Top Post Ad

अन् कोर्ट नाक्यावर अवतरली पंढरी

 


 वारी समतेची... वारी मानवतेची, या संकल्पनेवर आधारित वैष्णवांचा मेळा आज ठाण्याच्या संविधान चौकात पार पडला. राज्याच्या विविध भागातून वारकऱ्यांची प्रभुअळी या ठिकाणी जमा झाल्याने ठाणे नगरीमध्ये पंढरी अवतरल्याचे चित्र दिसून आले.  ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले आणि मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी या समतामूलक प्रबोधन वारीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ठाणे, पुणे, सोलापूर, रायगड आदी जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कमला एकादशीचे औचित्य साधून ठाणे शहरातील कोर्ट नाका येथील संविधान चौकामध्ये वारी समतेची ... वारी मानवतेची या सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजीमहाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम या गुरूशिष्याच्या भेटीचा जीवंत देखावा चितारण्यात आला होता. तसेच, संतांचे अभंग, महापुरुषांचे विचार यांचे फलक घेतलेले वारकरी सहभागी झाले होते. अश्व रिंगण हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. आषाढी- कार्तिकी वारीत ज्या प्रमाणे अश्व रिंगण होते, त्याच पद्धतीने या ठिकाणी अश्व रिंगण करण्यात आले. विशेष म्हणजे या अश्वावर छत्रपती शिवाजीमहाराज यांची वेशभूषा केलेला तरूण आरूढ झाला होता. तसेच आळंदी येथून आलेली संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांची पालखी देखील सहभागी झाली होती. या अश्व रिंगण सोहळ्यात सुमारे पाचशे वारकरी सहभागी झाले होते. त्यामध्ये महिला व बाल वारकऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. या वारकऱ्यांनी नंतर कोर्ट नाका ते टाऊन हाॅल अशी दिंडी काढून विठूरायाला वंदन केले. टाऊन हॉल येथे ज्येष्ठ निरुपणकार आणि संत साहित्य अभ्यासक श्यामसुंदर सोन्नर आणि ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी प्रवचन केले. 

या वारी सोहळ्याचे आयोजक प्रफुल वाघोले यांनी या सोहळ्याची संकल्पना सांगताना संतांनी मानवतेचा विचार दिला होता. त्याचीच री ओढत महापुरूषांनीही सकल मानव जातीच्या कल्याणाचा विचार मांडला. त्याच विचारांचा जागर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाणे शहरात प्रथमच अश्व रिंगण पार पडले, असे सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com