Top Post Ad

भारतीयांचा अभिमान... जी-२० शिखर परिषद?

   


नवी दिल्लीमध्ये जी-२० शिखर परिषदेकरिता आलेल्या
 विदेशी पाहुण्यांना भारतातली गरीबी दिसू नये, यासाठी केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने विशेष स्तरांवर प्रयत्न केले. यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी  केंद्र सरकार दिल्लीतील प्राण्यांना आणि लोकांना लपवत आहे. परंतु, विदेशी पाहुण्यांपासून सत्य लपवण्याची गरज नाही, अशा शब्दांत केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली. तसेच जी-20 साठी करण्यात आलेल्या व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय बैठकीनंतर मीडियाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याची परवानगी दिली नाही, असा दावा काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी केला.

केंद्र सरकारने दिल्लीतील वसंत विहारमधील झोपडपट्टी दिसू नये यासाठी चादरीची मदत घेतली. या झोपडयांना हिरव्या चादरीने झाकले आहे. असा एक व्हिडीओ काँग्रेसकडून एक्स वर शेअर करण्यात आला. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय नेत्यांचे आगमन होण्याआधी अनेक ठिकाणी श्वानांना निर्दयीपणे फरफटत नेले व पिंजऱ्यात टाकून दिले. या श्वानांना जेवण आणि पाणी दिले जात नाही. दिल्लीतील अनेक भागात झोपडयांना झाकले आहे. काही झोपडयांना उद्ध्वस्त करण्यात आले आहे, यामुळे अनेक लोक बेघर झाले आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. दिल्लीतील अनेक रस्त्यांवर नागरिकांना येण्या जाण्यास बंदी घालण्यात आल्याने भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, असा दावा करीत कॉंग्रेसने यासंबंधीचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

याशिवाय करोडो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या शामियानात देखील पाणी शिरल्याने सर्वत्र तारांबळ उडाली होती. 
----------------------------

दिल्लीत G 20 परिषद  भारतासाठी हे नक्कीच कौतुकास्पद. सर्व नेते आपल्या पंतप्रधानांशी व्यक्तिगत बोलताना देश म्हणून नक्कीच अभिमान. पण हा गौरव वाटताना या परिषदेच्या खर्चाचे आकडे बघितले तेव्हा खूप अस्वस्थता आली. या परिषदेवर आपण ४२५५ कोटी रुपये फक्त सुशोभन करण्यासाठी खर्च केला आहे. आतमधील परिषद खर्च, जेवण हा खर्च वेगळाच. आत जेवणासाठी ५०० पदार्थ. जेवणासाठी चांदीची, सोन्याचा वर्ख असलेली ताटे खास कुशल कारागिर बोलावून बनवली. या ५०० पदार्थ बनविण्यासाठी २५०० लोक. राजधानीत सर्वत्र सजावट करून कारंजी ...
भारतासारख्या गरीब असलेल्या देशात हे जरा अतिच होतं. त्यामुळे ते जास्त वेदनादायक आहे. एकूण बजेटच्या ही रक्कम अतिशय छोटी आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रप्रमुख आल्याने हे करायला हवे. असे युक्तिवाद केले जातील पण इतर देशांनी त्यांच्याकडे परिषद घेतली तेव्हा इतका खर्च केला नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. 

अर्जेंटिना ने ११ कोटी डॉलर्स खर्च केला होता.
जपान ने ३२ कोटी डॉलर्स खर्च केला होता
इंडोेशियाने ३.३ कोटी डॉलर्स खर्च केला होता
जर्मनीने ९.४ कोटी डॉलर्स खर्च केला होता
आणि भारत ५०   कोटी डॉलर्स खर्च. याचे समर्थन कसे करायचे ?

जर्मनी आपल्यापेक्षा श्रीमंत देश अल्प खर्च करतो ?  जर्मनीच्या ६ पट खर्च आणि विशेष म्हणजे जर्मनीचे दरडोई उत्पन्न ५९००० आहे तर भारताचे आहे फक्त ७०००. इतक्या गरीब देशाने असे का वागावे ? 

इतका खर्च करणाऱ्या देशावर कर्ज १५५ लाख कोटी आहे आणि त्यावर आपण ९.२८ लाख कोटी व्याज भरत आहोत. कर्जबाजारी देश सेंट्रल व्हिस्ता बांधतो आहे आणि अशा परिषदावर इतका खर्च करतो आहे..पुन्हा दिल्लीत गरीब दिसू नयेत म्हणून काही ठिकाणी मोठे पडदे लावले  तर काही ठिकाणी बुलडोझरने झोपड्या पाडल्या.

अशावेळी हमखास एशियाडपासून राष्ट्रकुलमध्ये झालेला काँग्रेस काळातला खर्च भक्त सांगतील पण तुलना केली तरी हा अतिरेक आहे .नुसत्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात १०० कोटी या सरकारने उधळले होते यावरून कल्पना यावी.  केवळ हे सरकारच नव्हे तर सर्व पक्ष सरकारे अशीच वागत आहेत. सर्व पक्षांच्या बैठका या पंचतारांकित हॉटेलात होतात. I.N.D.I.A. ची मुंबईत झालेली बैठक अशीच खूप खर्चिक होती. मुख्यमंत्री राज्यपाल ज्या कार्यक्रमात जातात तिथेही हेच अनुकरण होत असते. राज्यपाल भवनात तर मनोरंजन कार्यक्रमात खूप उधळपट्टी होते. Event मॅनेजमेंट नावाचे ठेकेदार निर्माण झाल्यापासून प्रत्येक कार्यक्रमावर अशीच उधळपट्टी सुरू असते....हे करताना आपण गरीब माणसांचे प्रतिनिधी आहोत याची जाणीव नसते..

मुळात या सर्व नेत्यांना आपण कोणाचे प्रतिनिधी आहोत याचेच भान उरले नाही. एका भुकेकंगाल
देशातील गरीब माणसांचा देश आहे. त्यातील गरीब माणसांची घरे कशी आहेत. त्यांची पाडे, पाले कशी आहेत, रस्त्यावर राहणारे लोक कसे राहतात ? आणि त्याच देशात आपण फक्त २७०० कोटीचा मंडप २ दिवसासाठी उभारतो आहोत...? याची काहीच टोचणी लागत नसेल ? दिल्ली आणि उरलेला भारत याचे काहीच कनेक्शन नाही का ?  प्रश्न या रकमेचा नाही तर मानसिकतेचा आहे.आपण कोणाचे प्रतिनिधी आहोत हे विसरण्याचा आहे.
आणि विसंगती म्हणजे इतकी उधळपट्टी करून या सर्व नेत्यांना राजघाटावर नेले जाणार आहे.गांधींना सरकार वंदन करणार आहे आणि आपले सरकार गांधीच्या विचारांवर कशी वाटचाल करते आहे हे सांगणार आहे...

पण याच गांधीनी साधेपणा या देशातील दारिद्र्याशी जोडला. देशातील लोकांना घालायला कपडे नाहीत म्हणून पंचा घातला.  बनारस येथे ऐकायला आलेले श्रीमंत श्रोते सोन्याचे दागिने घालून आले तर गांधीनी यांच्या त्या प्रसिद्ध भाषणात तुम्ही या गरीब देशातील भुकेकंगाल माणसांच्या देशात राहत आहात याचे भान ठेवा अशी त्या श्रीमंतांची कानउघाडणी केली होती आणि त्याच देशात ही उधळपट्टी सुरू आहे. ते भान पूर्णपणे विसरले आहे ...
रकमेपेक्षा आपण कोणाचे प्रतिनिधी आहोत ? आपण कोणत्या देशात हे करतो आहोत ? याचे भान नसणे हे जास्त व्यथित करणारे आहे ...

हेरंब कुलकर्णी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com