महाआघाडी सरकारला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेचं गणित मांडलं. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार सत्तेत सहभागी झाले. विशेषकरून ज्यांच्यावर इ.डी.ची टांगती तलवार होती, असे सर्व आमदार मागील वर्षापासून सत्तेची फळे चाखत आहेत. मात्र हे आमदार-खासदार अजूनही ईडीच्या रडारवरच आहेत. केसेस मागे घेण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने तगादा लावत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपशी घरोबा केल्यानंतर सत्तेत गेल्याने चौकशी थांबली. मात्र, गुन्हे अजूनही कायम आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी, अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसुळ, आमदार प्रताप सरनाईक, मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधवांसह अनेक नेते ईडीच्या चौकशीच्या फे-यात अडकले आहेत. शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्तेत जाऊन एक वर्ष उलटून गेले. मात्र, या नेत्यांवरील गुन्हे अजूनही कायम असल्यामुळे भविष्यात या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.
ईडीच्या कारवाई विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती , अन्य एका प्रकरणासोबत सरनाईकांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश ईडिला देण्यात आले. मनी लाँड्रिंगच्या संशयावरून दिल्लीतून आलेल्या विशेष पथकाने प्रताप सरनाईक यांच्या घरासह १० ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशीही केली होती. ईडीने केलेल्या तपासानुसार ईडी कोठडी अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले त्यांच्यावर ईडी कोठडी अहवालात गंभीर आरोप करण्यात आले. एमएमआरडीए मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला.
अमित चंडोळे याला अटक केल्यानंतर त्याची ईडी कोठडी मिळावी याकरता ईडीने त्यांच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले. ईडीकडून तपास केला जात असलेल्या टॉप्स सिक्युरिटी प्रकरणातील तक्रारदार रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल केला आहे. रमेश अय्यर यांच्यावर टॉप्स सिक्युरिटीमध्ये आर्थिक फसवणुकीसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल केला. टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांनी रमेश अय्यर यांच्या विरुद्ध तक्रार केली. रमेश अय्यर यांनी आर्थिक घोटाळा केला, ज्यामुळे टॉप्स कंपनीला मोठे नुकसान झाल्याचा आरोप मालकाकडून करण्यात आला आहे. असा सर्व प्रकार सुरु असतानाच महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिवसेनेला खिंडार पाडून चौकशीच्या फेऱ्यात असलेले सर्व लोकप्रतिनिधी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. मात्र आज वर्षाहून अधिक कालावधी लोटूनही फाईली केवळ टेबलावरून कपाटात गेल्या आहेत. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी अस्वस्थ झाले आहेत.
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे देशभरात विरोधी नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचे दिसतेय. याविरोधात विरोधी पक्ष सातत्याने आवाजही उठवत आहे. फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या चौकशीसाठी आणि त्यांना गोत्यात आणण्यासाठी सरकार तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. आता सत्ताधारी पक्षातील आमदार बच्चू कडू यांनी तपास यंत्रणांच्या कारभारावर बोट ठेवले आहे. ईडीच्या कारवायांबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी आता भाजपसोबत आहे. पण माझा सरळ प्रश्न आहे की ईडी भाजपच्या एकाही माणसावर का लागली नाही याचे त्यांनी उत्तर द्यावे. सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतोय की ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपच्या नेत्यांची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागेही ईडी चौकशी लागली होती, पण ते आता सत्तेत बसले आहेत,.
0 टिप्पण्या