शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अशा घटनांमध्ये जीवित व वित्तहानी होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून मात्र ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. तरीही शहरातील बहुतांश वृक्ष काँक्रीटमुक्त आहेत तर, उर्वरित काँक्रीटच्या फासात अडकलेल्या वृक्षांचे परिक्षण करण्यात येत असल्याचा दावा ठाणे महानगर पालिकेने उच्च न्यायालयात केला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचा हा दावा पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी खोडून काढला आहे. त्यांनी काँक्रिटच्या वेढ्यातील वृक्षांची छायाचित्रेच न्यायालयात सादर केली. त्यावर न्यायालयाने अशा वृक्षांचे ७ दिवसांत परीक्षण पूर्ण करून वस्थुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे पालिकेला दिले आहेत.
ठाण्यात वर्षभर बेमौसम वृक्ष कोसळण्याचा घटना वाढत आहेत. वृक्ष पडझडीमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होत आहे. वृक्ष कोसळण्यामागे ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरणाचा अक्षम्य कारभार कारणीभूत आहे. वृक्ष कोसळण्यामागची वैज्ञानिक कारणे माहित असूनही याबद्दल काहीही केले जात नाही. २०१५ पासून राष्ट्रीय हरित प्राधिकरण व अन्य न्यायालयांनी वृक्ष काँक्रिट मुक्त करण्याचे वारंवार सूचना देऊनही ठाणे महापालिका त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत उदासीन आहे, असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. या याचिकेवर ५ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्यासमोर सुनावणी झाली.
0 टिप्पण्या