडकवून ठेवण्याऐवजी नव्या विचारांसह पुढं जावं.”
मात्र याचं उत्तराचं या भक्तमंडळींकडे नसल्याने आता बॅनरबाजी करण्यात आली आहे. जेणेकरून यामुळे मुळ प्रश्नांवरून लोकांचे लक्ष उडवण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. हे पोस्टर रात्री लावण्यात आले होते. ते कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. काही काळाने ते काढण्यात आले. मात्र याबाबत अद्याप एकही तक्रार आलेली नाही. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल केला जाईल”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
खुलताबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (१७ जून) भेट दिली हे विशेष करून महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना चांगलंच लागलं आहे. खरं तर औरंगजेबच्या आडून महाराष्ट्र पेटवायचे मनसुबे यामुळे उलटून पडल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. तेव्हा आता उद्धव ठाकरेंवर तोफा डागण्याचा असाध्य प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. वंचित बहुजन आघाडी हा शिवसेनेचा मित्र पक्ष आहे. वंचित बहुजन आघाडी एक स्वतंत्र पक्ष आहे. त्याची स्वत:ची एक विचारधारा आहे. तो कुणाचा मिंध्या नाही हे देखील महत्त्वाचं आहे. त्यातच महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची एक राजकीय भूमिका ठरलेली आहे. या भूमिकेच्या आड ते कुणालाही येऊ देत नाही. मग त्यांच्यासोबत काँग्रेसवाले आले तरी ते आपली भूमिका सोडत नाहीत हे त्यांच्या आजपर्यंतच्या राजकारणावरून सर्वांना माहिती झाले आहे. त्यामुळे कधी कधी त्यांना एकला चलो रे व्हावे लागते. तरीही त्यांनी आजपर्यंत तकलादू राजकारण कधीच केले नाही. हे इथल्या प्रस्थापित वर्गाला चांगलेच माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भोवती आंबेडकरी चळवळीचं वलय आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिका या नेहमीच वैचारिक राहिल्या आहेत. याबाबत कुणाचं दुमत नाही.
मात्र आता सरळ आंबेडकरी चळवळीशी पंगा घेण्याची ज्यांची हिम्मत नाही ते आता सध्या उद्धव ठाकरे यांना टार्गेट करून पुन्हा औरंगजेब प्रकरण उकरून काढण्याचा प्रयत्न करताहेत. त्याचंच एक उदाहरण म्हणजे आज माहिम भागात लावण्यात आलेला बॅनर. हल्ली वर्तमानपत्रातून मोठ मोठ्या जाहीराती काय? किंवा अशी मोठ मोठी पोस्टर्स काय कशी फूकट लावली जात आहेत. यामागचं राजकारण आता लपून राहिलेलं नाही. खरं तर या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी भद्रा मारुतीच्या मंदिरासही भेट दिली. अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्थळांना भेटी दिल्या असून प्रत्येकाचा सन्मान राखला जावा, अशी भूमिका त्यांनी या भेटींनतर व्यक्त केली. तसेच जुन्या काळात जयचंद होते. त्यांनी परकीय लोकांना राज्यात आणले. यामुळे आपल्या गुलामी सहन करावी लागली. आमच्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी प्रथम ते जयचंद आहेत की नाही, याचा खुलासा करावा, त्यानंतर आमच्यावर टीका करावी, असे स्पष्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी जयचंद कोण? असा प्रतिप्रश्न निर्माण केला. मात्र या प्रश्नाला सत्ताधाऱ्यांनीच काय पण महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाने उत्तर दिले नाही. या प्रश्नालाच बगल देण्यासाठी माहिममध्ये अशा तऱ्हेचे बॅनर लावून वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मात्र निश्चित.
0 टिप्पण्या