हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या अंमबजावणीसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समित्यांनी भरारी पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी आज तत्वांचे उल्ल़ंघन करणा-यांवर धडक कारवाई केली. भरारी पथकाने 12 ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. ज्यामध्ये दोषी आढळलेल्या 102 जणांना नोटीसा देण्यात आल्या. तसेच एकूण 6 हजार 800 रुपये दंड करण्यात आला. डेब्रिज वाहून नेणाऱ्या 01 डंपर वर कारवाई करण्यात आली असून रस्त्यावरुन एकूण 16 टन माती संकलीत करण्यात आली. याशिवाय एकूण 16 वाहनांचा वापर करुन 4.41 कि.मी. रस्ते पाण्याने धुण्यात आले.
मात्र या भरारी पथकाचे सेन्ट्रल मैदान येथील पोस्ट ऑफिसच्या लगत सुरु असलेल्या बांधकामाकडे लक्ष गेले नाही. पुर्णपणे सिमेंट काँक्रीटचा रोड सध्या खोदून पुन्हा बांधण्याचे काम या ठिकाणी जोरात सुरू असून ते अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने तेथे असलेल्या कर्मचाऱ्याला वर्क ऑर्डरची विचारणा केली असता ती दाखवण्यास त्याने नकार दिला. कोणत्याही कामाची तपशीलवार माहिती कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. तसे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असतानाही या ठिकाणी कोणत्याही कामाता तपशील देण्यात आलेला नाही. आम्ही तो देणार नाही तुम्ही पालिकेच्या अधिकाऱ्याना जाऊन विचारा असा उलट जबाब येथील कंत्राटदाराचे कामगार देत आहेत.
तसेच या रोडवर असलेली पाण्याची पाईपलाईन देखील या कंत्राटदाराने फोडली आणि त्यामुळे प्रचंड पाणी वाया गेले असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र यावर पालिकेचे मुजोर अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली.
याशिवाय शासकीय विश्रामगृह शेजारी, एन.के.टी.महाविद्यालयासमोरील बाजूस असलेला फुटपाथवजा रोड मागील अनेक दिवसांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी अद्याप रस्त्याचे कोणतेही काम सुरु करण्यात आलेले नाही. आधीच या रोडवर वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यात रोड खोदून ठेवला आहे. त्यामुळे रोडवर उडणाऱ्या धूळ-मातीचा त्रास जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच शासकीय विश्रामगृहात येणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर रोडचे खोदकाम करताना शासकीय विश्रामगृहाची भिंतही फोडण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र याकडेही भरारी पथक अथवा नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांचे कोणतेही लक्ष नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
0 टिप्पण्या