महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराजवळच असणाऱ्या सोपारा या प्राचीन स्थळाला जपानी उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाने भेट दिली. सोपारा हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मौर्य साम्राज्याच्या प्रांतिक राजधानीचे ते ठिकाण होते. महान भारतीय सम्राट अशोक यांनी येथे एका स्तूपाची निर्मिती केली होती. दुरावस्थेत का होईना परंतु आजही तो स्तूप अस्तित्वात आहे. तथागत भगवान बुद्धाचे एक भिक्षापात्रही सोपारा येथे सापडले. सोपारा या शहराला बौद्धधम्माचे प्रवेशद्वार म्हणावयास हरकत नाही. भगवान बुद्धाच्या हयातीतच बौद्धधम्माने महाराष्ट्रात प्रवेश केला, आणि भगवान बुद्धांच्या हयातीतच महाराष्ट्रातील पहिल बौद्ध विहार सोपारा येथे बांधण्यात आल. सम्राट अशोकांची प्रांतिक राजधानी सोपारा येथे होती.
असे म्हणतात, की भगवान बुद्धांनी स्वतः सोपारा येथे भेट दिली होती. अशा या महान प्राचीन ऐतिहासिक ठिकाणाला जपानी उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली. या ऐतिहासिक ठिकाणाची दुरावस्था पाहून तेथे फार मोठ्या सुधारणा अथवा बदल करण्याचा संकल्प या शिष्ट मंडळाने केला आहे. सम्राट अशोकांनी बांधलेल्या आणि दुरावस्थेत असलेल्या स्तूपाचा जीर्णोद्धार या मंडळाने ठरविले आहे. या शिवाय या प्राचीन स्तूपाजवळच आणखी एक भव्य स्तूप नव्याने बांधण्यात येणार आहे. या शिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक भव्य असे विपश्यना केंद्रही बांधण्याचा संकल्प जपानी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केला आहे. सोपारा येथे भेट देऊन पाहणी केल्यानंतर स्थानिक आमदार मा. हितेंद्र ठाकूर आणि स्थानिक नगरसेवक आजीव पाटील यांनी या प्रकल्पाला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सोपारा हे आजच्या घडीला एक छोटेसे शहर किंवा गाव असले तरी एके काळी ते शहर मौर्य साम्राज्याची प्रांतिक राजधानी होते. प्राचीन काळी बौद्ध धम्माचे एक प्रमुख केंद्र होते.त्याच प्रमाणे प्राचीन काळी व मध्ययुगीन काळात ते एक व्यापार-उद्योगाचे प्रमुख केंद्र व भरभराटीस आलेले बंदर होते. सोपारा हे नंतरच्या काळात मागे पडले असले तरी एके काळी ते भरभराटीचे व्यापारी केंद्र होते. देशातील फार मोठा व्यापार याच मार्गाने होत असे. सिलोनमध्ये (श्रीलंका) लिहिण्यात आलेल्या 'महावंस' या बौद्ध ग्रंथामध्ये सोपारा या प्राचीन शहराचा उल्लेख असल्याचे अभ्यासक मानतात. सोपारा हे अलिकडील प्रचलित नाव असले तरी सोपाऱ्याला प्राचीन काळी अनेक नावे असल्याचे आढळून येते. सुप्परक पट्टनम, सोपारक पट्टनम, शूर्परक, सुप्परका, सुपरा, सोपारा अशी विविध नावे आढळतात.
0 टिप्पण्या