डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. आपल्या संघर्षात त्यांनी विविध स्तरातील विद्वान तसेच ध्येयवादी लोकांना सोबत घेतले होते. त्यापैकी काही लोकांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली, तर काही लोक मधेच सोडून गेले. त्यांच्या ह्यातीत त्यांना विरोध करणारेही काही दलित नेते होते. ते गेल्यानंतर मात्र आपणच खरे बाबासाहेबांचे वारस असल्याचा दावा करण्यास ते विसरले नाहीत. मग जे बाबासाहेबांचे खंदे सहकारी होते त्यांनीही आपण खरे आंबेडकरवादी कसे आहोत हे सिद्ध करण्याकरिता नाना खटपटी केल्या तर त्यात आश्चर्य कसले ? बाबासाहेब हयात असेस्तोवर त्यांनी आपल्या अनुयायावर संतुलन ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. पण त्यांना अकाली मृत्यू आल्यामुळे चळवळीला जो सुसंघटीतपणा यायला पाहिजे होता तो येऊ शकला नाही. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना वाऱ्यावर सोडले नाही. आपल्या प्रकृतीच्या तक्रारीची जाणीव असल्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वप्नातील चळवळीचा आराखडा एका पत्रात सविस्तर लिहून ठेवला. ऑक्टोबर १९५६च्या विजयादशमी दिनी त्यांनी आपल्या अनुयायांना बुद्धिप्रामाण्यवादी बुद्धाच्या मार्गाकडे वळवले व पुढील संकल्प लिहून ठेवल्या नंतरच्या दीड महिन्यात ६ डिसेंबर रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. त्यांचे हे इंग्रजी पत्र मराठी भाषेत १ ऑक्टोबर १९५७ च्या 'प्रबुद्ध भारत' मध्ये प्रसिद्ध झाले. या पत्रात त्यांनी आपल्या राजकीय चळवळीची दिशा स्पष्ट केली होती. लोकशाही बद्दल तर त्यांनी विस्तृत तपशिलासह सांगून शेवटी "लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतीकारक बदल 'रक्तविरहीत' मार्गानी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही" असे म्हटले आहे. "ज्या शासनपद्धतीमुळे सत्तारूढ मंडळीला सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मूलभूत बदल करता येतात आणि असे बदल ग्रहण करतांना जनता रक्लांच्छित (हिंसात्मक) मार्गाचा अवलंब करीत नाही, तेथे लोकशाही नांदत आहे. असे मी म्हणेन की, होच लोकशाहीची खरी कसोटी आहे. तीच उच्चतम कसोटी आहे." असे त्यांनी अभिप्रेत लोकशाहीबद्दल स्पष्ट मत दिले आहे.
बाबासाहेबांच्या वरील मतांचा परामर्श घेऊन जर आंबेडकरी चळवळीकडे पाहिले तर काय दिसते तर जिकडे तिकडे अंधाधुंद कारभार. काँग्रेस बद्दलची बाबासाहेबांची निराशा तर आंबेडकरी गट सत्ताधाऱ्यांच्या पायाशी लोळण घालत आहेत. लोकशाहीत रक्तविरहितता त्यांनी आवश्यक मानली तर आपल्या प्रत्येक आंदोलनात रक्तपात ठरलेला. हे असे का व्हावे याची कारणे तपासून पाहिली तर स्पष्टपणे दिसून येते की ज्यांना आपण आंबेडकरी चळवळी म्हणतो त्यांची प्रेरणास्थाने दुसरीच असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे विचार नाहीत. राजकीय भक्तांनी व्यक्तीगत स्वार्थापोटी जी आंबेडकरी चळवळीची वाताहत करणे चालू ठेवले आहे. त्याची चर्चाही किळस आणणारी आहे म्हणून करीत नाही, सामाजिक व साहित्यिक चळवळीचा जिने पाया घातला अशी दलित पँथर शिवसेनेच्या संस्कारात वाढलेल्या व भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर तिच्यापासून दूर झालेल्या नामदेव ढसाळांसारख्या लोकांनी निर्माण केली. पुढे कम्युनिष्ठांशी साथसंगत करून तिच्यातील लढवय्येपणाला लाल रंग आला. भगव्याचा लाल रंग झाला पण त्यातील विद्रोहाचा निळा रंग घूसर होत चालल्याची जाणीवही या नेत्यांना नव्हती. त्यामुळे मार्क्स को आंबेडकर हे द्वंद्व व पुढे वर्ग की वर्ण-जाती असे वाद वाढून विकोपाला गेले. या वादांना प्रसार माध्यम व प्रस्थापितांनी प्रतिष्ठा दिली. साहित्यामध्ये असे तट प्रतिष्ठित झाले. पुढे पुढे व्यक्तिगत हेव्यादाव्यांना उदात्त करण्याकरिता या तटांचा वापर होऊ लागला. एकाने दुसऱ्याला 'टाकल्या' म्हणावे व त्याने उत्तरादाखल त्याला 'नाच्या' म्हणावे इतक्या खालच्या पातळीवर तथाकथित आंबेडकरी साहित्यिक भांडू लागले. व या भांडणाची समीक्षा आंबेडकरी व मार्क्सवादी या दोन्ही अंगांनी झाली. सामान्य वाचक हे सारे पाहत होता. राजकीय क्षितिजावरही नव-नवे तारे उगवायला लागले.
आपापसातील भांडणे ही आता आमच्यासाठी नवी बाब राहिली नाही. पण ज्यांच्याशी आमचे पारंपारिक वैर आहे, त्यांच्याशी शय्यासोबत करण्यातही आम्हाला अनैतिकता वाटत नाही. व्ही. पी. सिंगांना शक्ती पुरविणाऱ्या समाजवाद्यांचा तळ असलेल्या पुण्यात एक सभा झाली, मंडल आयोगावरील चर्चासत्र, त्यात ना.ग. गोऱ्यांपासून य दि.फडक्यांपर्यंत सारे समाजवादी झाडून जमा झाले. या चर्चासत्राचे आयोजन राष्ट्र सेवा दलाचे ना.य. डोळे यांनी केले होते. त्याच परिसरात आरोग्य दक्षता मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी साजरी करण्याबाबत राज्यस्तरीय सभा झाली. या सभेत वेळ होता म्हणून ना. य. डोळे आले. त्यांनी छोटेसे भाषण केले. त्यात ते म्हणाले- आम्ही लहान असतांना राष्ट्र सेवा दलात आम्हाला सांगितले जायचे-आचार्य जावडेकरांचे 'आधुनिक भारत' वाचा. ती सेवादलाची 'गीताच' होती. या ग्रंथात महात्मा फुल्यांबद्दल एक पॅरेग्राफ फक्त आहे तर आंबेडकरांचे नांव ही नाही. आता आमच्या लक्षात आले की हेतुपुरस्सर हे त्यांनी केले होते. आम्हाला बरेच दिवस आंबेडकरांबद्दल काहीही माहीत नव्हते, त्याला कारण ते पुस्तक. पण अलिकडे जो एक सारखा आंबेडकरांचा उदोउदो सुरू आहे. त्यातून असे दिसते की केवळ आंबेडकरच दलितांचे नेते होते. महात्मा गांधीचे नांवही कुणी घेत नाही. वास्तविक हरिजनांसाठी पहिल्यांदा गांधीजींनी किती किती केले, पण नांव नाही. आता आपण दलितांसाठी गांधीजींनी जे जे केले ते ते सांगण्यासाठी स्वतंत्र चळवळ उभारली पाहिजे. दलितांना ओबीसीपासून वेगळे पाडण्याच्या उद्देशाने त्यांच्या सर्वेक्षणाचे काम आता राष्ट्र सेवा दल करणार आहे. सोबतच बाबासाहेबांचे नांव पुसण्याचा 'महान' प्रकल्पही उभारणार आहे. त्याकरिता सेवादलाच्या सुवर्णमहोत्सव प्रसंगी जमा झालेला पत्रास लाखाचा निधी पाठीशी आहेच.
समाजवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात यापूर्वीच उत्तरलेली ब्राह्मणवाद्यांची संघटना आहे. आरएसएस समाजात कोणते विचार पेरायचे याची चाणक्य नीती चांगल्यापैकी अवगत असलेली ही कावेबाज संघटना नव्यानव्या व प्रभावी मार्गाचा अवलंब नेहमीच करीत राहते. त्यांनी फुले-आंबेडकर संदेश यात्रा काढली. दलितांपैकी महार वगळता इतरांना नेतृत्व देऊन महाराष्ट्र भर फिरवली. हे सारे दीर्घकाळ चालू राहण्याकरीता त्यांनी सामाजिक समरसता मंच स्थापन केला. या उपक्रमाबद्दल जसे 'समरसते शिवाय सामाजिक समता अशक्य' या शिर्षकाखाली लिहिलेल्या पुस्तिकेत द. बा. ठेंगडी म्हणतात, "१४ एप्रिल १९८३ हा दिवस संस्मरणीय आहे. कारण हिन्दू कालगणनेप्रमाणे पू. डॉ. हेडगेवार त्यांची आणि इंग्रजी कालगणने प्रमाणे पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जन्मतीथी याच दिवशी आली. हा एक अपूर्वच योग होता. या सुमुहूर्तावर पुणे येथे 'सामाजिक समरसता मंचाची स्थापना करण्यात आली. या सामाजिक समरसता मंचाने फार काही मोठी कामगिरी करावी अशी अपेक्षा नसली तरी या दृष्टीने सामाजिक चिंतन करणाऱ्या लोकांना वारंवार एकत्र आणून त्यांच्या चितनाला गती देऊन त्यात समन्वय निर्माण करावा इतकेच लहानसे काम या मंचाने करावे अशा कल्पनेने हा मंच स्थापन झाला" असे ठेंगडी म्हणतात. म्हणजे फार काही करायचे नाही व संभ्रम मात्र निर्माण करायचा असा उद्देश या मंचाचा. कारण समता हा प्रभावी शब्द बाबासाहेबांनी दिला असतांना संभ्रमात टाकणारा नवा शब्द समरसता हा केवळ पर्यायीच नव्हे तर पूर्णत्वास पोचलेला आहे असा दावा ठेंगडींनी केला. समता हे शेवटले ध्येय नसून समरसता हेच ध्येय व शेवटचा शब्द आहे असे याच पुस्तिकेत पाश्चात्य उदाहरणांसह पटवून दिले आहे. वरील दोन संघटनांची आक्रमणे ही आंबेडकरी चळवळीच्या गतिमानतेला कुंठीत करणारी आहेत. म्हणून सावधपणे त्यांचा समाचार घेत राहिले पाहिजे. पण तसे न करता आमची मंडळी समाजवादी वा संघवादी या दोन्ही प्रवृत्तींना नेहमी जवळ करीत आली आहेत. बामणीकाव्याला बळी पडलेले आत्मकेन्द्रित नेतृत्व आंबेडकरी चळवळीवरील कलंक आहे म्हणून समाजाने जागृत राहणे गरजेचे आहे.
प्रा. अशोक
0 टिप्पण्या