Top Post Ad

गदर... या शाहीराला सत्ता घाबरते

तेलंगण चळवळीत आपल्या गाण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावणारे क्रांतिकारी  लोकगायक गदर यांचे रविवार दि.६ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या आजारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.....

 



दुनिया का दुश्मन है अमरीका-जापान,
उनके दलाल है टाटा-1 टा-बिर्ला,
उनके गुलाम है देश के नेता, उनके चमचे है गांव के जालिम,
इनसे बचना है जागो रे 55
जागो रे 555 जागो रे जागो जागो जागो रे 555

देशातील व जगातील लोकांना त्यांच्या शत्रूंबाबत जाणीव करून देऊन जागृतीचं कार्य करणाऱ्या क्रांतिकारक लोकशाहीर कॉ. गदर ला आंध्रप्रदेशच्या पोलिसांनी काही वर्षापूर्वी गोळ्या घातल्या व नेहमीसाठी त्यांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न केले. पण कॉ. गदरच्या क्रांती प्रयत्नांना, त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला, किंवा कविता, गीत, नृत्य, कथा, नाटकांना जनतेच्या ओठांवरून शत्रू कसे हिरावून घेऊ शकतील? त्यांचे शब्द व आवाज कष्टकरी जनतेचा देशाचा आवाज बनलेला आहे. पुस्तके व कॅसेटद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेला आहे, गदर एक भौतिक शक्ती बनली आहे, जी बंदुका तोफांनी रोखली जाऊच शकत नाही.

कॉ. गदर मागील अनेक वर्षापासून विद्रोहाचे बी पेरत आहेत, गावात, शहरात, जंगलामध्ये क्रांतीची गाणी गात आहेत, नुकड नाटकांद्वारे जनतेच्या सामूहिक शक्तीचं प्रदर्शन करीत आहेत, जनतेच्या कविता लिहीत आहेत, कष्टकऱ्यांच्या कव्वाल्या सादर करीत आहेत, ओगुकथा, बुर्राकथा सांगत आहेत, चरवाहा नृत्य करीत आहेत. आपल्या या क्रांतिकारी सांस्कृतिक झंझावाताने ते जनतेच्या हृदयात मेंदूत आग पेटवत आहेत. जनतेस क्रांतिकारी सिध्दांत विचार-संस्कृती ने सज्ज करीत आहेत. ब्राह्मणशाही सरंजामशाही साम्राज्यशाही भांडवलशाही विरोधी एक 'लोकयुध्द लढण्यासाठी!

खांद्यावर घोंगडं, हातात लाल दुपट्टा वा काठी, गुडघ्यापर्यंत लांबीचं लाल काठाचं धोतर, पायात घुंगरू अशा वेषात चरवाह नृत्य करतांना गदर लक्षावधी लोकांच्या 'मैफली' स आपलंसं करून घेतो. लोकांमध्ये उत्साह संचारतो. जेव्हा गदर शहीदांच्या स्मृतीत 'अमर वीरूलक जय बोलो' (अमर वीरांना जय बोला) गीतनृत्य सादर करतो, तेव्हा लक्षावधी लोकांच्या डोळ्यात पाणी तराळते. गदरमध्ये अफाट मानवी ऊर्जा, सौंदर्य व विचारांची स्पष्टता आदी गुण उठावदारपणे दिसून येतात. लोककलांच्या माध्यमातून ते सरळ जनतेशी एकरूप होतात आणि लोकांच्या उद्वेगाला, संतापाला, मुक्ती कामनेला आपला आवाज देतात. जेव्हा गदर आपल्या ओघवत्या शैलीत लक्षावधी शोषित लोकांच्या मध्ये-

"भारत अपनी महान भूमी उसकी कहानी सुनो रे भाई
सर पे खड़ा है बड़ा हिमालय नदियां बहती गंगा-यमुना
हरी-भरी अपनी धरती में उगले मोती निकले सोना
सुजलाम सुफलाम इसी देश में रोटी महंगी क्यों रे भाई?'  हे गीत म्हणतो तेव्हा 'रोटी महंगी क्यों रे भाई?' हा गदर चा सवाल त्या तमाम लोकांच्या मेंदूला जाऊन भिडतो, लोकं विचारप्रवृत्त होतात, परिणामी रस्त्यांवर आंदोलनांची लाट उसळते, लोकं आपल्या हक्कांसाठी पेटून उठतात. शासक वर्गाचा थरकाप उडतो, त्याच्याच परिणामी गदरवर गोळ्यांचा वर्षाव होतो.

क्रांतिकारी, विद्रोही, लोकशाहीर अशी अनेक विशेषणं ज्यांच्या नावावर लागतात, - अशा कॉ. गदरचा जन्म आंध्रप्रदेशातील मेडक जिल्ह्यातील तूपरान गावात ३० जानेवारी १९४८ साली झाला. मेडक जिल्हा आजही क्रांतिकारी चळवळीचा केंद्रबिंदू आहे. गदर म्हणजे गुम्माडी विठ्ठल राव. गदर हे नाव स्थाला चळवळीनं/लोकांनी दिलं. अनुसूचित जातीत जन्मलेल्या गदरचे आई-वडिल मजुरी करायचे. गदर बुध्दीने तल्लख होता. ७७% गुण मिळवून उस्मानिया विद्यापीठात राखीव जागा तत्वावर इंजोनिअरिंग मध्ये त्याने प्रवेश मिळवला. तेथे त्याला सवर्णांकडून 'तू' तर सरकारचा जावई आहेस, यासारखी टोमणे ऐकावी लागत. भारतातील समाजव्यवस्था जाती व्यवस्थेने किती पोखरलेली आहे, याची सूक्ष्म जाणीव येथेच गदरला झाली. वडील आंबेडकरी विचाराचे असल्यामुळे बौध्द धम्माशी निगडीत सर्वच प्रकारचं तत्वज्ञान व साहित्य घरीच उपलब्ध होतं, ते त्यांनी वाचून काढलं होतं. पण एक व्यक्ती काहीही काम न करता ऐशो-आरामात जगते तर दुसरी व्यक्ती रक्ताला आटवून, सगळी दुनिया निर्माण करूनही का बेहाल आहे? या विसंगतिचं उत्तर गदरला सापडत नव्हतं, याच काळात ते देशभक्तीची गाणी लिहायचे व गायचे. गदर विद्यार्थी दशेत असतांना नक्षलबारी श्रीकाकुलमच्या सशस्त्र विद्रोहाने भारतात कष्टकऱ्यांच्या क्रांतीला राजकीय अजेंडयावर आणले. या विद्रोहाने मुक्तिची वाट मोकळी करण्याबरोबरच पर्यायी संस्कृतीचीही वाट मोकळी केली. याच विद्रोहाने गदरला विचार दिले, राजकीय जाणीव दिली व वरील विसंगतीचं उत्तरही दिलं.

'जन नाट्य मंडली' चा जन्म १९६८ मध्ये सिकंदराबादचे चित्रपट निर्माते / कलावंत बी. नरसिंहराव यांनी 'आर्ट लवर्स' संस्था स्थापन केली. तेलंगणा व श्रीकाकुलमच्या संघर्षाने प्रभावित झालेल्या रॅडिकल कलावंत, गायक, कवी व लेखकांचा संच होता. परंतु एका नव्या दमाचा अभियांत्रिकी विद्यार्थी, गुम्माडी विठ्ठल (गदर) ने कवितेत नव्या रूप आशयाची गेय कविता (गाणं) प्रस्तुत केली. ही खेड्यातील लोकांनाही स्पर्शन गेली. बी. नरसिंहरावाने तेलंगणाच्या सशस्त्र लढ्याच्या पार्श्वभूमीवर 'माँभूमि' हा आपला पहिला चित्रपट बनवला, या चित्रपटात गदरने छोटीसी भूमिका केली होती..

या संस्थेने उस्मानिया विद्यापीठातील जार्ज रेड्डी या विद्यार्थी नेत्याच्या हत्येविरुध्द स्मृति सप्ताह साजरा केला होता. एक गीताची पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली होती. याच प्रश्नावर जन नाट्य मंडलीने सुध्दा शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले होते. लोकांनी या कार्यक्रमांना उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला होता. या मोहिमेत गदर शामील झाले होते. पुढे गदर जन नाट्य मंडलीमध्ये पूर्णपणे सामील झाले. 'आपल्या बागा का सुकताहेत? आपल्या अन्नास कोण लुबाडतोय? लोक का आहेत भुकेलेले? लोक का आहेत निःशब्द?. ' कवी सामान्य जनतेत संवाद करणारे नवीन आशय रूप गदरने तयार केले. तेलंगणा संघर्षातल्या (१९४६-५१) प्रजा कला मंडली (इप्टा) च्या सांस्कृतिक आंदोलन कार्यकत्यांनी लोककलेद्वारे जागृती केली होती. गदरने या लोकचालींना नवीन लयबध्दता आणली. गीतांना संगीताचा लयीसोबतच नृत्याविष्कार घडवून आणला, पुढे गदरने ओगुकथा विकसित केली. नक्षलबारीची गाणी, इंद्रवेली, कारमचेडू, श्रीकाकुलम मधील जनसंग्रामावरील विविध बॅले निर्माण केले. भूमि भावतम्, कार्मिक विजयम् जगतियाल संघर्षावर आधारित बॅले इ. विपुल काव्यनाटय आविष्कार निर्माण केले. ज्याला लोकांनी उत्स्फुर्तपणे उचलून धरले. या अभिनव जनकाव्य नृत्याने प्रचंड वादळ निर्माण केले. सर्वत्र गाजत असलेले जंगलाच्या गर्भातील जंग की पुकार कष्टकरी जनतेच्या संस्कृतीने दणाणून सोडले आहे. याप्रकारे जन नाट्य मंडलोने तुफानाचे रुप घेतले.

"गाण्यांनी धरलाय नेम, जीवनाच्या ह्या कातळावर, कसा राहील कोण तटस्थ?
 तुम्ही आहात माझे मित्र किंवा शत्रू, माझ्या संघर्षात, गाणं झालंय एक हत्यार...'

दडपणूक १९७५ मध्ये गुंटूर जिल्ह्यात रंडीकल युथ लिग'च्या स्थापना अधिवेशनाचा प्रचार करतांना पोलिसांनी मंडलीच्या कलावंतांना अटक केली. गदरही अनेक दिवस तुरुगांत होते. तेथे त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. आणीबाणीच्या याच काळात पोलीस चकमकीत त्यांचे अनेक सहकारी मारले गेले. 'माझे ध्वनी ठरविण्यात आलेत गुन्हे, माझे विचार ठरविण्यात आलेत अराजक, कारण मी त्यांच्या गाण्यात मिसळले नाहीत सूर, मी झालो नाही त्यांच्या पालखीचा भोई.

या यातना भोगत असतानाच पुन्हा जोमाने प्रतिकार करण्याची जमिनदारीच्या शोषणास नोकरशाही, दलाल भांडवलदारांना उध्वस्त करण्याची प्रेरणा बळकट झाली. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले. आणीबाणीच्या काळात ते म्हेस विकणाऱ्याच्या वेषात कावड घेऊन फिरत असत, व जनतेमध्ये कार्यक्रम देत असत. कॅनरा बँकेची नोकरी सोडून १९८० मध्ये स्थापित 'पीपल्स वॉर' या भूमिगत क्रांतिकारक पक्षाशी निगडीत क्रांतिकारी संस्कृतीची निर्मिती व प्रचार-प्रसार करणाऱ्या 'जन नाट्य मंडली' च्या कार्यात गदरने स्वतःला झोकून दिले. या पक्षाने दलित श्रमिकांना संघटित करून त्यांच्यावरील अन्याय-अत्याचार व लुटीविरूद्ध मागील ३५ वर्षांपासून घनघोर लोकयुद्ध पुकारले आहे. त्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी आपली लाख मोलाची जिंदगी कुर्बान केली. या मोबदल्यात या पक्षाने जनतेकडे कधीही मतांचा जोगवा मागीतला नाही. गदर याच पक्षाचा सांस्कृतिक आघाडीवरील बिनीचा योद्धा आहे आणि याच विचारांचा आणि मूल्यांचा प्रचार ते आपल्या गीतातून नाट्यातून करित आहेत.

नक्षलवादी क्रांतिचे प्रणेते कॉ. चारू मजुमदार यांनी सांगितल्यानुसार क्रांति मुख्यत्वे भूमिहीन गरिब शेतकऱ्यांच्या खांद्यावर टेकलेली आहे, या सिद्धांतानुसार चळवळीने आपला जनतळ सामाजिक- आर्थिक सर्वहारा असलेल्या दलित, आदिवासी, भूमिहीन शेतमजुरांमध्ये शोधला त्यांच्याशी ते एकरूप झाले. जमिनीच्या प्रश्नाबरोबरच जातीय अत्याचार व अस्मितेच्या प्रश्नांवर लढे उभारले. गदरने या लढाईला ये कैसी तेरी जिन्दगी दलित मेरे भाई, गुलाम तेरी जिन्दगी दलित मेरे भाई. या गाण्यातून व्यक्त केले. 

तसेच १५ ऑगस्ट १९९७ रोजी रमाबाई नगरातील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या डॉ. आंबेडकर भवनात झालेल्या कार्यक्रमात बोलो रे जयभीम, बोलो रे लाल सलाम! हे गाणं गाऊन गदरने क्रांतिकारक चळवळ व आंबेडकरी चळवळीची सांधेजोड करण्याचा संदेश दिला.

नव्या क्रांतिकारी जनतेच्या चळवळीचा संदेशही त्याच समाजपरंपरेतून येतो. क्रांतिकारी जनता निरक्षर आहे. शेतमजूर, महिला, लहान शेतकरी यांचे माध्यम दृश्य व मोखिकच आहेत. लोकांच्या आविष्काराची पारंपारिक माध्यमे शोधून त्याला क्रांतिकारी रूप देण्याची परंपरा इथल्या लोकचळवळीची राहिली आहे. सुब्बाराव पाणीग्रही, चेरा बंडा राजू, यांच्यासह अनेक दलित अदिवासी, शेतमजूर अन्य शोषित हे कवी गीतकार म्हणून पुढे आले. 'पत्री पाडा' (काम व गाणी) हा बीजमंत्र होता. गाणे, साहित्य, हा सामुहिक कामाचा, उत्पादनाचा आविष्कार आहे. गीत, नृत्य, भाषा या सर्व उत्पादन प्रक्रियेतल्या सामुहिक सहभागाची परिणती आहे, हो जननाटव मंडलीची धारणा आहे. साहित्य, आविष्कार हे चळवळ व संघर्षाचा अभिन्न भाग आहे. संघर्ष व लोकजीवनातून गीत नाट्य जन्माला येते. श्रमिकांचा तो सहज उद्गार असतो. जननाट्य मंडलीतली तरूण मुले गावामध्ये, दलित- श्रमिकांमध्ये गेली. त्यांच्याशी एकरूप झालीत. त्यांच्या कला-संगीताचा व परिस्थितीचा अभ्यास केला. पांरपारिक कलेत क्रांतिकारी आशय घालून रूपांतरित केले आणि नंतर ते जनतेच्या जीवनसंघर्षात आपली कला घेऊन सहभागी झाले. आंध्रप्रदेशातल्या प्रत्येक गावात असा गाणारा जत्था गेला. गदरही या जत्थ्यामध्ये सामील झाले.

जो माणुस जमिनदारासमोर चपला घालून जायला घाबरायचा तोच माणुस आज त्याच जमिनदाराची जालीम व्यवस्था उलथून टाक्याची भाषा करू लागला. या बदलामुळे व्यवस्थेला हादरे बसू लागले होते म्हणूनच पुढे एन.टी. रामारावला नक्षलवाद्यांची लोकप्रियता निवडणूकीत कॅश करण्यासाठी "नक्सलाइटलु देशभक्तलु" च्या घोषणा द्याव्या लागल्या. पण सत्तेत येताच त्याच रामारावने नक्षलवाद्यांवर क्रूर दडपणूक सुरू केली. या काळात गदरने देशव्यापी मोहिमा राबवून आंध्रप्रदेशातील सरकारी आतंकवादाचा बुरखा फाडण्याचे कार्य केले. या भूमिगत काळात गदर कोळ्यांच्या वेषात राहत असत. याच कालावधीत त्यांनी जननाट्य मंडलीचे अनेक प्रशिक्षण शिबीरं चालविली. या दरम्यान त्यांना रामनगर षडयंत्रामध्ये आरोपी म्हणून गोवण्यात आले. परंतू गदर पोलिसांच्या हाती न लागता भूमिगत राहून सक्रिय राहिले. १९९० मध्ये चेन्ना रेड्डीच्या काँग्रेस सरकारने पीपल्स वॉर पक्षावरची बंदी उठवली. जननाटय मंडलीने मोठे कार्यक्रम लावले. गदर हे पत्नी विमला, दोन मुली वेत्रला (चाँदणी) व सूर्यकिरण आणि मुलगा चन्द्रकिरण या तीन मुलांसोबत हैद्राबादला एका जाहीर समारंभात प्रकटले, तेव्हा त्यांना बघण्यासाठी तीन लाख लोकांनी एकच गर्दी केली होती.

वारंगलमध्ये 'रैयत कुली संघम' या शेतकरी-शेतमजूर संघटनेच्या तिसऱ्या अधिवेशनात दहा लाख लोकांच्या विराट मोर्च्यात व त्यानंतर झालेल्या सभेत गदरने आपल्या गीतांनी व नृत्यांनी अशी काही वातावरण निर्मिती केली होती की, ज्यामध्ये बाजारू हॉलिवूड बॉलीवूडचं नामोनिशाण पूर्णपणे मिटून गेलं होतं, कोणी मायकल जॅक्सन, सामंता फॉक्स असो वा गायक-संगीतकार हिमेश रेशमियां असो किंवा देशातीलच कोणताही मोठा बॉलीवुड स्टॉर असो, सगळेच आजच्या या काळा (हवाला) पैसा व विकृत बाजारू संस्कृतीच्या अंधाऱ्या दुनियेत एखाद्या झंझावाताप्रमाणे येतात व अदृश्य होऊन जातात. कारण त्यांच्या कार्यक्रमांना विषयाचा आधारच नसतो. त्यामुळे ते लवकरच विस्मृतीच्या गर्तेत जातात. उलट जनतेचा कलाकार जनतेला आंदोलित करता-करता व जनतेकडून स्वतः ही आंदोलित होता-होता जनतेची ज्योत असतो. गदर अशीच एक पेटती मशाल आहे, म्हणूनच गदर जेव्हा तेलंगणामध्ये कार्यक्रम करण्यासाठी जातो तेव्हा त्याला शहरांकडे पळविले जाते.

१९९५ मध्ये आंध्र मध्ये तुलगू देसम सरकारने नक्षलवादी चळवळीवर पुन्हा बंदी लादली. अनेक ठिकाणी सभा घेण्यावर बंदी घालण्यात आली, तेव्हा गदर आणि मंडळींनी पोलीस ठाण्यावरच गाणी गायला सुरूवात केली. मग तेथेही पोलिसांनी दडपणूक सुरू केली. याच कालावधीत गदरने पुन्हा देशव्यापी मोहीमा सुरू केल्या. मध्यप्रदेशातील मोहिमेत एके ठिकाणी एका पोलीस अधिकाऱ्याने (एस.पी.) ने गदरला म्हटलं, "गदरजी, जर आपण एक वर्षपर्यंत याचप्रमाणे गाणी म्हटलीत, तर मध्यप्रदेश आमच्या हातून निघून जाईल. म्हणून मी हात जोडतो, कृपया आपण येथून परत जावं. " तेथून जबरीने त्यांना आंध्रप्रदेशात पाठविण्यात आलं.

महाराष्ट्रातही मुंबई, भिवंडी येथे पोलीसी हस्तक्षेपातच कार्यक्रम होऊ शकला. नागपूरात १९९२ साली उच्च न्यायालयाच्या आदेशाला डावलून पोलिसांनी जनतेवर व कलावंतांवर लाठ्या चालविल्या, गदर व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून आंध्रप्रदेशात पाठविण्यात आले. असाच अनुभव त्यांना कर्नाटकातही आला. २००५ साली धुळे येथे विद्रोहीच्या साहित्य-संस्कृती संमेलनाचे उदघाटक म्हणून त्यांना निमंत्रित केले असता तेथील पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर बंदी लादण्याचा प्रयत्न केला होता.

आज आपल्या विचारधारेने गाणी तेवढ्याच जोशात व ओजस्वी आवाजात म्हणतात. कष्टकऱ्यांचं जीवन संघर्ष जाणीवेने सङ्ग जनता व जनविरोधी शक्तीविरुध्दच्या लढाईत जनतेचा विजय, हीच त्यांच्या गाण्यांची विषयभूमी आहे, ज्यास ते स्पष्ट, सोप्या व साध्या पध्दतीने सादर करतात. यामुळेच गदर व जिन नाट्य मंडली' स जनतेने आपलं म्हणून स्विकारलं आहे. मागील पस्तीस वर्षाच्या काळात दहा लाखाहून अधिक प्रकाशनांची विक्री झालेली आहे. हिंदीतही 'जंग की पुकार' पुस्तक, व अनेक कॅसेट, सी.डी. प्रकाशित करण्यात आली. व्हिडियो- ऑडियो कॅसेट व सी.डी. ची विक्री ही या काळात वाढलेली आहे.

जस जसे लोकं जागृत होत आहेत, संघर्ष तीव्र होत आहेत. त्याचप्रमाणे गावा-जंगलातील निरक्षर-गरीब जनता स्वतःच गाणी लिहित आहे, गातही आहे. जनता कुण्या गदरसाठी थांबत नसते, ती आपलं साहित्य स्वतः रचत आहे. दबलेल्या श्रमिकांच्या कंठातून आवाज पाझरवीत आणि उरात अभंग आवेश निर्माण करीत खेडी, गाव, वस्त्या जागवत, क्रांतीसूक्ते वाटत हे गदर कवी हिंडत असतात. शेकडो वर्षापासून लाचारीने लवलेल्या मानांना ते उन्नत करीत जात आहेत. स्वाभिमानाची ठिणगी पेरत गात आहेत. अलिकडे अशा गदर कवींच्या भूमिगत संघटना बांधल्या जात आहेत. सावकारांच्या दिवाणखान्यातला न्यायनिवाडा आता गावकऱ्यांच्या कट्ट्यावर येत आहे. जमिन नसलेले गरीब कष्टकरी एकत्र येऊन भुस्वामीच्या पडिक जमिनी घेत आहेत. तेलंगनातील खेळी रणभूमि होऊन धगधगत आहेत. हे सारे सामाजिक परिवर्तन म्हणजे गदर गाण्यांची फलश्रुती म्हणायला काही हरकत नाही. अर्थात त्यांना याची खुप किंमत मोजावी लागली. अनेकांना प्राणार्पण करावे लागले. या प्रक्रियेला सरकार समजत नाही, म्हणून मग ती गदरवर बंदुकीच्या गोळ्या झाडते. परंतु आज आंध्रप्रदेशात शेकडो गदर जन्मास आलेले आहेत. तेव्हा सरकार कोणा-कोणाचा आवाज गोळ्यांनी दाबेल? शिवाय गदर पुरस्कार देऊनही खरीदले जाऊ शकत नाही, हे दहा वर्षापूर्वी मूळ गदरने आंध्र सरकारने दिलेला 'नंदी पुरस्कार' नाकारून साबीत केलेले आहे. आंध्रप्रदेशातील जनतेची भुजा झालेली 'जन नाट्य मंडली' च्या विरोधात आंध्रच्या पोलीसांनी मागील दहा वर्षेपर्यंत 'भारती' नावाने नाटकं केलीत, परंतु जनतेने त्यांच्या या पगारी सरकारी व्यवस्था समर्थक कलेला कलाकारांना साफ झिडकारलं.

चीन क्रांतीचे शिल्पकार कॉ. माओ यांनी म्हटले आहे. 'क्रांती करण्यासाठी आमच्याजवळ दोन शस्त्रं असली पाहिजेत, एक बन्दूक व दुसरं साहित्य आणि संस्कृती.' गदरने गीतांना शस्त्र मानलं, गीतं मनोरंजनासाठी नसून संघर्षासाठी असतात, म्हणून गदर आपल्या गीतांच्या माध्यमातून शोषण अन्याय अत्याचारांविरुध्द लढण्याची गोष्ट करतो. म्हणूनच शासन गदरला व त्यांच्या शस्त्ररूपी गीतांना एवढी घाबरते.

जी गाणी जनतेस क्रांतिकारी बनवितात, तीच गाणी क्रांतिकारी असतात. असंही गदरचं म्हणणं आहे. त्यांच्या गीतांनी हे सिध्द केलेलं आहे. म्हणूनच 'गदर', 'जननाट्य मंडली' व 'पीपल्स वॉर' आता भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) ही सगळी नावे परस्पर एकरूप झालेली आहेत. "जर आन्दोलनेच नसतील तर नृत्य-गाण्याला काहीच अर्थ नसतो. समाजात क्रांतिकारक बदल फक्त सांस्कृतिक आन्दोलनाने होणार नाही, तर राजनैतिक आंदोलनातूनच सांस्कृतिक आंदोलन जन्म घेतो. शिवाय सांस्कृतिक आंदोलन ह्री यशस्वी राजकीय संघर्षाची आधारभूमी तयार करीत असतात." गदरच्या या मतानुसार नक्षलवादी आंदोलन व सांस्कृतिक आंदोलन यांचे परस्पर संबंध, भूमिका याबाबत गदर खूपच स्पष्ट असल्याचे दिसतात. म्हणूनच जेव्हा त्यांच्यावर पक्षातर्फे काही आरोप लावण्यात आले व त्यामुळे काही काळ त्यांना निलंबित व्हावे लागले होते, तेव्हा त्यांनी आपल्यावरील आरोप सार्वजनिकरित्या मान्य केले होते व त्याबाबत आत्मटीका करून त्यांनी पुन्हा पक्षामध्ये आपले स्थान बनविले होते. 

कारण त्यांना हे पूर्णपणे उमगलं होतं की कोणी कितीही मोठी व्यक्ति वा नेता असो, पक्ष व चळवळीहून कोणीही मोठा नसतो, सामुहिक चळवळीतूनच माणसाची जडणघडण होऊन नायक निर्माण होतात. चळवळी शिवाय व्यक्तीचा विकास इतक्या मोठ्या पातळीवर होऊच शकत नाही. म्हणून जेव्हा अशी व्यक्ति पक्षापासून तुटते तेव्हा १९९५ मध्ये नक्षलवादी चळवळीवर बंदी लादल्यानंतर आंध्रप्रदेशात खोट्या चकमकीच्या नावाखाली क्रांतिकारक कार्यकत्यांची हत्या करणे आम घटना झालेली होती. "कॉल इट अ मॅड डॉग बिफोर यू किल".- मारायच्या आधी कुत्रं पिसाळलंय असा शिका मारा, तुम्हाला कोणीच विचारणार नाही. नक्षलवादी चळवळीबद्दलही सरकारने हेच धोरण वापरलं. गुंड पोलिसांचा दहशतवाद संपूर्ण राज्यात असा पसरला की लोकं आपल्या भाऊ-मुलांचे प्रेत ओळखण्यासाठीसुद्धा जायला घाबरू लागले होते. तेव्हा खोट्या चकमकीत शहीद झालेल्या मृतदेहांच्या 'कफन-दफन' ची जबाबदारी घेण्यासाठी गदर यांच्या नेतृत्वात 'मृतदेह स्वाधीन समिती' बनली. त्यांनी अनेक खोट्या चकमकींचा पर्दाफाश केला. या विषयावर जनआंदोलन तापू लागलं. प्रेतयात्रांमध्ये हजारो लोकं सामील होऊ लागली. त्याला सरकारविरोधी जनांदोलनाचं रूप येऊ लागलं. गदरच्या सक्रियतेमुळे आंध्रप्रदेशच्या शासनाला 'खोट्या चकमकीच्या' नावाखाली हत्याकांडाचं खूनी चक्र सुरू ठेवणं कठीण होऊ लागलं, शिवाय जनआंदोलनांमुळे अनेक घटनेत शासन तोंडघाशी पडलं. म्हणून मग गदरला मार्गातून हटविण्याचं षडयंत्र रचलं गेलं, व 'नक्सल विरोधी ग्रे हाऊंडस्' या सरकारी गुंड,  पोलिसांनी ६ एप्रिल १९९७ रोजी गदर यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शरीरात पाच गोळ्या घुसल्या. आंध्रप्रदेश सहित देशातील अनेक महानगरं, शहरं, गावं गदरवर झालेल्या हल्ल्यांविरुध्द पेटून उठली, ठिकठिकाणाहून निषेधाचा आवाज उठला. त्यामुळे पुन्हा एकदा आंध्रशासन व देशाची सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात उभी झाली. आजवर एकही मारेकरी पकडला जाऊ शकला नाही.

"कसली लोकशाही? ४०-५० खासदारांचा नेता ज्या देशाचा प्रधानमंत्री बनतो, जेथे सरकार पोलिसांच्या गोळ्यांच्या बळावर चालते, ज्या देशात पोस्टर्स लावण्यापासून तर सभा घेण्यापर्यंतचे सर्व निर्णय पोलीस घेते, आंध्रप्रदेशातील ४० गुरिल्ले धरण्यासाठी १० हजार पोलीस पाठविले जातात, जेथे आडवाणीस शस्त्रानिशी रथ यात्रा काढण्याची पूर्णपणे सूट दिली जाते, मग तेथे गायक व लेखकांवरच बन्दी का? ज्या देशात दर क्षणाला लोकशाहीचा मुडदा पाडला जातो, त्या देशाला लोकशाही देश कसं म्हणावं?" अशी गदरची अनुभवातून आलेली ठाम मतं आहेत. म्हणूनच स्वातंत्र्याच्या पन्नाशीनंतरही गदर हे गीत म्हणतो-
 "ये आजादी झूठी है लुटेरों की चांदी है लूट को मिटाना है साथीयों, जुल्म को मिटाना है साथीयों।"

जोपर्यंत शोषण अन्याय-अत्याचार व लुटीचं राज्य सुरू राहील, तोपर्यंत गदर गात राहील... गात राहील... आणि तो पर्यंत गदर गाणी जिवंत राहतील!

सुधीर ढवळे  (१ जानेवारी २००७)





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com