बृहनमुंबई महानगरपालिका ही अशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था असून बृहनमुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशन ही गेल्या 49 वर्षापासून सेवावृत्तीने कार्यरत असलेली एकमेव नोंदणीकृत संस्था आहे. मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे एक लाख दहा हजार निवृत्तीवेतन धारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे प्रतिनिधीत्व करणारी एकमेव, देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था विभागातील सर्वार्थाने मोठी असलेली सेवाभावी संस्था आहे. निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, सेवावृत्तीने, तळमळीने व सातत्यपूर्ण लढणाऱ्या या संस्थेने दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे. संस्था कार्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या औचित्याने, संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प केला असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष कमलाकर व्यं, क्षीरसागर यांनी आज दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात संस्थेच्या कार्यक्रमासंदर्भात आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
सुवर्ण महोत्सव शुभारंभ समारोह, शनिवार, दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा (पश्चिम), मुंबई येथे सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.30 या वेळेत संपन्न होणार असून या कार्यक्रमास, मा. राम नाईक, माजी राज्यपाल, उत्तर प्रदेश हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. संस्था कार्याची माहिती करुन देणा-या तसेच सर्वथैव सक्षम (आर्थिक, शारीरिक, मानसिक) जेष्ठपर्वाच्या अनुषंगाने मान्यवर लेखकांचे लेख समाविष्ट असलेल्या एका स्मरणिकेचे प्रकाशन या समारोह प्रसंगी होणार आहे. या शिवाय संस्थेच्या विविध उपलब्धी, संस्था प्रगतीचे टप्पे विशद करणारी शॉर्ट फिल्म रिलिज करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, कला, क्रीडा, संगीत, नाटक, सिनेमा, सामाजिक कार्य इ. विषयात उल्लेखनीय कार्य केलेल्या, सेवानिवृत्त मंडळींचा प्रातिनिधीक स्वरुपाचा कौतुक करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ या शुभारंभ समारोहात होणार आहे. हा उपक्रम सुवर्ण महोत्सवी वर्षात सुरु रहाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या प्रारंभापासून ते आजमितीपर्यंतच्या सर्व पदाधिकारी, सक्रीय सभासदांच्या निरलस, निरपेक्ष योगदानातून संपन्न झालेले, गेल्या 5 दशकातील कार्य, केवळ निवृत्तीवेतन धारक नाही तर समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावे, या संस्थेचे महत्व तसेच या सेवाभावी संस्थेची भविष्यातील आवश्यकता हे सर्व पैलू देशभरातील सर्व घटकार्यंत पोहोचावेत असा संस्थेचा प्रयत्न आहे. विविधस्थानी निवास करणा-या निवृत्तीवेतन धारकांनी, सुवर्ण महोत्सव ( 1974 - 2024 ) शुभारंभ समारोहाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन व विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व निवृत्तीवेतन धारकाना संस्थेच्या वतीने केली आहे. शुभारंभ समारोहासाठी आवश्यक देणगी प्रवेशिका, बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या कार्यालयात तसेच मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, वाशी, गोरेगांव, बोरीवली, वसई व पुणे या सर्व केंद्रावर उपलब्ध केल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
निवृत्ती वेतन धारकांना सोईचे व्हावे यासाठी ऑन लाईन / ऑफ लाईन पध्दतीने हयातीचे दाखले सादर करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन. संवाद / मार्गदर्शन हेतुने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन. तक्रार निवारण कक्ष माध्यमातून मार्गदर्शन व सहकार्य. वैद्यकीय सहाय्य योजनेद्वारे निवृत्तीवेतन धारकास रु. 40000/- पर्यंत आर्थिक मदत. संगणकीय साक्षरता, डिजीटल साक्षरता, गुंतवणूक, ईच्छापत्र, मानसिक / शारिरीक सक्षमता इत्यादी. विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन. स्नेहसंमेलन, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन, जेष्ठ निवृत्तीवेतन धारक, तसेच कला, क्रीडा, संगीत, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ठ योगदान दिलेल्या निवृत्तीवेतन धारकांचा सन्मान करणे. शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणा-या, निवृत्तीवेतन धारकांच्या पाल्यांचे तसेच मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता 10 वी च्या परिक्षेत चांगली कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचे कौतुक करणे, असे अनेक कार्यक्रम सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या