भारतातला सर्वात लांब सागरी सेतू, शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू जनतेसाठी खुला झाला आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या पर्वाची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होईल अशी चर्चा उद्योगक्षेत्रात सुरु झाली आहे. आधीच मुंबई-महाराष्ट्रातले मोठ मोठे उद्योग इतर राज्यात जात असून त्यामुळे महाराष्ट्रात आता काय असा प्रश्न उरल्यासुऱल्या उद्योगधंद्यांना पडला आहे. परंतु आता या सागरीसेतूमुळे दळणवळणाचा वेग वाढल्याने उद्योगधंदे पुन्हा बहरतील असा आशावाद करायला हरकत नाही. मुंबईच्या शिवडी इथून सुरू झालेला हा सेतू रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातल्या न्हावा शेवा इथं संपतो. याची लांबी 21. 8 किमी इतकी असून समुद्रात याची लांबी जवळपास 16.5 किमी इतकी आहे. जवळपास 17 हजार 840 कोटींचा खर्च करण्यात आलेल्या या पुलाचे बांधकाम 7 वर्षात पूर्ण करण्यात आले या पुलामुळे शिवडी-न्हावाशेवा अंतर अवघ्या 20 मिनिटांत पार केले जाऊ शकते.
मुंबईला रायगड जिल्ह्यासोबत जोडणाऱ्या सागरी मार्गाची संकल्पना सर्वप्रथम १९६३ साली रचली गेली. महाराष्ट्र शासनाने ह्या प्रकल्पामध्ये सुरुवातीस फारसे स्वारस्य न दाखवल्यामुळे व राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे हा प्रकल्प बासनातच राहिला. त्यातच पर्यावरणाचाही प्रश्न होता. अखेर २०१२ साली केंद्रीय पर्वावरण मंत्रालयाने ह्या प्रकल्पास मंजूरी दिली. परंतु ह्या पूलामुळे येथील नैसर्गिक खारफुटी नष्ट होण्याची भिती व्यक्त केली गेली. तसेच कोणत्याही प्रमुख खाजगी कंपनीने ह्या प्रकल्पामध्ये रस दाखवला नाही. ह्या कारणांस्तव त्यावेळेस ११,००० कोटी अपेक्षित खर्च असलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पाचे भविष्य अधांतरी राहिले.
मुंबई पारबंदर प्रकल्प किंवा शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक प्रस्तावित प्रकल्प. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पूलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला गेला. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला जाईल ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक सुलभ होईल. तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता येईल. या सागरी सेतूचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेल्या सर्व पाइल लायनर बुर्ज खलिफाच्या 35 पट जास्त उंचीचे आहेत. भरती-ओहोटीवेळी खांबांना धक्का टाळण्यासाठी पाइल लायनर बसवण्यात आलेत. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा 6 पट जास्त काँक्रिटचा वापर करण्यात आला आहे. सेतूसाठी 7 हजार मेट्रिक टन वजनाच्या सळ्यांचा वापर आणि 84 हजार टन वजनाचे 70 डेक वापरले आहेत. सागरी सेतूसाठी ऑर्थोट्रोपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा होतील एवढ्या लांबीच्या केबलचा वापर तर 500 बोईंग विमानं, 17 आयफेल टॉवरच्या वजनाचं लोखंड वापरण्यात आले आहे. एकूण 22 किमीपैकी 16.50 किमी समुद्रात, 5.50 किमी जमिनीवर असा संपूर्ण देशातील सर्वात लांब असणारा सागरी सेतू लांबीच्या निकषाने जगातील दहाव्या क्रमांकाचा सागरी सेतू ठरला आहे.
हा सेतू नवी मुंबई, रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येतील व त्यातून या परिसराचाही विकास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवडी येथून सुरु होवून समुद्रमार्गे चिर्ले येथील न्हावा शेवा येथे इतर मार्गाना जोडल्या गेल्याने मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्याही आता काही अंशी संपेल. कारण मुंबई ते नवीमुंबई हा प्रवास अवघ्या 20 मिनिटात होणार आहे. हा सेतू मार्ग मुंबई-गोवा महामार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचाही विकास होणार असल्याचेही सांगण्यात येते. मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती आणि घरांच्या अपुर्या संख्येमुळे सर्वसामान्य मुंबईकर मुंबई महानगर प्रदेशात स्थायिक होऊ लागले आहे. आता नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार अशी दुसरी मुंबईही सर्वसामान्यांना परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी कर्जत-नेरळचा पर्याय पुढे आला आहे. येथील घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असल्याचे समोर आले आहे. कर्जत-नेरळ परिसराचा विकास करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधा प्रकल्प राबवीत आहे. यामुळे येत्या काळात येथील परिसराला निवासी आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त होईल. यातून बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
सध्या फ्री वे आणि शिवडी येथून या पुलावर जाता येते. भविष्यात कोस्टल रोडला देखील जोडण्यात येईल. प्रत्येक 100 मीटरवर अद्ययावत सीसीटिव्ही कॅमेरे बसलेले आहेत. एकूण 130 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रस्त्याचे बांधकाम उत्कृष्ठ दर्जाचे आहे. प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना उत्तम आहेत. या प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले असल्याचे सांगण्यात येते. फ्लेमिंगो जवळून जात असलेल्या पुलाच्या भागाला साऊंड बॅरियर लावण्यात आले आहेत. त्यामुळे फ्लेमिंगो आणि इतर कांदळवनातील वन्य जीवांना त्रास कमी होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विशिष्ट अंतरावर स्पिडोमीटर्स लावण्यात आल्याने वाहनाचा वेग आणि दिलेली मर्यादा लक्षात येते. पुलावर काही ठिकाणी 100 किमी प्रतीं तास तर काही ठिकाणी 80 आणि 60 किमी प्रतीतास अशी वेग मर्यादा आहे. असा हा अद्ययावत सागरी सेतू उभारण्यासाठी जवळपास 17 हजार 840 कोटींचा खर्च खर्च आला आहे. त्यामुळे आता हा खर्च टोलच्या माध्यमातून सरकार वसूल करणार आहे. मात्र या पुलावरून प्रवास करताना आपल्याला टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही. ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच मार्ग आहे. एकेरी प्रवास चार चाकी कारसाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे. परंतु जर दोन्ही बाजूने प्रवास करणार असाल तर त्यासाठी 375 रुपये टोल मोजावा लागणार आहे. याशिवाय दैनंदिन पास 625 रुपये आणि मासिक पास (कारसाठी) 12,500 रुपये एवढा असणार आहे. इतर वाहनांसाठी टोल हा वेगवेगळा असून त्याचं दर पत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
0 टिप्पण्या