काही दहशतवादी कृत्य करून देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व संपवायची आणि भारताला अस्थिर करण्याच्या मोठ्या कटाचा भाग वैभव राऊत आणि इतर आरोपी होते, असे एटीएसचे म्हणणे होते. त्यानुसार महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने २०१८ मध्ये वैभव राऊत आणि इतरांवर कारवाई केली होती. तसेच त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले होते. अटक करण्यात आलेले सर्वजण सनातन संस्थेचे सक्रीय सदस्य होते. सनातन संस्थेचा हेतू हिंदू राष्ट्र निर्माण करणे हा आहे. यासाठी महाराष्ट्रासह शेजारील राज्यांमध्ये गुप्तपणे दहशतवादी कृत्य करण्यासाठी टोळ्या निर्माण करणे हाही त्यांचा उद्देश होता. त्यांनी पुण्यातील सनबर्न कार्यक्रम पाश्चिमात्य सांस्कृतिक कार्यक्रम असल्याचा आरोप करत तो उथळून लावण्यासाठी बॉम्बचा साठा निर्माण केला होता. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत वैभव राऊतच्या घरातून ८ बॉम्ब आणि गोडाऊनमधून १२ बॉम्ब जप्त करण्यात आले होते. याशिवाय त्याच्याकडून एक डायरीही जप्त करण्यात आली होती. या डायरीत आरोपीचं हल्ल्याचं नियोजन आणि बॉम्ब तयार करण्याविषयीची तपशीलवार माहिती होती.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने आरोपी वैभव राऊतला जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने आरोपी ५ वर्षांपासून तुरुंगात आहे आणि खटला लवकर पूर्ण होणार नाही या आधारावर हा जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय राऊतच्या अटकेच्या आधी त्याच्याकडून बॉम्ब जप्त करण्यात आले होते असं म्हणत भारतीय पुरावा कायदा कलम २७ चाही आधार न्यायालयाने घेतला. तसेच ज्या घरातून बॉम्ब जप्त करण्यात आले ते घर आरोपीच्या वडिलांच्या नावावर होतं आणि गोडाऊनही आरोपीच्या नावावर नव्हतं. हस्तलेखन तज्ज्ञांचे मत वगळता जप्त करण्यात आलेल्या डायरीला इतर कोणताही दुजोरा नाही. असं मतही न्यायालयाने नोंदवलं आहे.
0 टिप्पण्या