Top Post Ad

ठाण्यातील राष्ट्रवादीला जितेंद्र आव्हाड तारणार का ?


 अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार असे बॅनर लावले होते. त्यातच अजित पवार यांचे ठाण्यातील कट्टर समर्थक असलेले नजीब मुल्ला यांच्या समर्थकांनी आव्हाड आणि जयंत पाटील यांच्याविरोधात निर्देशन केले. तसेच त्या दोघांचा बंटी बबली उल्लेख करून त्याचे फोटो पायदळी तुडवले. त्यानंतर आव्हाड यांच्या मतदार संघात अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर मुल्ला समर्थकांनी लावले. तर अजित पवार यांनी मुंबईतील पहिल्या जाहीर बैठकीत आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्ठ्या असे म्हणत त्यांना चिमटा काढला. मात्र जितेेद्र आव्हाडांनी त्याबाबत प्रतिक्रिया न देता, बॅनर लावत उत्तर दिले. ठाण्याचा पठ्ठ्या हा निष्ठावान आहे असे म्हणून त्यांनी आपली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता ठाण्यात केवळ बॅनरबाजी होणार की राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्यासाठी हेराफेरी होणार.  ठाण्यातील राष्ट्रवादीला आता जितेंद्र आव्हाड तारणार की, संपुर्ण ठाणेजिल्हा अजित पवार हायजॅक करणार हे येणारा काळच ठरवेल.


  राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर  ठाण्यासह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोणता जिल्हाध्यक्ष कोणत्या पवारांच्या तंबूत यावर खळबतं सुरु झाली आहेत. मुंबई, ठाण्यात विशेष प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादीच्या गोठात जिल्हाध्यक्षांच्या बदल्यां सुरु झाल्या आहेत. याला कारण ठरलं आहे ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू असलेले आनंद परांजपे यांनी आव्हाड यांनाच दिलेला धक्का. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील वेगवेगळ्या भागातील लोकप्रतिनिधी तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांकडून त्यांना समर्थन देण्यास सुरुवात केली असतानाच, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनीही अजित पवार यांना समर्थन दिले आहे. या वृत्तास त्यांनी दुजोरा देत अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे फडणवीस युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आता ठाणे शहरातही त्यांच्या निकटचे समजले जाणारे काही माजी नगरसेवकही नॉट रिचेबल झाले आहेत. यात नजीब मुल्ला यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यात मागील काही वर्षे शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये आलेले आनंद परांजपे यांनीही रविवारी दुपारनंतर अजित पवार यांना समर्थन देत देवगिरी वर हजेरी लावली. 

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून परांजपे ओळखले जातात. त्यामुळे हा आव्हाड यांच्यासाठीही  मोठा धक्का मानला जात आहे.  शिवसेनेत कोंडी होत असल्याने खासदार असलेल्या आनंद परांजपे यांना आव्हाड यांनी राष्ट्रवादीत आणले. ठाण्याचे जिल्हाध्यक्ष केले, पण याच परांजपे यांनी आव्हाड यांना कात्रजचा घाट दाखवत अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केले.  खासदारकीसाठीच त्यांनी अजित पवारांचा हात धरला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.  

शिवसेनेचे अभ्यासू खासदार प्रकाश परांजपे यांचे अकाली निधन झाल्यावर लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव आनंद परांजपे यांना शिवसेनेने तिकीट दिले आणि ते चांगल्या मतांनी निवडून आले. त्यानंतर त्यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातील अनेक समस्या लोकसभेत मांडून आपली छाप निर्माण केली होती. ते 2014 पूर्वी शिवसेनेत असताना जिल्हा स्तरावरचे नेतृत्व दखल घेत नसल्याने नाराज होते, पक्षातून काही मंडळी त्यांना त्रास देत असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ते संपर्कात आल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कानावर आव्हाड यांनी परांजपे यांची पक्षात होणारी कोंडी घातली आणि परांजपे यांचा राष्ट्रवादीत येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमधून कल्याण आणि ठाणे लोकसभा निवडणुका लढवल्या, पण त्यांना यश काही आले नाही.

परांजपे गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष होते. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ते लोकसभा निवडणूक  लढवण्याची व्यूहरचना होती. पण आनंद परांजपे हे अचानक अजित पवार गटात गेल्याने आता नव्याने उमेदवार शोधावा लागणार आहे.  मागील काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू होती. त्यात अजित पवार यांच्यासोबत ठाण्यातही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांनी आव्हाड यांची  साथ सोडत अजित पवारांना टाळी दिली. 

माजी खासदार व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिल्यानंतर ठाण्यात जिल्हाध्यक्षपदावर सुहास देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. आता परांजपे यांची थेट प्रदेश प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परांजपे यांना प्रवक्ते पदाचे नियुक्ती पत्र दिले. त्यामुळे आता शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका मांडणारे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या पाठोपाठ ठाण्यात आनंद परांजपे राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम काम करणार आहेत. या दोघांमधील द्वंद्व याआधी जोरदार रंगल्याचे ठाणेकरांनी वारंवार अनुभवले आहेच. तर या नव्या सत्ता समीकरणाने एकीकडे मंत्रिमंडळात एकत्र सत्तेत बसलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे ठाण्यात कसे मनोमिलन होणार, असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही आनंद परांजपे यांनी वारंवार ठाणे पालिकेतील विविध मुद्द्यांवरून तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेला अंगावर घेतले होते. त्याचे पडसाद विविध जाहीर कार्यक्रमात नेत्यांमधील वादातून उमटले होते. त्यानंतर राज्यात शिंदे गट व भाजपची सत्ता आली. त्यावेळी परांजपे यांनी त्यांच्या शिंदे गट विरोधाची धार कायम ठेवली. नुकताच ठाण्यातील पोलिसांवर दबाव तंत्राचाही आरोप करून परांजपे यांनी अनेक पुरावे सादर केले होते. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात सामील झालेल्या परांजपे यांच्याशी जुळवून घेताना शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वाचा कस लागणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते असलेल्या नरेश म्हस्के यांनी शिंदे गट सत्तेत येताच विरोधकांवर टीकेचे बाण सोडले होते. त्यामुळे आता या दोन्ही गटांत दिलजमाई कशी होणार, हे पाहावे लागणार आहे.

अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी अपेक्षेप्रमाणे अजित पवारांना साथ दिली. मुल्ला आणि आव्हाड यांच्यातील संबंध गेल्या काही काळापासून ताणलेलेच होते. त्यातच मुल्ला यांचे शिंदे गटातील स्थानिक नेतृत्वासोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या वाढदिवशी याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर शिंदे गटाशी जुळवून घेण्यात फारशी अडचण येणार नाही, असा कयास व्यक्त होत आहे. 

मुंब्र्यातील राष्ट्रवादीसह समाजवादी, एमआयएम आदी पक्षांच्या माजी नगरसेवकांची मोट बांधून केलेल्या 'मुंब्रा विकास आघाडी'ची निवडणूक आयोगाकडे दोन दिवसांपूर्वी छाननी पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत या आघाडीची नोंदणी पूर्ण होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे यांनी व्यक्त केला आहे. सध्या आपण राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली आहे. तसेच मुंब्रा विकास आघाडीच्या रूपाने कळवा-मुंब्र्यात विकासाचे राजकारण करणार असून अजित पवार यांच्या निर्णयाचे आपण स्वागतच करतो, असे किणे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कल्याणच्या लोकसभा मतदार संघावर दावा करायचा आणि ठाणे तसेच पालघर हे लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घ्यायचे असे भाजपचे गणित आहे. लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. संसदेत एकहाती सत्ता हे ध्येय ठेवूनच सध्या भाजप राज्यातील सरकारे फोडत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्यानुसार परांजपे यांच्यासाठी ठाणे सोडून त्या बदल्यात राष्ट्रवादीकडून एखादा मतदारसंघ भाजपा मागून घेऊ शकते.  त्यामुळे भविष्यात जितेंद्र आव्हाडांना ठाण्यातच नव्हे तर आपल्या मतदारसंघात देखील मोठ्या राजकीय संघर्षाला तोंड द्यावे लागणार आहे हे सांगायला आता कोणत्या तकलादू जोतिषाची गरज नाही...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com