महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून ३० जानेवारीला चर्चेचे निमंत्रण आम्हाला मिळाले आहे. त्यावेळी आम्ही आमचे मुद्दे मांडू. काही मुद्द्यांवर मतभेद असतील, तर ते चर्चेतून दूर करण्याचा प्रयत्न करु. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे जे झाले, ते महाविकास आघाडीत व आमच्यात होऊ नये, यासाठी प्रयत्न करु, काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडिया आघाडीचे राष्ट्रीय पातळीवरील भवितव्य संपले आहे, असे मत वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. माढा येथे २८ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम करत आहे. एकीकडे राहुल गांधीमार्फत पक्ष वाढविण्याचे काम चालू आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतून काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांना पुढे करण्याचे काम चालू आहे. भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल, बिहार या ठिकाणाहून जाणार आहे. या ठिकाणी प्रमुख असलेले तृणमूल काँग्रेस व जेडीयू यांना सामावून घेतले जात नाही. याच ठिकाणी पक्ष वाढीचा कार्यक्रम हाती घेऊन काँग्रेस इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांना राजकीयरित्या धमकाविण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या अशा भूमिकेमुळेच अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि आता नितीशकुमार यांनी वेगळी वाट धरली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे भवितव्य संपले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी व मराठा समाजात दरी निर्माण झाली आहे. यापुढील काळात ती वाढू नये, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनव्दारे मराठा समाजाच्या ज्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता शिंदे हेच आता स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आले आहेत. शिंदेच्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते हे क्लीन बोल्ड झाले आहेत, असे ते म्हणाले.
0 टिप्पण्या