गृहिणी ते शिवम मसाल्याची उद्योजिका - वैशाली घाडीगावकर यांचा रोमहर्षक प्रवास
सिंधुदुर्ग - यशस्वी उद्योजक कोणाला म्हणावे ? ज्याच्याकडे व्यवसायाची संधी ओळखण्याची, जोखीम पत्करण्याची कुवत असते. स्वबळावर आणि मेहनतीच्या जोरावर एक गृहिणी ते शिवम मसाल्याच्या यशस्वी उद्योजक हा वैशाली घाडीगावकरांचा प्रवास हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी देखील आहे. केवळ प्रेरणादायीच नव्हे तर आज आपल्याप्रमाणेच अनेकांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे. सिंधुदुर्गला एका छोट्या गावात राहणाऱ्या वैशाली घाडीगावकर या उद्योजक बनू इ्च्छिणाऱ्या अनेक महिलांसाठी आदर्श निर्माण करत आहेत.
वैशाली घाडीगावकरांचे तसे चौकोनी कुटुंब. ते त्यांचे पती, मुलगा आणि सासूसह मालवण येतील नांदोसे या छोट्याश्या गावी राहतात. वैशाली यांचा मुलगा सध्या बारावीत शिकतो आहे. नुसते घरी बसून राहणे त्यांना पटणारे नव्हते. स्वयंपाकाची वैशालींना तशी विशेष आवड. स्वयंपाकाला भाजीसाठी लागणारे वाटण तसेच मसाले त्या घरीच करायच्या. घरी येणारे नातेवाईक तसेच मैत्रिणींनी त्यांच्या या कौशल्याची तारीफ केली.
याचवेळेस वैशाली यांना घरच्यांनी युवा परिवर्तनच्या मसाले बनवण्याच्या कोर्सविषयी सांगितले. तेथे त्यांनी मसाला बनवायचे २७ प्रकार शिकून घेतले. यानंतर वैशाली घाडीगावकर यांनी मसाले बनवण्यासाठी आवश्यक अशी सामग्री घेतली. आता त्यांनी शिवम मसाले नावाचा उद्योग सुरु केला आहे. कुटुंबाच्या सहकार्याने त्या सहा प्रकारच्या मसाल्यांची विक्री करतात. गावात त्यांनी आपले छोटेसे दुकानही थाटले आहे. आता त्यामुळे वैशाली घाडीगावकर दर महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमावतात. गावातील पाच मुलींना आज शिवम मसाल्यामुळे रोजगार मिळाला आहे. ''मी आधी घरच्या घरी मसाले बनवायचे. आता माझ्या आवडीचे रुपांतर उद्योगात झाले आहे. यामुळे मी आता कुटुंबालाही आर्थिकरित्या मदत करु शकते आणि गावातील माझ्यासारख्या गृहिणींना सुध्दा स्वावलंबी बनवले असल्याचे वैशाली घाडीगावकर सांगतात.
0 टिप्पण्या